Category: स्त्री

  • संतानयोग

    संतानयोग

    संतती म्हणजे सातत्य, तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो.

    संतती, संतान हे दोन्ही शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. संतती म्हणजे सातत्य, निरंतरत्व तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो.

    संतानयोग साधण्यासाठी म्हणजेच संपन्न, निरोगी अपत्याचा जन्म होण्यासाठी आयुर्वेदाने काही आवश्‍यक गोष्टी सांगितल्या आहेत.

    वीर्यलक्षणे

    * पुरुषस्य अनुपहतरेतसः – पुरुषाचे वीर्य निर्दोष असावे. शुद्ध वीर्याची लक्षण पुढीलप्रमाणे असतात,

    तत्सौम्यं स्निग्धं गुरु शुक्‍लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति ।

    …अष्टांगसंग्रह शारीरस्थान

    जे शुक्र सौम्य, स्निग्ध, जड, पांढऱ्या रंगाचे, मधासारख्या गंधाचे, मधुर, बुळबुळीत, मात्रेने अधिक, तूप-तेल किंवा मधाच्या वर्णाचे असते ते गर्भधारणेसाठी योग्य असते.

    वीर्याचे प्रमाण, वीर्यातील शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंची बीजांडापर्यंत पोचण्याची क्षमता या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या, पुरुषाच्या प्रजननसंस्थेत कोणत्याही प्रकारचा दोष नसला तर गर्भधारणा होणे शक्‍य असते.

    शुद्ध आर्तवाची लक्षणे

     

    * स्त्रियाश्‍च अप्रदुष्टयोनिशोणितगर्भाशयाया – स्त्रीची प्रजननसंस्था, विशेषतः गर्भाशय व बीजांड निर्दोष असावे. शुद्ध आर्तवाची लक्षणेही आयुर्वेदात सांगितलेली आहेत,

    मासान्निष्पिच्छदाहार्ति पञ्चरात्रानुबन्धि च ।नैवातिबहुलात्यल्पमार्तवं शुद्धमादिशेत्‌ ।।

    शशासृक्‌ प्रतिमं यच्च यद्वा लाक्षारसोपमम्‌ ।तदार्तवं प्रशंसन्ति यच्चाप्सु न विरज्यते ।।…माधवनिदान

    जे आर्तव (पाळीतील रक्‍तस्राव) दर 28 दिवसांनी येते, चार-पाच दिवस टिकते, ज्यात कोणत्याही प्रकारचा चिकटपणा किंवा गाठी नसतात, जे बाहेर पडताना जळजळ वा वेदना होत नाहीत असे आर्तव शुद्ध समजावे. तसेच अधिक प्रमाणात किंवा खूप अल्प प्रमाणात नसणारे आणि गर्भाशयाची शुद्धी करणारे आर्तव शुद्ध असते. आर्तव शुद्ध आहे की नाही हे समजण्यासाठी एक चाचणीही सांगितली आहे. सुती कापडावरचा आर्तवाचा डाग नुसत्या पाण्याने धुतल्यास समूळ धुतला जायला हवा, असे आर्तव शुद्ध असते. याउलट जर ते नीट धुतले गेले नाही, खाली पिवळट वगैरे डाग राहिला तर ते अशुद्ध समजले जाते.

    याशिवाय बीजांड वेळेवर तयार होते आहे, योनीमधून पांढरे पाणी वा तत्सम स्राव होत नाही, मूत्रमार्गात वा योनिमार्गात जंतुसंसर्ग होण्याचा त्रास नाही अशा परिस्थितीत स्त्री गर्भधारणेसाठी सक्षम समजली जाते.

    गर्भधारणा : काल संस्कार

     

    * संसर्गः ऋतुकाले – ऋतुकाळ म्हणजे रजोदर्शनापासून सोळाव्या रात्रीपर्यंतचा काळ. ऋतुकाळातील उत्तरोत्तर दिवसात म्हणजे रजोदर्शनापासून 12, 13, 14, 15, 16 या दिवसात स्त्री-पुरुषाचा संबंध आला असता गर्भधारणा होऊ शकते. यातही जितक्‍या पुढच्या दिवशी गर्भधारणा होईल तितकी गर्भाची शक्‍ती चांगली असते.

    तासु उत्तरोत्तरमायुरारोग्यैश्‍वर्य सौभाग्यबलवर्णेन्द्रिय सम्पद्‌ अपत्यस्य भवति ।…अष्टांगसंग्रह शारीरस्थान

    उत्तरोत्तर दिवशी गर्भ राहिल्यास तो अधिकाधिक आरोग्य, ऐश्‍वर्य, सौभाग्य, बल, वर्ण, गुणवान, इंद्रियांनी संपन्न असतो आणि ऋतुकाळ संपल्यावर म्हणजे 16व्या रात्रीनंतर गर्भधारणा झाल्यास संततीमध्ये आरोग्य, बल वगैरे गोष्टी कमी कमी होत जातात.

    * शुक्रशोणितसंसर्गमन्तर्गर्भाशयगतं जीवो।

    रक्रामति सत्त्वसंप्रयोगात्‌ –

     

    शुक्राणू व बीजांड यांचा जेव्हा गर्भाशयात संयोग होतो आणि त्याचवेळी मनयुक्‍त जीवही गर्भात प्रवेश करतो तेव्हा गर्भधारणा होऊ शकते.

    या ठिकाणी “जीव’, तोही “मनाने युक्‍त असणारा जीव’ महत्त्वाचा असतो. गर्भधारणा होण्यासाठी केवळ स्त्रीबीज व पुरुषबीजाचा संयोग पुरेसा नसतो तर त्याला जिवाची जोड मिळणे आवश्‍यक असते. म्हणून आयुर्वेदात “गर्भाधान संस्कार’ सांगितला आहे. या संपूर्ण संस्कारात मनाच्या सहभागाला फार महत्त्व दिले आहे.

    इच्छेतां यादृशं पुत्रं तद्रूपचरितांश्‍च तौ ।चिन्तयेतां जनपदांस्तदाचारपरिच्छदौ ।।…अष्टांगसंग्रह शारीरस्थान

    स्त्री-पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावांनी युक्‍त असेल त्याचा मोठा प्रभाव गर्भधारणेवर असतो. गर्भधारणेच्या आधी स्त्री-पुरुषाची मानसिक स्थिती, गर्भधारणेच्या वेळी मनात येणारे विचार यांचा गर्भधारणेवर मोठा परिणाम होत असतो म्हणून स्त्री-पुरुषांनी प्रसन्न मनाने, प्रसन्न वातावरणात शुद्ध स्थानऊर्जा असणाऱ्या ठिकाणी गर्भाधानास प्रवृत्त व्हावे असे आयुर्वेदात सुचविलेले आहे.

    * सात्म्यरसोपयोगात्‌ सम्यक्‌ उपचारैश्‍चोपर्यमाणः अरोगः अभिवर्धते

    – गर्भधारणा झाली की गर्भवतीने प्रकृतीला अनुकूल आहाराचे सेवन करण्याने आणि गर्भिणी परिचर्येचे व्यवस्थित पालन करण्याने गर्भ निरोगी राहतो आणि गर्भाशयात व्यवस्थित वाढू लागतो. गर्भधारणा झाली की स्त्रीची खरी जबाबदारी सुरू होते. गर्भवती स्त्री जसे वागेल, जे खाईल-पिईल, जे ऐकेल, जे विचार करेल त्या सर्व गोष्टींचा गर्भावर प्रभाव असतो आणि म्हणूनच संतानयोग व्यवस्थित सिद्ध होण्यासाठी गर्भावस्था महत्त्वाची असते. योग येणे, योगायोग असे शब्दप्रयोग आपण करतो. संतानयोग हा खरोखर ‘योग’च असतो. मनात आले, स्त्रीबीज-पुरुषबीजाचा संयोग झाला की लगेच त्यातून संतानोत्पत्ती होईल असे नाही. किंबहुना हा योग जितका चांगल्या प्रकारे जुळून येईल, गर्भधारणा होण्यापूर्वी जेवढी चांगली पूर्वतयारी केलेली असेल तितकी गर्भधारणा होणे सोपे असते आणि संपन्न, निरोगी संतती जन्माला येऊ शकते.

    संतानयोग जुळून यावा म्हणून

    संतानयोग जुळून यावा म्हणून, गर्भधारणेला अनुकूल वातावरण तयार व्हावे म्हणून आयुर्वेदात अनेक उपाय दिलेले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे –

    शरीरशुद्धी

    स्त्रीबीज व पुरुषबीज निरोगी हवे असतील तर त्यासाठी मूळ स्त्री-पुरुष निरोगी हवेत. आरोग्यासाठी आणि स्त्रीबीज, पुरुषबीजाची संपन्नता वाढविण्यासाठी सुद्धा स्त्री-पुरुषांचे शरीर शुद्ध असणे महत्त्वाचे असते. या शिवाय शरीरशुद्धीमुळे स्त्री-पुरुषांची इंद्रिये प्रसन्न व्हायला मदत मिळते, त्यांच्यातील आकर्षण वाढायला मदत मिळते आणि या सर्वांचा गर्भधारणा होण्यास निश्‍चितच उपयोग होतो.

    रसायन सेवन – स्त्रीबीज व पुरुषबीज गर्भधारणेसाठी सक्षम बनण्यासाठी शुक्रधातू संपन्न असणे आवश्‍यक असते आणि त्यासाठी रसायने उत्तम असतात. शरीरशुद्धी झालेली असली की रसायने अधिकच प्रभावीपणे काम करू शकतात.

    प्रकृती व्यवसाय वगैरे गोष्टी लक्षात घेऊन रसायन गुणांनी युक्‍त औषधे, कल्प, प्राश वगैरेंची योजना करता येते. सर्वसाधारणपणे पुरुषासाठी “चैतन्य कल्प’, “आत्मप्राश’सारखी रसायने, गोक्षुरादी चूर्ण वगैरे उत्तम असतात; तर स्त्री शतावरी कल्प, “सॅनरोझ’सारखे रसायन, “पित्तशांती गोळ्या’, “प्रशांत चूर्ण’ वगैरेंचे सेवन करू शकते. सुवर्णवर्ख, केशर युक्‍त पंचामृत, भिजविलेले बदाम नियमित सेवन करणेही उत्तम असते.

    संगीत

    निरोगी बीजांड तयार व्हावे, हॉर्मोन्सचे संतुलन टिकावे, विशेषतः स्त्री संतुलन कायम राहावे यासाठी स्त्रीने काही विशेष संगीतरचना ऐकाव्यात असे शास्त्रात सांगितले आहे. वेदमंत्र, वीणावादन, विशिष्ट रागात बद्ध केलेल्या रचना यामुळे स्त्रीसंतुलन साध्य करता आले की त्याचीही गर्भधारणेला मदत मिळते.

    मानसिक प्रसन्नता

    सौमनस्यं गर्भधारणाम्‌ म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी मन स्वस्थ असणे, मन प्रसन्न असणे आवश्‍यक असते असे सांगितले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये तर प्रेमभाव असावाच पण एकंदर संपूर्ण कुटुंबामध्ये आपुलकीची भावना असली तर ती गर्भधारणेस पूरक ठरते.

    अशा प्रकारे खऱ्या अर्थाने संतानयोगाची परंपरा पुढे न्यायची असेल, म्हणजे आपल्यातील गुण पुढच्या पिढीत जावेत, दोष मात्र मागे राहावेत अशी इच्छा असेल तर पूर्वनियोजित गर्भधारणाच हवी. आयुर्वेदीय गर्भसंस्कारांच्या मदतीने हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्‍य आहे.

    वंध्यत्वाकडून नैसर्गिक गर्भधारणेकडे नेणारी, S.A.F.E. ची यशस्वी उपचार पद्धती. या संदर्भात विशेष माहिती देणारा परिसंवाद येत्या शनिवारी ३ डिसेंबर रोजी बाल शिक्षण मंदिर,मयूर कॉलनी,कोथरूड,पुणे येथील ऑडिटोरियम मध्ये सायंकाळी ६ ते ७:३० पर्यंत आयोजित केलेला आहे.
    परिसंवाद विनामूल्य असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करावे.
  • रजोनिवृत्ती

    रजोनिवृत्ती

    “रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरवात होते. आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते; पण सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण सुरवातीपासूनच पुरेशी काळजी घेतली, तर स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही.”

    वातादी त्रिदोष, रसरक्‍तादी सप्तधातू आणि मलमूत्रस्वेद त्रिमल हे स्त्री व पुरुष दोघांतही असतात. पण तरीही स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक दृष्ट्या, तसेच स्रोतसांच्या कार्याचा विचार करता खूप वेगळी असते. हे वेगळेपण स्त्रीच्या रजःप्रवृत्तीमुळे सिद्ध होते, स्त्रीतील गर्भधारणक्षमतेतून सिद्ध होते.

    पाळी सुरू होणे म्हणजेच रजःप्रवृत्तीचा आरंभ आणि उतारवयात कायमची पाळी थांबणे म्हणजे रजोनिवृत्ती. हे दोन स्त्रीच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे होत. मुळात “रज’ हा रसधातूचा उपधातू असतो, रसधातू हा संपूर्ण शरीराचे प्रसादन करणारा असतो, सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याची जबाबदारी रसधातूवर असते आणि अशा रसधातूचा उपधातू असणाऱ्या रजावर गर्भधारणा झाली, तर गर्भाचे पोषण करण्याची जबाबदारी असते. मात्र गर्भधारणा झाली नाही तर हे रज “मल’ म्हणून शरीराबाहेर टाकले जाते. आयुर्वेदात या संबंधात खालीलप्रमाणे सांगितले आहे,

    सि मासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहम्‌ ।वत्सराद्‌ द्वादशात्‌ ऊर्ध्वं याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।
    ..अष्टांग हृदय शारीरस्थान

    रसधातूची संपन्नता
    प्रत्येक महिन्याला रसधातूपासून तयार होणारे रज स्त्रीशरीरातून तीन दिवसांपर्यंत स्रवत असते. ही क्रिया साधारण बाराव्या वर्षांपासून सुरू होते व पन्नाशीनंतर थांबते. फक्‍त गर्भधारणा झाली, की या चक्रामध्ये खंड पडतो. “रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरवात होते.

    तद्‌ वर्षात्‌ द्वादशात्‌ काले वर्तमानमसृक्‌ पुनः । जरा पक्वशरीराणां याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।…सुश्रुत शारीरस्थान
    रज स्त्रीच्या शरीरात बाराव्या वर्षांनंतर उत्पन्न होते आणि वृद्धपणामुळे शरीरधातू जीर्ण झाले की पन्नास वर्षांनंतर क्षय पावते.
    यावरून वयानुसार रजोनिवृत्ती येणे स्वाभाविक असते हे समजते. वयानुरूप रसधातूची संपन्नता कमी होणेही स्वाभाविक असते; पण जर रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, रसक्षय म्हणता येईल इतक्‍या अवस्थेपर्यंत पोचला, तर रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. आयुर्वेदाने रसक्षयाची म्हणूून सांगितलेली लक्षणे रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवू शकतात.
    रसे रौक्ष्यं श्रमः शोषो ग्लानि शब्दासहिष्णुता ।
    …अष्टांगहृदय सूत्रस्थान

    रसक्षयाने होणारे त्रास
    * शरीरात कोरडेपणा वाढतो म्हणजे त्वचा, केस, डोळे, योनी वगैरे ठिकाणी कोरडेपणा जाणवू लागतो.
    * फारसे श्रम झाले नाहीत तरी खूप थकवा जाणवतो.
    * मुख, घसा, जिभेला शोष पडतो.
    * शरीराला ग्लानी येते, उत्साह वाटत नाही.
    * आवाज सहन होईनासा होतो..
    * अकारण धडधड होते.
    * मन अस्वस्थ होते, शून्यता अनुभूत होते.
    याखेरीज एकाएकी वजन वाढणे किंवा कमी होणे हेही रसधातूशी संबंधित असल्याने रजोनिवृत्तीच्या दरम्यान वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तसेच मासिक पाळीमध्ये एकाएकी बदल होणे, उदा. दोन मासिक पाळींतील अंतर कमी होणे वा वाढणे, रक्‍तस्राव अतिप्रमाणात होणे किंवा बरेच दिवस होत राहणे, पाण्यासारखा वा पांढरा स्राव होणे यांसारखी लक्षणेही रजोनिवृत्तीच्या काळात निर्माण होऊ शकतात. एकाएकी गरम होणे (हॉट फ्लशेस), घाम फुटणे असाही त्रास काही स्त्रियांमध्ये होताना दिसतो.

      निवृत्ती म्हटली की कसेसेच व्हायला लागते. निवृत्त होताना जणू काही आता जीवनात काही उरले नाही, अशा तऱ्हेने माणसे वागायला लागतात. खरे पाहताना निवृत्ती कामाच्या बदलाची असते. निवृत्ती ही नवीन क्षेत्र समोर उघडण्यासाठी संधी देत असते. अनेक वर्षे जे काही केले त्या कामाने आलेला कंटाळा झटकून टाकून काहीतरी नवीन कार्य करण्याची निवृत्ती ही सुरवात असू शकते. तसे पाहताना निवृत्तीपूर्वीची काही वर्षे थोडे थोडे काम कमी करून इतर कार्यक्षेत्रात भाग घेतल्यास निवृत्तीची भीती वाटत नाही व निवृत्तीमुळे शरीर-मनावर काही विपरीत परिणाम होत नाहीत.

    रजोनिवृत्तीच्या बाबतीतही असाच विचार करायला हरकत नसावी. रजोनिवृत्ती जरी फक्‍त स्त्रियांपुरती मर्यादित असली, तरीसुद्धा स्त्री-पुरुषही एक जोडी असल्यामुळे स्त्रीच्या निवृत्तीचा काही परिणाम पुरुषावर होतोच. “रज’ हा शब्द रसरक्‍तासाठी वापरलेला आहे. ज्या प्रक्रियेद्वारा जन्म घेता येतो, त्याच्याशी संबंधित असलेला हा रसधातूचा उपधातू. स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला जन्म देण्याची शक्‍यता असलेले एक बीजांड बाहेर पडते, हे बीज फलित न झाल्यास गर्भाशयातून बाहेर पडणारे रज (र+ज) ही साधी समजूत करून घ्यायला हरकत नाही. रजःप्रवृत्ती साधारणपणे मुलगी वयात आली की म्हणजे साधारण बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते व ती प्रत्येक महिन्याला होत असल्याने त्याला मासिक धर्म असेही म्हटले जाते. बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेली व प्रत्येक महिन्याला तीन-चार दिवस चालणारी ही क्रिया अनेक वर्षे नित्यनियमाने सुरू असते. त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेचे आरोग्य बरोबर असले तर संततीला जन्म देण्याची शक्‍यता म्हणजेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची शक्‍यता वा योग्यता दिसून येते आणि मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध झाल्याने ती भाग्यवान ठरते.

      कामधंद्यातून निवृत्त व्हायची वेळ न येता आधीच निवृत्ती घेतल्यानंतर एखादा व्यवसाय चांगला जमल्यास ठीक, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेले पैसे संपल्यावर त्रास होतो, तसा वेळेच्या अगोदर रजोनिवृत्ती आणण्याचा

    प्रयत्न केल्यासही बऱ्याच प्रकारचा त्रास होऊ शकतो. खरे पाहताना स्त्रीचे रजःप्रवृत्ती चालू असेपर्यंत पुरुष व स्त्री हा भेद दिसतो.
    एकदा रजोनिवृत्ती झाली, की स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढायला लागते. परिणामतः स्त्रीच्या शरीरात पुरुषासारखे काही बदल दिसायला लागतात. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची विशेषता स्त्रीत्वात असते. या स्त्रीत्वाचीच निवृत्ती केली, तर स्त्रीचा मूळ धर्म टाकून केलेली वागणूक नैसर्गिक राहणार नाही, अशी शक्‍यता तयार होते. रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे बदल त्रासदायक ठरू नयेत म्हणून केलेल्या औषधोपचार योजनेमुळे इतर त्रास होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते आणि म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाययोजना श्रेयस्कर ठरतात. बऱ्याच स्त्रियांची नैसर्गिकपणेच रजोनिवृत्ती लवकर होते, पण अशा वेळीही स्त्रियांच्या स्वभावात बदल झालेले दिसतात. काही वेळा स्त्रीला काही विशेष रोग झाला असता रजोनिवृत्ती लवकर येताना दिसते. रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.रजोनिवृत्तीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीरात असलेली हाडे व्यवस्थित राहावी, संपूर्ण शरीराचे संतुलन राहावे, शरीरातील कॅल्शियम, लोह नीट टिकावे म्हणून विशेष आयुर्वेदिक उत्पादने घेण्याची आवश्‍यकता असते. तसेच एरवी दूध आवडत नसले तरी रजोनिवृत्तीच्या काळात दूध घेणे अत्यावश्‍यक असते. ज्या स्त्रियांना रजःप्रवृत्ती होते त्या प्रत्येक स्त्रीने रक्‍त वाढण्यासाठी रक्‍तवर्धक योग व अन्न लक्ष ठेवून घेणे श्रेयस्कर ठरते. असे असताना रजोनिवृत्तीच्या वेळी तर या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे संतुलन ठेवणे खूप आवश्‍यक असते. तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी गुप्तांगावर कोरडेपणा येणार नाही याची काळजी घेणेही खूप आवश्‍यक असते. रजोनिवृत्तीच्या वेळी केस गळणे, स्वभाव चिडचिडा होणे या गोष्टी टाळायच्या असतील तर आधीपासून काळजी घेऊन आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करून घेणे आवश्‍यक असते. अशोकारिष्ट, कुमारी आसव, शतावरी कल्प, प्रवाळपंचामृत, कामदुधा, मौक्‍तिक वगैरे सर्व योग किंवा हे योग वापरून तयार केलेली विशेष औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक असते. मासिक धर्म चालू असताना नैसर्गिक नियम पाळले तर अकाली रजोनिवृत्ती येणार नाही. तसे पाहता पुरुष कामेच्छेपासून कधीच निवृत्त होत नाहीत, परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची कामेच्छा कमी होऊ शकते. अशा वेळी कौटुंबिक संबंधात अडचणी आलेली उदाहरणे दिसतात.

    शारीरिक बदल
    रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात होणारे बदल आयुर्वेदिक दृष्ट्या याप्रमाणे सांगता येतात.
    1. पित्तावस्था संपून वातावस्थेला प्रारंभ होतो.
    2. रसधातूची संपन्नता कमी होते.
    3. स्त्रीविशिष्ट अवयवांची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होऊ लागते.
    4. पित्त व वात या दोन्ही दोषांमध्ये बदल होत असल्याने त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अग्नीमध्येही बदल होतात.
    5. वात वाढल्याने व अग्नीत बदल झाल्याने हाडांची दृढता कमी होऊ लागते.
    अर्थात हे सर्व बदल स्वाभाविक असले व त्यामुळे शरीर-मनावर थोडाफार परिणाम होणे नैसर्गिक असले, तरी त्यामुळे त्रास होतोच असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिक दृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही.

    सहजसाध्य उपाय
    रजोनिवृत्तीचा त्रास व्हायला नको असेल तर मुळात रसधातूची सुरवातीपासून काळजी घ्यायला हवी. तरुण वयातच रसधातू अशक्‍त असला तर वयानुरूप संपन्नता कमी होण्याच्या काळात म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात रसक्षय होतो आणि मग रजोनिवृत्ती त्रासदायक ठरू शकते. रसधातूची काळजी घेण्याबरोबरच वय वाढले तरी त्यामुळे वाढणारा वात शक्‍य तेवढा संतुलित राहील याकडे लक्ष ठेवायला हवे. स्त्रीविशिष्ट अवयव सुरवातीपासूनच व्यवस्थित कार्यक्षम राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. हे सर्व साध्य होण्यासाठी साधे व सहज करता येण्यासारखे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतात, सुरवातीपासून पाळी व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. कारण यामुळे रसधातू व्यवस्थित काम करतो आहे हे समजू शकते.

    * आहारात रसपोषक पदार्थांचा उदा. साळीच्या लाह्या, दूध, प्रकृतीनुरूप फळांचे रस वगैरेंचा समावेश करणे.
    * नियमित अभ्यंग करणे. आहारासह साजूक तूप पुरेशा प्रमाणात सेवन करणे. यामुळे शरीरातील अग्नीही संतुलित राहू शकतो, वातही नियंत्रित राहतो. हाडे मजबूत राहण्यासाठी दूध, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस यांचे नियमित सेवन करणे.
    स्त्रीविशिष्ट अवयवांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योनिपिचू, योनिधूप, अधूनमधून कुमारी आसव, अशोकारिष्ट वगैरे औषधांचे सेवन करणे.
    * रसधातू, शुक्रधातू तसेच एकंदरच स्त्रीप्रजननसंस्था निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी शतावरी कल्प, धात्री रसायन, “सॅन रोझ’सारख्या रसायनांचे सेवन करणे.
    * वाताचे, अग्नीचे संतुलन होण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने व प्राणायाम करणे, सर्वसामान्यांना दैनंदिन आचरणासाठी व आरोग्यावर लक्ष ठेवून विकसित केलेल्या संतुलन क्रिया योगपैकी “संतुलन फुलपाखरू’ क्रिया, समर्पण, सूर्यनमस्कार या क्रिया सुचविता येतील.
    * रस, अग्नी हे शरीरातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने त्यांच्यावर मानसिकतेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. दुःख झाले की भूक लागत नाही किंवा खूप मानसिक ताण आला तर चेहरा काळवंडतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात, याचा प्रत्यक्षात अनेकदा प्रत्यय येत असतो. आयुर्वेदात अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. म्हणूनच मनाची प्रसन्नतासुद्धा रसधातू संपन्न ठेवण्यासाठी, अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी “स्त्री संतुलन’संगीत ऐकणे, योगासने व अनुलोम-विलोमसारखा प्राणायाम यांचाही रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम ठरते.

    या सर्वांमुळे स्त्री आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. शिवाय रजोनिवृत्तीच्या काळातही फारसा त्रास होऊ नये यासाठी पूर्वतयारी होत असते.
    रजोनिवृत्तीला कधी सुरवात होईल, रजोनिवृत्तीची लक्षणे सुरू झाल्यावर संपूर्णपणे रजोनिवृत्ती कधी येईल असे प्रश्‍न पडणे स्वाभाविक असले, तरी यांची उत्तरे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळी असू शकतात. सुरवातीला पाहिल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते. सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण फार लवकर रजोनिवृत्ती होणे स्त्रीच्या आरोग्यास, तारुण्यास, सौंदर्यास बाधक ठरू शकते. वयाच्या पस्तीशी-छत्तीशीलाच रजोनिवृत्तीची लक्षणे दिसायला लागली तर तो विकार समजायला हवा व दूर करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत, हे नक्की.

    थोडक्‍यात सांगायचे, तर रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्या दरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये याकडे लक्ष ठेवायला हव. सुरवातीपासून काळजी घेतली तर रजोनिवृत्तीस कधी सुरवात झाली व रजोनिवृत्ती कधी आली, हे समजतही नाही, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. अधिकाधिक स्त्रियांनी याचा अनुभव घेतला तर एकंदरच स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही.

    ऐन रजोनिवृत्तीच्या काळात आवर्जून कराव्यात अशा काही गोष्टी :
    * आहारात दूध, खारीक, साजूक तूप यांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे.
    * अंगाला अभ्यंग करणे, योनीत औषधी तेलाचा पिचू ठेवणे.
    शतावरी कल्प, “सॅन रोझ’, “मॅरोसॅन’सारखे रसायन सेवन करणे.
    * रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागली की तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली 3-4 उत्तरबस्ती करून घेणे.
    * पाळीच्या संबंधात काही त्रासदायक बदल होत असल्यास बिघाड संतुलित करू शकणारे उपाय योजणे.
    * सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रजोनिवृत्ती शरीरातील एक स्वाभाविक बदल आहे याचा मानसिकदृष्ट्या स्वीकार करणे.

    – डॉ. श्री बालाजी तांबे