Category: विशिष्ठ आजार

  • संतानयोग

    संतानयोग

    संतती म्हणजे सातत्य, तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो.

    संतती, संतान हे दोन्ही शब्द खूप अर्थपूर्ण आहेत. संतती म्हणजे सातत्य, निरंतरत्व तर संतान म्हणजे धागा, सातत्य टिकविणारा तंतू. आपला वारसा पुढे चालावा म्हणजेच पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व कायम राहावे ही प्रेरणा, निसर्गात टिकून राहण्याची ऊर्मी प्रत्येक सजीवात असते आणि म्हणूनच निसर्गाचे चक्र चालू राहते. किडा-कीटकांपासून, वनस्पती, प्राणी, मनुष्य सर्वांनाच निसर्गतःच पुनरुत्पादनाची ओढ असते. म्हणूनच संतानयोग शतकानुशतकापासून चालत राहतो.

    संतानयोग साधण्यासाठी म्हणजेच संपन्न, निरोगी अपत्याचा जन्म होण्यासाठी आयुर्वेदाने काही आवश्‍यक गोष्टी सांगितल्या आहेत.

    वीर्यलक्षणे

    * पुरुषस्य अनुपहतरेतसः – पुरुषाचे वीर्य निर्दोष असावे. शुद्ध वीर्याची लक्षण पुढीलप्रमाणे असतात,

    तत्सौम्यं स्निग्धं गुरु शुक्‍लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति ।

    …अष्टांगसंग्रह शारीरस्थान

    जे शुक्र सौम्य, स्निग्ध, जड, पांढऱ्या रंगाचे, मधासारख्या गंधाचे, मधुर, बुळबुळीत, मात्रेने अधिक, तूप-तेल किंवा मधाच्या वर्णाचे असते ते गर्भधारणेसाठी योग्य असते.

    वीर्याचे प्रमाण, वीर्यातील शुक्राणूंची संख्या, शुक्राणूंची बीजांडापर्यंत पोचण्याची क्षमता या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्या, पुरुषाच्या प्रजननसंस्थेत कोणत्याही प्रकारचा दोष नसला तर गर्भधारणा होणे शक्‍य असते.

    शुद्ध आर्तवाची लक्षणे

     

    * स्त्रियाश्‍च अप्रदुष्टयोनिशोणितगर्भाशयाया – स्त्रीची प्रजननसंस्था, विशेषतः गर्भाशय व बीजांड निर्दोष असावे. शुद्ध आर्तवाची लक्षणेही आयुर्वेदात सांगितलेली आहेत,

    मासान्निष्पिच्छदाहार्ति पञ्चरात्रानुबन्धि च ।नैवातिबहुलात्यल्पमार्तवं शुद्धमादिशेत्‌ ।।

    शशासृक्‌ प्रतिमं यच्च यद्वा लाक्षारसोपमम्‌ ।तदार्तवं प्रशंसन्ति यच्चाप्सु न विरज्यते ।।…माधवनिदान

    जे आर्तव (पाळीतील रक्‍तस्राव) दर 28 दिवसांनी येते, चार-पाच दिवस टिकते, ज्यात कोणत्याही प्रकारचा चिकटपणा किंवा गाठी नसतात, जे बाहेर पडताना जळजळ वा वेदना होत नाहीत असे आर्तव शुद्ध समजावे. तसेच अधिक प्रमाणात किंवा खूप अल्प प्रमाणात नसणारे आणि गर्भाशयाची शुद्धी करणारे आर्तव शुद्ध असते. आर्तव शुद्ध आहे की नाही हे समजण्यासाठी एक चाचणीही सांगितली आहे. सुती कापडावरचा आर्तवाचा डाग नुसत्या पाण्याने धुतल्यास समूळ धुतला जायला हवा, असे आर्तव शुद्ध असते. याउलट जर ते नीट धुतले गेले नाही, खाली पिवळट वगैरे डाग राहिला तर ते अशुद्ध समजले जाते.

    याशिवाय बीजांड वेळेवर तयार होते आहे, योनीमधून पांढरे पाणी वा तत्सम स्राव होत नाही, मूत्रमार्गात वा योनिमार्गात जंतुसंसर्ग होण्याचा त्रास नाही अशा परिस्थितीत स्त्री गर्भधारणेसाठी सक्षम समजली जाते.

    गर्भधारणा : काल संस्कार

     

    * संसर्गः ऋतुकाले – ऋतुकाळ म्हणजे रजोदर्शनापासून सोळाव्या रात्रीपर्यंतचा काळ. ऋतुकाळातील उत्तरोत्तर दिवसात म्हणजे रजोदर्शनापासून 12, 13, 14, 15, 16 या दिवसात स्त्री-पुरुषाचा संबंध आला असता गर्भधारणा होऊ शकते. यातही जितक्‍या पुढच्या दिवशी गर्भधारणा होईल तितकी गर्भाची शक्‍ती चांगली असते.

    तासु उत्तरोत्तरमायुरारोग्यैश्‍वर्य सौभाग्यबलवर्णेन्द्रिय सम्पद्‌ अपत्यस्य भवति ।…अष्टांगसंग्रह शारीरस्थान

    उत्तरोत्तर दिवशी गर्भ राहिल्यास तो अधिकाधिक आरोग्य, ऐश्‍वर्य, सौभाग्य, बल, वर्ण, गुणवान, इंद्रियांनी संपन्न असतो आणि ऋतुकाळ संपल्यावर म्हणजे 16व्या रात्रीनंतर गर्भधारणा झाल्यास संततीमध्ये आरोग्य, बल वगैरे गोष्टी कमी कमी होत जातात.

    * शुक्रशोणितसंसर्गमन्तर्गर्भाशयगतं जीवो।

    रक्रामति सत्त्वसंप्रयोगात्‌ –

     

    शुक्राणू व बीजांड यांचा जेव्हा गर्भाशयात संयोग होतो आणि त्याचवेळी मनयुक्‍त जीवही गर्भात प्रवेश करतो तेव्हा गर्भधारणा होऊ शकते.

    या ठिकाणी “जीव’, तोही “मनाने युक्‍त असणारा जीव’ महत्त्वाचा असतो. गर्भधारणा होण्यासाठी केवळ स्त्रीबीज व पुरुषबीजाचा संयोग पुरेसा नसतो तर त्याला जिवाची जोड मिळणे आवश्‍यक असते. म्हणून आयुर्वेदात “गर्भाधान संस्कार’ सांगितला आहे. या संपूर्ण संस्कारात मनाच्या सहभागाला फार महत्त्व दिले आहे.

    इच्छेतां यादृशं पुत्रं तद्रूपचरितांश्‍च तौ ।चिन्तयेतां जनपदांस्तदाचारपरिच्छदौ ।।…अष्टांगसंग्रह शारीरस्थान

    स्त्री-पुरुषांचे मन ज्या प्रकारच्या भावांनी युक्‍त असेल त्याचा मोठा प्रभाव गर्भधारणेवर असतो. गर्भधारणेच्या आधी स्त्री-पुरुषाची मानसिक स्थिती, गर्भधारणेच्या वेळी मनात येणारे विचार यांचा गर्भधारणेवर मोठा परिणाम होत असतो म्हणून स्त्री-पुरुषांनी प्रसन्न मनाने, प्रसन्न वातावरणात शुद्ध स्थानऊर्जा असणाऱ्या ठिकाणी गर्भाधानास प्रवृत्त व्हावे असे आयुर्वेदात सुचविलेले आहे.

    * सात्म्यरसोपयोगात्‌ सम्यक्‌ उपचारैश्‍चोपर्यमाणः अरोगः अभिवर्धते

    – गर्भधारणा झाली की गर्भवतीने प्रकृतीला अनुकूल आहाराचे सेवन करण्याने आणि गर्भिणी परिचर्येचे व्यवस्थित पालन करण्याने गर्भ निरोगी राहतो आणि गर्भाशयात व्यवस्थित वाढू लागतो. गर्भधारणा झाली की स्त्रीची खरी जबाबदारी सुरू होते. गर्भवती स्त्री जसे वागेल, जे खाईल-पिईल, जे ऐकेल, जे विचार करेल त्या सर्व गोष्टींचा गर्भावर प्रभाव असतो आणि म्हणूनच संतानयोग व्यवस्थित सिद्ध होण्यासाठी गर्भावस्था महत्त्वाची असते. योग येणे, योगायोग असे शब्दप्रयोग आपण करतो. संतानयोग हा खरोखर ‘योग’च असतो. मनात आले, स्त्रीबीज-पुरुषबीजाचा संयोग झाला की लगेच त्यातून संतानोत्पत्ती होईल असे नाही. किंबहुना हा योग जितका चांगल्या प्रकारे जुळून येईल, गर्भधारणा होण्यापूर्वी जेवढी चांगली पूर्वतयारी केलेली असेल तितकी गर्भधारणा होणे सोपे असते आणि संपन्न, निरोगी संतती जन्माला येऊ शकते.

    संतानयोग जुळून यावा म्हणून

    संतानयोग जुळून यावा म्हणून, गर्भधारणेला अनुकूल वातावरण तयार व्हावे म्हणून आयुर्वेदात अनेक उपाय दिलेले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे उपाय पुढीलप्रमाणे –

    शरीरशुद्धी

    स्त्रीबीज व पुरुषबीज निरोगी हवे असतील तर त्यासाठी मूळ स्त्री-पुरुष निरोगी हवेत. आरोग्यासाठी आणि स्त्रीबीज, पुरुषबीजाची संपन्नता वाढविण्यासाठी सुद्धा स्त्री-पुरुषांचे शरीर शुद्ध असणे महत्त्वाचे असते. या शिवाय शरीरशुद्धीमुळे स्त्री-पुरुषांची इंद्रिये प्रसन्न व्हायला मदत मिळते, त्यांच्यातील आकर्षण वाढायला मदत मिळते आणि या सर्वांचा गर्भधारणा होण्यास निश्‍चितच उपयोग होतो.

    रसायन सेवन – स्त्रीबीज व पुरुषबीज गर्भधारणेसाठी सक्षम बनण्यासाठी शुक्रधातू संपन्न असणे आवश्‍यक असते आणि त्यासाठी रसायने उत्तम असतात. शरीरशुद्धी झालेली असली की रसायने अधिकच प्रभावीपणे काम करू शकतात.

    प्रकृती व्यवसाय वगैरे गोष्टी लक्षात घेऊन रसायन गुणांनी युक्‍त औषधे, कल्प, प्राश वगैरेंची योजना करता येते. सर्वसाधारणपणे पुरुषासाठी “चैतन्य कल्प’, “आत्मप्राश’सारखी रसायने, गोक्षुरादी चूर्ण वगैरे उत्तम असतात; तर स्त्री शतावरी कल्प, “सॅनरोझ’सारखे रसायन, “पित्तशांती गोळ्या’, “प्रशांत चूर्ण’ वगैरेंचे सेवन करू शकते. सुवर्णवर्ख, केशर युक्‍त पंचामृत, भिजविलेले बदाम नियमित सेवन करणेही उत्तम असते.

    संगीत

    निरोगी बीजांड तयार व्हावे, हॉर्मोन्सचे संतुलन टिकावे, विशेषतः स्त्री संतुलन कायम राहावे यासाठी स्त्रीने काही विशेष संगीतरचना ऐकाव्यात असे शास्त्रात सांगितले आहे. वेदमंत्र, वीणावादन, विशिष्ट रागात बद्ध केलेल्या रचना यामुळे स्त्रीसंतुलन साध्य करता आले की त्याचीही गर्भधारणेला मदत मिळते.

    मानसिक प्रसन्नता

    सौमनस्यं गर्भधारणाम्‌ म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी मन स्वस्थ असणे, मन प्रसन्न असणे आवश्‍यक असते असे सांगितले आहे. स्त्री-पुरुषांमध्ये तर प्रेमभाव असावाच पण एकंदर संपूर्ण कुटुंबामध्ये आपुलकीची भावना असली तर ती गर्भधारणेस पूरक ठरते.

    अशा प्रकारे खऱ्या अर्थाने संतानयोगाची परंपरा पुढे न्यायची असेल, म्हणजे आपल्यातील गुण पुढच्या पिढीत जावेत, दोष मात्र मागे राहावेत अशी इच्छा असेल तर पूर्वनियोजित गर्भधारणाच हवी. आयुर्वेदीय गर्भसंस्कारांच्या मदतीने हे प्रत्यक्षात आणणे सहज शक्‍य आहे.

    वंध्यत्वाकडून नैसर्गिक गर्भधारणेकडे नेणारी, S.A.F.E. ची यशस्वी उपचार पद्धती. या संदर्भात विशेष माहिती देणारा परिसंवाद येत्या शनिवारी ३ डिसेंबर रोजी बाल शिक्षण मंदिर,मयूर कॉलनी,कोथरूड,पुणे येथील ऑडिटोरियम मध्ये सायंकाळी ६ ते ७:३० पर्यंत आयोजित केलेला आहे.
    परिसंवाद विनामूल्य असून पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी कृपया खालील लिंक वर क्लिक करावे.
  • भात

    भात

    मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, असं सांगितलं जातं, परंतु भात खाणे वाईट नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. म्हणून पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

    मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, भात खाण्याने शरीर फुगते, वजन वाढते अशा प्रकारचा बराच प्रचार आतापर्यंत झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भात खाणे वाईट नाही. ग्लायसेमिक इंडेक्‍स (glycaemia index – GI) म्हणजे एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यावर दोन तासांमध्ये रक्‍तामध्ये साखर किती प्रमाणात वाढते, याची मोजणी असते. वेगवेगळ्या 233 प्रकारच्या तांदळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. अनेक प्रकारचे तांदूळ अस्तित्वात असतात. भातामुळे रक्‍तात वाढणारी साखर 48 ते 92 या गुणांमध्ये मोजली जाते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाच्या सेवनामुळे 68 ते 74 संख्येपर्यंत साखर वाढते (भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाचा जी.आय. 68 ते 74 आहे), तर सुवर्णा किंवा मसुरी या तांदळांच्या सेवनामुळे साखर वाढण्याचे प्रमाण 55 पेक्षा कमी आहे. हातसडीचा तांदूळ पचायला जरा जड असतो, पण त्यातून जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात. अन्यथा तो पॉलिश केलेल्या तांदळाप्रमाणेच काम करतो. तांदळात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे भात खाल्ल्यावर मनुष्याने हालचाल करणे म्हणजेच काम करणे आवश्‍यक असते. भात खाऊन नुसते बसून राहिले तर चांगले नसते, असेही निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र (International Rice Research Institute – IRRI)  आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅंड या दोन्ही संस्थांनी मिळून केलेले आहे. या संशोधनात असे आढळले आहे, की दहा प्रजातींपासून केलेला भात सेवन केल्यास रक्‍तात साखर वाढण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. चीनमध्ये तयार होणार तांदळाचा जी. आय. 45 इतका कमी आहे, तर लाओसमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचा जी.आय. 92 आहे.

    ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नाचे पचन सावकाश होते व तो शरीरात सावकाश सावकाश जिरतो, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नापासून थोडी साखर शरीरात सोडली जाते. म्हणून अशा प्रकारचा तांदूळ खाल्ल्यास मधुमेहींसाठी कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याने खायला हरकत नाही, असा एकूण या संशोधनाचा निष्कर्ष निघाला. तसेही योग्य प्रमाणात तांदूळ-भात खाल्ला तर रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढत नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

    आयुर्वेदाकडून भातप्रशंसा
    “फॅमिली डॉक्‍टर’ व “सकाळ’च्या वाचकांना, तसेच फॅमिली डॉक्‍टरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्यांना आठवत असेल, की आयुर्वेदाने भात खाण्याची प्रशंसा वेळोवेळी केलेली आहे. ज्या ठिकाणी भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तेथे, तसेच भात हे मुख्य अन्न असलेल्या चीनमध्ये लोकांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसते. (चीनमधील तांदळाचा जी.आय. 45 इतका कमी आहे.) ज्या देशातील लोकांचे किंवा भारतातील ज्या प्रदेशातील लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे आरोग्य गहू वा इतर अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असलेले दिसते. भात खाणाऱ्यांचा सडसडीतपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. अनेक मंडळींना प्रत्यक्ष विचारल्यानंतर असे दिसून आले, की भात मुख्य अन्न असणाऱ्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा वगैरेंचे वजन कधीच मर्यादेच्या बाहेर नव्हते, त्यांना कधीही स्थूलत्वाचा त्रास झालेला नव्हता. मधुमेह वगैरे तर सोडाच, पण त्यांनी निरामय आरोग्य सांभाळत शंभरी पार केलेली होती.

    तीन महिने, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत केवळ तांदळाचे पदार्थ सेवन केल्यास आरोग्याचा लाभ होतो हे दाखवून दिले. दही-भात, ताक-भात, वरण-भात, डाळ-भात, मेतकूट-भात, गोड भात, तांदळाची भाकरी वगैरे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ खाता येतात. त्याबरोबर काही अंशी तांदळापासून बनविलेले पोहेसुद्धा खाता येतात. दही-पोहे खाणारी अनेक मंडळी असतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तांदळाच्या कण्यांचा उपमा खाता येतो. तांदळापासून पक्वान्ने बनवूनही खाता येतात. तेव्हा नुसता तांदूळ खायचा म्हटल्यावर आता माझे कसे होणार, याची चिंता करायचे कारण नसावे.

    तांदूळ पचायला सोपा
    संतुलन पंचकर्म व शरीरातील पेशी शुद्ध करण्याच्या चिकित्सेच्या दरम्यान सर्व रोग्यांना (यात हृद्रोगी, मधुमेहाचे रोगीही अंतर्भूत आहेत) सकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या, दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भात देण्यात आला. एवढे करून कुणालाही कसलाही त्रास झाला नाही, कुणाचेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वाढले नाही, साखरही वाढली नाही, उलट कमी झाली. अर्थात रोग्यांच्या दिनक्रमात अंतर्स्नेहन, बाह्यस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती वगैरे उपचार, योग, संगीत वगैरेंचाही समावेश होता. त्यांची कुठल्याही प्रकारे उपासमार केली गेली नाही. त्यांच्या आहारात तांदळाचा समावेश होता.

    तांदूळ हे अधिक पाण्यावर उगवणारे पीक आहे. त्यातल्या त्यात साठ दिवसांत तयार होणारा तांदूळ पचायला अधिक सोपा असतो. तांदूळ भाजून घेऊन त्यापासून केलेला भात पचायला सोपा असतो व कुठलाही त्रास न होता त्यापासून सहज शक्‍ती मिळते. भात शिजवण्यासाठी वा डाळ-तांदळाची खिचडी बनवताना फारसे कौशल्य असण्याची गरज नसते.

    या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर भात खाण्याचा प्रयोग करून पाहावा व प्रकृतीत सुधारणा अनुभवावी, आनंद मिळवावा.

    तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

    तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा. बहुतेक सर्व रोगांमध्ये तांदूळ हा पथ्यकारक म्हणून सांगितला आहे. आयुर्वेदाने भाताचा नेहमीच आग्रह धरला आहे.

    जगात सर्वत्र मिळणारे आणि अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. जगभरात सुमारे 40हजार जातींचे तांदूळ होतात. भारतामध्येही तांदळाच्या पारंपरिक अनेक जाती आहेत. बासमती, आंबेमोहोर, सोना मसुरी, कोलम वगैरे भाताची नावे बहुतेकांच्या परिचयाची असतात; मात्र याखेरीज साठेसाळ, रक्‍तसाळ, चंपा, चंपाकळी, जिरगा, काळी गजरी वगैरे अनेक जाती असतात. बासमती, आंबेमोहोर भात सुगंधामुळे अधिक प्रचलित असला तरी साठेसाळ, रक्‍तसाळ वगैरे पारंपरिक तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. उदा. रक्‍तसाळ भातात लोह अधिक प्रमाणात असते, साठेसाळ भात पचण्यासाठी अतिशय सोपा असतो. जिरगा, काळी गजरी वगैरे भात रुग्णांसाठी विशेष हितकर असतो.

    आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तांदूळ तयार झाल्यावर वर्षभर साठवून मग खाण्यासाठी वापरावा असेही सांगितलेले आहे. बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते.

    “भावप्रकाश’ या आयुर्वेदाच्या ग्रंथात तांदळाच्या काही मुख्य जातींचा उल्लेख याप्रमाणे केलेला आहे, रक्‍तशाली, सकलम, पांडुक, शकुनाहृत्‌, सुगंधक, कर्दमक, महाशाली, दूषक, पुष्पांडक, पुंडरीक, महिष, मस्तक, दीर्घशूक, कांचनक, हायन, लोध्रपुष्पक. मात्र, विस्तारभयामुळे सर्व जातींचा निर्देश करणे शक्‍य नाही असे याच्यापुढे म्हटलेले असल्याने प्रत्यक्षात त्या वेळीही यापेक्षा अनेक जाती अस्तित्वात होत्या, हे समजते.

    तांदळाचे गुणधर्म
    तांदळाचे गुणधर्म व उपयोग पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,
    शालयोः मधुराः स्निग्धा बल्या बद्धाल्पवर्चसः ।
    कषाया लघवो रुच्या स्वर्या वृष्याश्‍च बृंहणाः ।।
    अल्पानिलकफाः शीताः पित्तघ्ना मूत्रलास्तथा । …भावप्रकाश

    तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, थोड्या प्रमाणात वात-कफाला वाढवतात, पचण्यास सोपे असतात, तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात.

    हे झाले सामान्य तांदळाचे गुण. मात्र, सर्व तांदळांत साठेसाळी तांदूळ श्रेष्ठ आहेत, असे सांगितले आहे. हे तांदूळ साठ दिवसांत तयार होतात व त्यांचे गुण या प्रकारे असतात.

    षष्टिकाः मधुराः शीता लघवो बद्धवर्चसः ।
    वातपित्तप्रशमनाः शालिभिः सदृशा गुणैः ।। …भावप्रकाश

    चवीला मधुर, वीर्याने शीतल व पचायला हलके असतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. वात तसेच पित्तदोषाचे शमन करतात; ताकद देतात, तसेच तापात हितकर असतात.

    रक्‍तशाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ. यांची विशेषता अशी, की ते डोळ्यांसाठी चांगले असतात.

    रक्‍तशालिर्वरस्तेषु बल्यो वर्ण्यस्त्रिदेषजित्‌ ।
    चक्ष्युष्यो मूत्रलः स्वर्यः शुक्रलस्तृङज्वरापहा ।।
    विषव्रणश्‍वासकासदाहनुत्‌ वपिष्टिदः । …भावप्रकाश

    सर्व तांदळांपैकी रक्‍तसाळ तांदूळ डोळ्यांना हितकर असतात, ताकद वाढवितात, कांती सुधरवतात व तिन्ही दोषांना संतुलित ठेवतात; आवाजासाठी हितकर असतात, लघवी साफ होण्यास मदत करतात, शुक्रवर्धन करतात. तहान, ताप, विष, व्रण, दमा, खोकला, दाह यांचा नाश करतात व अग्नीची पुष्टी करतात.

    विविध जातींच्या तांदळाचे अंगभूत गुण याप्रमाणे सांगितले आहेत; मात्र, तांदूळ कशा प्रकारे उगवले आहेत यावरही त्यांचे गुणधर्म बदलतात.
    अगोदर जाळून घेतलेल्या जमिनीमध्ये लावलेले तांदूळ किंचित तुरटसर चवीचे व पचायला सोपे असतात. हे तांदूळ मल-मूत्र विसर्जनास मदत करतात, कफनाशक असतात.
    नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ विशेषतः शुक्रवर्धक असतात आणि तुलनेने कमी हलके असतात, धारणाशक्‍ती वाढवितात, ताकद देतात, या तांदळापासून मलभाग फारसा तयार होत नाही.
    अजिबात न नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ वात वाढवितात.
    आपोआप उगवलेले म्हणजे मुद्दाम पेरणी न करता आलेले तांदूळ गुणाने कमी प्रतीचे असतात.
    एकदा आलेल्या तांदळाच्या लोंब्या कापून घेऊन त्याच फुटीवर पुन्हा आलेले तांदूळ गुणांनी रुक्ष असतात, पित्त वाढवितात व मलावबंध करतात.

    मधुमेहीनो, भात खा!
    अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने, नीट पेरणी, मशागत करून उगवलेले तांदूळ वर्षभरानंतर वापरणे अतिशय आरोग्यदायी आहे, हे सहज लक्षात येते.
    मधुमेही व्यक्‍तींनी, वजन जास्त असणाऱ्यांनी भात खाऊ नये असा प्रचार बऱ्याचदा केला जातो; मात्र, आयुर्वेदातील पुढील संदर्भावरून यामध्ये अजिबात तथ्य नाही, हे स्पष्ट होते.
    मधुमेहावरचे औषध खाल्ल्यानंतर तूप व भात खावा असे सांगितले आहे,

    सुभावितं सारजलैला हि पिष्ट्‌वा शिलोद्‌भवाः ।
    शालिं घृतैश्‍च भुञ्जानः ।। …रसरत्नाकर

    चंदनाच्या पाण्यात वेलची व शुद्ध शिलाजित टाकून घ्यावे व वर तूप-भात खावा.
    मधुमेही व्यक्‍तीसाठी पथ्यकर पदार्थ सांगताना म्हटले आहे,
    यवान्नविकृर्तिमुद्‌गाः शस्यन्ते शालिषष्टिकाः । …रसरत्नाकर

    जवापासून बनविलेले पदार्थ, मूग, तांदूळ, विशेषतः साठेसाळीचे तांदूळ मधुमेही व्यक्‍तींसाठी हितकर आहेत.
    स्थूलता कमी करण्यासाठीसुद्धा तांदळाचा आधार घेतलेला आहे.

    उष्णमत्रस्य मण्डं वा पिबन्‌ कृशतनुर्भवेत्‌ ।
    भैषज्य रत्नावली

    रोज सकाळी तांदळाची मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.
    स्थूल व्यक्‍तीसाठी हितकर काय आहे सांगताना तांदळाचा उल्लेख केलेला आहे.

    पुराणशालयो मुद्गकुलत्थयवकोद्रवाः ।
    लेखना बस्तयश्‍चैव सेव्या मेदस्विना सदा ।। …भैषज्य रत्नावली

    एक वर्ष जुने तांदूळ, मूग, कुळीथ, यव, कोद्रव (एक प्रकारचे धान्य), लेखन (मेद कमी करणाऱ्या औषधांनी संस्कारित तेलाची वा काढ्याची बस्ती, हे मेदस्वी व्यक्‍तीने नित्य सेवन करण्यास योग्य आहे.

    तांदूळपाण्याचे अनुपान
    तंडुलोदक म्हणजे तांदळाचे पाणी हे अनुपान म्हणूनही वापरले जाते. बारीक कांडलेले तांदूळ आठपट पाण्यात भिजत घालावेत, 15-20 मिनिटांनी हातांनी कुस्करून गाळून घ्यावेत. हे तंडुलोदक अतिशय तहान लागणे, उलटी, मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित न होणे, आव, जुलाब वगैरे रोगांमध्ये उपयोगी असते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अति रक्‍तस्राव होणे, वारंवार पाळी येणे वगैरे तक्रारींवर द्यायचे औषध तंडुलोदकाबरोबर दिल्यास अधिक लवकर व चांगला गुण येतो.

    तांदळापासून बनविलेल्या साळीच्या लाह्या आम्लपित्त, उलटी, जुलाब वगैरे तक्रारींवर औषधाप्रमाणे उपयोगी असतात.

    पिंडस्वेदन या विशेष उपचारासाठी औषधी काढ्यात तांदूळ शिजवला जातो व असा भात पुरचुंडीत बांधून मसाज करण्यासाठी वापरला जातो. काही वातशामक लेपसुद्धा तांदळाच्या पेजेमध्ये मिसळून लावायचे असतात.

    अशा प्रकारे तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. तेव्हा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा.

  • उपचार वातविकारांवर

    उपचार वातविकारांवर

    सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो “संधिवात’ असे मानले जात असले, तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. …….
    ज्याच्या नावातच वात आहे, असा हा रोग वातविकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो संधिवात असे मानले जात असले तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. हे निदान करण्यासंदर्भात आयुर्वेदाने अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे.

    संधिगत वात – जेव्हा सांध्यांमध्ये वातदोष वाढतो तेव्हा संधिवेदना व सूज निर्माण करतो.

    एखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.

    सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

    आमवात – जेव्हा आमदोष व वातदोष हो दोघे एकत्रित रीत्या कुपित होतात तेव्हा ज्या ज्या सांध्यात आमापाठोपाठ वातदोष जातो त्या त्या ठिकाणी हालचाल बंद करवतो, जखडण निर्माण करतो. या विकाराला आमवात असे म्हणतात.

    संधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.

    कुपित झालेला व अवरोध झालेला वायू दूषित रक्‍तासह मिळून प्रथम पायाचा आश्रय घेतो व नंतर संपूर्ण शरीरात धावतो. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना, खाज व बधिरता ही लक्षणे जाणवतात.

    प्रत्यक्षातही पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होताना दिसते. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा, वेदना, सूज ही लक्षणे दिसतात. क्रमाक्रमाने ही लक्षणे घोटा, गुडघा अशी वर वर सरकतात.

    सुजेमुळे गुडघा कोल्ह्याच्या डोक्‍याप्रमाणे दिसू लागतो तो रोग म्हणजे क्रोष्टुकशीर्ष.
    हा रोग फक्‍त गुडघ्यांपुरताच मर्यादित असतो व ह्यात रक्‍तधातूच्या जोडीने वात कुपित झालेला असतो.

    पाऊल चुकीच्या पद्धतीने टाकल्याने किंवा अत्यधिक परिश्रम करण्याने जेव्हा वात गुल्फसंधीचा म्हणजे घोट्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला वातकंटक म्हणतात.

    खांद्यामध्ये जेव्हा वायू कुपित होतो व तेथील संधिबंधनांना सुकवतो तेव्हा त्याला अंसशोष म्हणतात. तर तिथल्या शिरा आखडल्यामुळे जेव्हा हात उचलता येत नाही तेव्हा त्याला अवबाहुक असे म्हणतात.आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याप्रकारे सांधा सुकणे व जखडणे हे फक्‍त खांद्यांच्या संदर्भात सांगितले असले तरी ते इतर सांध्यांच्या बाबतीतही घडू शकते. विशेषतः आजकाल मांडी व कंबरेच्या सांध्यांच्या ठिकाणी रक्‍तप्रवाह पोचणे बंद होऊन तीव्र वेदना, चालता न येणे यासारखी लक्षणे असणारा रोग तरुण वयातच होताना दिसतो. हा यातलाच प्रकार समजावा लागतो. सर्व संधिवात विकारांवर दुःख कमी करण्याबरोबर रोग बरा व्हावा व झीज भरून निघावी म्हणून “संतुलन शांती तेल’ वापरता येते, तसेच पाठीच्या मणक्‍यांची झीज, दोन मणक्‍यांमधील कूर्चा व नसा यांच्यासाठी “संतुलन कुंडलिनी तेल’ वापरता येते.

    मानदुखी, कंबरदुखी – पाठीचे मणके हे सुद्धा छोटे छोटे सांधेच असतात. हे सांधे जोपर्यंत लवचिक असतात तोपर्यंत ठीक असते. पण, मणक्‍यांमध्ये वातदोष वाढला, लवचिकता कमी झाली तर दुखण्याची, जखडण्याची सुरुवात होते.

    या सर्व वर्णनावरून एक लक्षात येईल की सांधा दुखतो या तक्रारीच्या मागे अनेक कारणे असू शकतात.
    वातप्रकोप हे त्यातले सामान्य व प्रमुख कारण असले तरी त्याचा प्रकोप कशामुळे झाला, कोणासमवेत झाला याचीही दखल घेणे आवश्‍यक असते. प्रत्यक्ष उपचार करताना तर व्यक्‍तीची प्रकृती, तिचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, वय, कुटुंबातला इतिहास, ताकद, पचनशक्‍ती अशा अनेक लहानसहान गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार नेमके उपचार योजावे लागतात.

    ————————————————————
    वात नियंत्रित ठेवण्यासाठी

    स्नेहन – बाहेरून करायचे स्नेहन म्हणजे वातशामक द्रव्यांनी तेल लावणे तर आतून करायचे स्नेहन म्हणजे घृृतपान. अंगाला “संतुलन अभ्यंग तेला’सारख्या तेलाने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना “संतुलन शांती तेला’सारखे आतपर्यंत जिरून सांध्यांना पूर्ववत वंगण देण्याची क्षमता असणारे तेल लावणे हे संधिवात होऊ नये म्हणून चांगले असते आणि संधिवात झालेल्यांनाही आवश्‍यक असते.

    -स्वेदन – वातदोषाला शमविण्यासाठी स्वेदन म्हणजे शेकणे हाही उत्तम उपाय असतो. निर्गुडी, एरंड, शेवगा वगैरे वातशामक वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याने वेदना शमतात, सूजही कमी होते. यासाठी तयार “संतुलन अस्थिसंधी पॅक’ही वापरता येतो. आमाचा संबंध असणाऱ्या संधिववेदनेमध्ये रुक्ष स्वेदन म्हणजे विटकरीच्या किंवा वाळूच्या साहाय्याने शेक करणे उपयुक्‍त असते.

    -विरेचन – वाताला संतुलित करण्यासाठी हलके विरेचन हा उत्तम उपचार होय. स्नेहपान, बाष्पस्वेदन घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे उत्तम असतेच पण घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन किंवा गंधर्वहरीतकी, योगसारक चूर्ण घेऊन पोट साफ करणे हेही वातासाठी चांगले असते. शरीराचे स्नेहन व्हावे व कोठासाफ व्हावा यासाठी पोळी किंवा भाकरी करताना त्यात चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकता येते. दिवसातून एकदा अशी गरम पोळी किंवा भाकरी खाण्याचा सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर चांगला उपयोग होताना दिसतो.

    -बस्ती – वातावरचा हुकुमी उपचार म्हणजे बस्ती. दशमूलासारख्या वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेणे सर्व सांधेदुखीवर उत्तम असते. अशी आयुर्वेदिक बस्ती पोट साफ होण्यासाठी नाही तर वातशमन करणारी असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने अशी बस्ती घेता येते. तसेच घरच्या घरीही तयार तेलाच्या पाऊचची बस्ती घेता येते. उदा. संतुलन आयुर्वेद सॅनबस्ती

    वातशामक औषध म्हणूून योगराजगुग्गुळ, वातबल गोळ्या, गोक्षुरादी चूर्ण. दशमूलारिष्ट, महारास्नादि काढा पंचतिक्‍तघृत वगैरे योग घेता येतात. मात्र, त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणे अधिक सयुक्‍तिक.

    ————————————————————
    वातव्याधीसाठी पथ्यापथ्य
    -पथ्य – तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ

    -अपथ्य – रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.
    ————————————————————
    सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • क्षयरोग (टी बी)

    क्षयरोग (टी बी)

    अश्‍विन महिन्यातील द्वादशी म्हणजे गुरुद्वादशी. याच दिवसाला म्हणतात वसुबारस. गोठा साफ करून त्यात हव्या असलेल्या सुधारणा करून, गुरे स्वच्छ करून, गोठ्यात धूप जाळून वसुबारसेच्या दिवशी गोठ्यात सवत्स गाईची पूजा केली जाते. परंतु, अशा रीतीने फक्‍त एक दिवस गोठा स्वच्छ ठेवला तर काम भागेल का? गुरे म्हणजे कुटुंबातील एक घटक आहे असे समजून त्यांच्याकडे पूर्वीच्या काळी लक्ष दिले जात असे. गुरांना जेथे ठेवत ती जागाही भरपूर मोठी असे. गलिच्छ गोठे क्वचित प्रसंगीच पाहायला मिळत असत. परंतु माणसाचा आळस व लोभ वाढल्याने कमी जागेत अधिक गुरे ठेवली गेल्याने गोठ्यात स्वच्छता राहीनाशी झाली.

    ही सर्व चर्चा कशासाठी, तर क्षय हा रोग संसर्जजन्य असून तो गुरांकडून येतो असे समजले जाते. पूर्वीच्या काळी क्षय हा एक जीवघेणा आजार होता, पण गेल्या काही वर्षात क्षयावरच्या रोगांवरचे संशोधन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे हा रोग काही अंशी आटोक्‍यात आलेला आहे.

    तरीही भारतात दरवर्षी सुमारे 18 ते 20 लाख लोकांना क्षयाची लागण होते असे म्हणतात. माहीत नसलेल्या गोष्टीला गणितात क्ष किंवा य (क्षय) अशी संज्ञा देतो. परंतु या रोगाची आता पूर्ण माहिती झालेली आहे. त्याला क्ष-य म्हणण्याचे कारण उरलेले दिसत नाही. पूर्वीच्या काळी त्याला बरोबर उलटे म्हणजे यक्ष्मा किंवा राजयक्ष्मा का म्हणत असत हेही कळायला मार्ग नाही. “य’ धातूने वायुतत्त्वाचा बोध होतो फुप्फुसात वायूतत्त्वचा संचार कमी झाला की क्षय असे नाव पडले असावे.

    या रोगाला राजयक्ष्मा, क्षय, टी.बी. असे काहीही म्हटले तरी हा रोग जीवघेणा व दीर्घकाळ चालणारा खराच. हा रोग म्हणजे फुप्फुसांचा रोग असे सर्वसाधारण समजले जात असले तरी तो शरीरात इतर ठिकाणीही होऊ शकतो. याचा प्रादुर्भाव झाला असता बऱ्याच वेळा छोट्या गाठी येऊ शकतात, लहान आतड्यात, मूत्रपिंडाच्या ठिकाणी, हाडांच्या ठिकाणी, जननेंद्रियांच्या ठिकाणी हा रोग झालेला दिसतो. तो उग्र झाला तर एकाहून अधिक अवयवांना लागण होते व रोग्याकडून इतरांनाही संसर्ग झालेला दिसतो. हा आजार संसर्गजन्य आहे. झालेला रोग बरा करण्यासाठी, रोग साथीने पसरू नये व एकूणच प्रतकारशक्‍ती वाढवण्यासाठी धूमचिकित्सेचा खूप उपयोग होतो.

    सकाळ-संध्याकाळ घरात विशिष्ट द्रव्यांचा धूप (उदा. संतुलन प्युरिफायर धूप) नित्यनियमाने जाळण्याने रोगांचे जंतू पसरू नयेत म्हणून खूप उपयोग होतो. पूर्वी मोठ्या प्रमाणावर यज्ञ, याग वगैरेंद्वारे निर्जंतुकरण व निसर्ग संतुलन साधत असते.

    रात्री बरेच दिवस खोकला येत असला, खोकल्याची उबळ आल्यावर सारखे उठून बाहेर थुंकायला जावे लागत असले तर क्षयाची शंका घेतली जात असे. सारखे सारखे उठून बाहेर जायला लागू नये म्हणून ठेवलेली पिकदाणी व्यवस्थित बंद केली नाही, खोकताना अत्यंत काळजी घेतली नाही तर थुंकीवाटे उडालेले क्षयाचे जंतू वातावरणात तरंगत राहतात इतरांना क्षयाची लागण करू शकतात. ज्यांची प्रतकारशक्‍ती उत्तम आहे त्यांना क्षय होत नाही.

    शरीरात प्रतिकार करणाऱ्या पेशींचे सैन्य कधीही कमकुवत होता कामा नये हे क्षयरोगाच्या प्रतकारासाठी लक्षात ठेवणे खूप आवश्‍यक आहे. मधुमेहाचे रोगी, यकृताचे काम नीट न चालणाऱ्या व्यक्‍ती, एड्‌स असलेल्या व्यक्‍तीची प्रतकारशक्‍ती कमी होऊ शकत असल्याने त्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. तसेच कर्करोगी वा दीर्घकाळपर्यंत कॉर्टिझोनसारखे औषध घेतलेले रोगी यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते असे म्हणतात. गलिच्छ जागी राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, फूटपाथवर राहणारे, तुरुंगासारख्या कमी जागेत खूप गर्दीत राहणारे या सर्वांना क्षयाची बाधा होण्याची शक्‍यता अधिक असते. तेव्हा अशा गोष्टी टाळणे आवश्‍यक असते.

    क्षयरोगाचा प्रथम मारा फुप्फुसांवर होत असल्याने अति धूम्रपान वा अति मद्यपान करून फुप्फुसे कमजोर झालेल्यांना क्षयाची लागण लवकर होऊ शकते. क्षयाचा इलाज करत असणारे परिचारक वा डॉक्‍टर्स यांनाही लागणीपासून बचावण्यासाठी काळजी घ्यावी लागते.
    थोडासा ताप व बरोबर खूप दिवस चाललेला खोकला, थुकींचे बेडके पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करून योग्य सल्ला न घेतल्यास त्रास होण्याची शक्‍यता असते. केवळ गरीब वा गलिच्छ वस्तीत राहणाऱ्यांनाच नव्हे तर अनेक श्रीमंत मंडळीही क्षयाला बळी पडल्याचा इतिहास आहे.

    मानसिक ताणामुळे शरीर खालावलेले असले व त्यावरचा मानवरचा अधिकार कमी झालेला असला तरीसुद्धा क्षयाची लागण होऊ शकते. राजयक्ष्मा असे याचे दुसरे नाव आहे म्हणजे हा रोग राजांना होतो असे नव्हे तर तो सर्व रोगांचा राजा असल्यासारखा असल्याने व त्यावर ताबडतोब इलाज करणे अपेक्षित असल्याने त्याला राजयक्ष्मा म्हटले गेले असावे.

    क्षयरोगाच्या तपासणीसाठी थुंकीच्या तपासणीबरोबर छातीचा एक्‍स रे काढणेही आवश्‍यक असते. भारतासारख्या ठिकाणी क्षयरोगाचा खूप प्रसार झालेला दिसतो. प्रत्येकाला लहानपणीच क्षयावरची लस टोचलेली असल्याने प्रतकारशक्‍ती असते पण क्षयाच्या जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यास ते कुठेतरी कमकुवत ठिकाणी दबा धरून राहतात व वेळप्रसंगी बाहेर येऊन व्यक्‍तीवर घाला घालतात. म्हणून जंतू शरीरात शिरल्याचे खूप दिवसांपर्यंत कळून येत नाही. त्यामुळे चांगल्या परिस्थितीतील सर्वसामान्यालाही हा रोग होऊ शकतो. तसेच क्षयरोगाचे जंतू अति हुशार असल्याने इलाज सुरू केल्यावर रोग बरा झाल्याची लक्षणे उत्पन्न होतात पण जंतू मात्र दुसरीकडे जाऊन लपून बसतात व वेळप्रसंगी डोके वर काढून रोग वाढवितात. खोकला झालेल्या प्रत्येकाला वा तसेच कफ बाहर पडलेल्या प्रत्येकाला क्षयरोग असतो असे नसते. पण बेडक्‍यात हलके हलके रक्‍त दिसायला लागले तर मात्र क्षयाची चिकित्सा करणे नक्की आवश्‍यक ठरते.

    क्षयरोगाच्या औषधांमुळे इतर त्रास झालेले दिसल्यास दिलेली औषधे बदलणे व एकूणच इलाजदपद्धती बदलणे आवश्‍यक असते. पचनाचा वा अंग दुखण्याचा त्रास दिसल्यास क्षयाचा संशय घेऊन त्यावरचा इलाज सुरू करण्यात येतो पण रुग्णाला आराम न वाटता औषधांचा दुष्परिणाम झालेला दिसतो. अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ते उपचार करणे आवश्‍यक असते. तसेच क्षयरोग पूर्णपणे बरा झाल्याचे तपासणीत आढळत नाही तोपर्यंत नीट औषधोपचार व पथ्ये पाळणे आवश्‍यक असते.
    क्षयाच्या रोग्याला घरात ठेवूनच उपाययोजना करता येते परंतु त्याच्या थुकींची विल्हेवाट नीट लावणे आवश्‍यक असते. त्याने वापरलेले कपडे, आजूबाजूची जागा फिनेलसारखे द्रव्य वापरून निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. सध्या क्षयावर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन औषधे सापडलेली असली तरी मुळात क्षयाची लागण होऊ नये यासाठी काळजी घेणे अधिक महत्त्वाचे असते.
    क्षयाचा आजार होऊ नये असे वाटत असणाऱ्यांनी स्वच्छतेचा मंत्र पाळणे, प्रकृतीनुरूप योग्य प्रमाणात पौष्टिक व पूरक आहार घेऊन प्रतिकारशक्‍ती वाढवणे, आहारात दूध, फळे पालेभाज्या वगैरेंचा समावेश करणे, मैथुनात शरीरशक्‍तीचा अतिव्यय होणार नाही याकडे लक्ष ठेवणे, धूम्रपान, मद्यपान टाळणे आवश्‍यक असते.

    आयुर्वेदानुसार डिंकाचे लाडू, “संतुलन मॅरोसॅन’, “संतुलन शांतीरोझ” किंवा “संतुलन आत्मप्राश’सारखे रसायन सेवन करण्याने प्रतिकारशक्‍ती चांगली राहून क्षयरोगाचा यक्षप्रश्‍न सोडविता येईल.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • बद्धकोष्ठता

    बद्धकोष्ठता

    दिवसाची सुरवात मलविसर्जनाने नीट झाली, की दिवसही चांगला जातो. नाहीतर, दिवसभर कोणतं तरी ओझं वागवल्यागत वावरावं लागतं. मलविसर्जनाचं प्राकृतिक प्रमाण कायम राहणं हे स्वास्थ्याचं निदर्शक आहे. बद्धकोष्ठ म्हणजे मलविसर्जनात अडथळा असणं. म्हणजेच बद्धकोष्ठता हे अनारोग्याचं लक्षण होय. वायुदोषामुळे उद्‌भवणारे हे लक्षण म्हणजे आरोग्याच्या पुढच्या काळातील समस्यांची सूचनाच असते. बद्धकोष्ठामागील कारणांचा व त्यावरील उपाययोजनेचा आयुर्वेदानं सविस्तर विचार केला आहे.

    आयुर्वेदिक ग्रंथात मलावष्टंभ रोग म्हणून नाही, तर लक्षण म्हणून सांगितला आहे.
    मलग्रह, मलावरोध, मलस्तंभ, मलबंधन, मलनिग्रह, मलसंग, बद्धकोष्ठ अशा विविध शब्दात आपण आज ज्याला कॉन्स्टिपेशन म्हणतो त्या कष्टदायक प्रकाराचे वर्णन केले आहे.पुरीष, मूत्र आणि स्वेद हे शरीरातील तीन मुख्य मल. हे तीनही एका ठराविक काळानंतर शरीराबाहेर काढले जाणे अपेक्षित असते. त्यातील पुरीष व मूत्र उत्सर्जनाचे काम अपान वायूच्या हद्दीत येत असल्याने अपान वायूची ही जबाबदारी असते.जाठराग्नीकडून आहाराचे पचन झाले की सार भाग व टाकून द्यायचा भाग (विसर्जित होण्याचा भाग) असे विभाजन समानवायू करवी होत असते. यातील उपयुक्‍त सारभाग मुख्यत्वे छोट्या आतड्यात शोषला जातो. निःसार भाग जसजसा पुढे सरकतो तसतसा त्यातील द्रवभाग शोषला जातो आणि त्याच वेळेस पुरीष म्हणजेच मळ आकाराला येऊ लागतो. मल मोठया आतड्यातून पुढे मलाशयात पोचतो, तेथे साठतो व मलप्रवृत्तीची संवेदना होऊन मलविसर्जनाची क्रिया घडते.अशा प्रकारे मल तयार होण्यापासून विसर्जित करण्यापर्यंतची क्रिया बघितली तर एक गोष्ट लक्षात येते, की त्यात समान वायू व अपान वायू ह्या दोन वायूंचा संबंध आहे.मल कसा असावा व मलप्रवर्तन कशा प्रकारे व्हावे याचे आयुर्वेदात वर्णन केले ते असे – मलप्रवृत्ती सहज, दिवसातून एक किंवा दोन वेळा, नियमित वेळेला व्हावी, मल बांधून तरीही मऊ म्हणजे सोललेल्या केळ्यासारखा असावा. मलविसर्जनानंतर पोट साफ झाल्याची भावना व्हावी, अंग हलके व्हावे व उत्साह वाटावा.यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाल्यास तो समान-अपानाच्या कार्यात कुठेतरी अडथळा येत असल्याचा किंवा आहार-आचरणात काहीतरी बिघडत असल्याचा निर्देशक आहे असे समजावे. यालाच आयुर्वेदिक ग्रंथात मलावरोध, मलस्तंभ, मलनिग्रह वगैरे म्हटलेले आहे.

    मलावष्टंभ हे एक लक्षण म्हणून सांगितले असल्याने विविध रोगांशी किंवा बिघाडाशी संबंधित असू शकतो. त्यामुळे मलावष्टंभावर योग्य उपचार करायचा असेल तर मूळ कारण व त्यातून निर्माण झालेले असंतुलन बरे करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

    मलावष्टंभ का होतो?
    मलावष्टंभाची सर्वसाधारण कारणे याप्रकारे सांगता येतात –
    *    आहारात तिखट, कडू, तुरट रसांचा अतिरेक करणे.
    *    कोरडे म्हणजे ज्याच्यात उचित स्निग्धतेचा अभाव आहे व निःसत्त्व अन्न खाणे, उदा. तूप न लावता खाल्लेली भाकरी, पोळी; लोणी न लावलेला ब्रेड; चुरमुरे, चिवडा, पाणीपुरी सारख्या कोरड्या पदार्थांचा अतिरेक; शिळे अन्न
    *    शरीरास अनुकूल स्निग्ध पदार्थांचा अभाव. उदा. दूध, घरचे ताजे लोणी, साजूक तूप, आहारात तेल वगैरे स्निग्ध गोष्टी अजिबात न वापरणे किंवा अपुऱ्या प्रमाणात वापरणे.
    *    प्रकृतीला सहन होणार नाहीत असे उपवास करणे किंवा डाएटिंग करणे.
    *    वात वाढवणारी व पचायला जड असणारी कडधान्ये प्रकृतीचा विचार न करता खाणे, उदा. मटार, पावटा, चवळी, छोले, हरबरा वगैरे.
    *    आंबवलेले पदार्थ अधिक प्रमाणात खाणे.
    *    भूक लागलेली नसताना जबरदस्तीने खाणे.
    *    अगोदरचे अन्न पचण्याअगोदरच पुन्हा पुन्हा खात राहाणे.
    *    रात्री जागरणे करणे, तसेच दिवसा झोपणे.
    *    व्यायामाचा अभाव किंवा अतिरेक करणे.
    *    अति मानसिक चिंता करणे.
    याखेरीज वयानुसार जसजसा वात वाढतो तसतशी आतड्यांची शक्‍ती कमी होत जाते व त्यांच्यात र?क्षता उत्पन्न होते. अशा वेळी बहुधा मलावष्टंभ हे लक्षण दिसते.

    तसेच मलप्रवर्तनाची संवेदना जाणवल्यावरही जर त्याकडे दुर्लक्ष केले, अर्थात वेग अडवून ठेवला, तर त्यामुळेही मलावष्टंभ होतो. अष्टांगसंग्रहात म्हटले आहे,
    आटोपशुलौ परिकर्तिका च संगः पुरीषस्य तथोर्ध्ववातः ।

    मलप्रवर्तनाच्या वेगाचे जबरदस्तीने धारण केले तर त्याने पोटात वायू पकडतो, पोट दुखू लागते, गुदाच्या भागी कात्रीने कापल्याप्रमाणे वेदना होतात, ढेकर येऊ लागतात व मलावष्टंभ होतो.

    अपानवायूचा अपराध
    अत्यंत अनैसर्गिक व अवघड वाटणारी ही गोष्ट आज समाजातील अनेक लोकांकडून होते आहे, वेळेची कमतरता, कामाचा ताण, सोयीचा अभाव अशा एक ना एक अनेक कारणांनी हा ‘अपराध” घडला की त्याची शिक्षा आज ना उद्या भोगावी लागतेच. याखेरीज “आनाह’ या नावाने सांगितलेल्या वातरोगाच्या वर्णनातही मलावष्टंभ हे प्रमुख लक्षण आहे.

    क्रमेण निचितमामं शकृत्‌ वा भूयो विगुणानिलेन विबद्धं सत्‌ यथामार्गं न प्रवर्तते स आनाहः ।
    …सुश्रुत उत्तरतन्त्र

    साचलेला आम (योग्य प्रकारे न पचलेला व शरीरात विषस्वरूप होऊन राहिलेला आहाररस) किंवा मल, वातदोष बिघडल्यामुळे घट्ट, कडक होतो व अपान वायूने मार्ग बंद केल्यामुळे गुदद्वारातून बाहेर जाऊ शकत नाही, बरोबरीने वातही न सरू शकल्याने पोट फुगते, धड ढेकर येत नाही, धड वायू सरत नाही आणि मलप्रवृत्तीही होत नाही. अशा अवघड अवस्थेला “आनाह” असे म्हणतात.
    अशाच प्रकारे इतर अनेक वातव्याधींमध्ये, विशेषतः समान व अपानवायू बिघडून होणाऱ्या वातव्याधींमध्ये मलावष्टंभ हे लक्षण दिले आहे.

    मलावष्टंभाचे दोन प्रकार
    1. केवळ वातामुळे होणारा मलावष्टंभ – यात मल कडक, सुकलेला, खड्यासारखा किंवा गाठीप्रमाणे घट्ट असतो. या प्रकारात मलप्रवर्तन होताना दुखते, कडक मळामुळे गुदभागी जखम होऊन रक्‍तही पडू शकते. अत्यंत तीव्र अवस्थेत अक्षरशः हाताने मळ काढून टाकावा लागतो किंवा एनिमा दिल्याशिवाय मलप्रवर्तन होत नाही.

    2. आमाच्या आणि कफाचा संबंध असलेला मलावष्टंभ – यात मल चिकट, चिखलासारखा असतो. या प्रकारात फार वेळ कुंथावे लागते. एकाच वेळेस पोट साफ झाले अशी भावना कधीच वाटत नाही. कैक वेळा चिकट्याच्या स्वरूपात प्राकृत कफ शरीराबाहेर जाऊ लागल्यास मलप्रवृत्तीनंतर थकवा येतो. काही व्यक्‍तींना तर नंतर झोपावेच लागते.

    मलावष्टंभ फार दिवस राहिल्यास त्याचा परिणाम म्हणून बाकीही समस्या उद्‌भवू शकतात. उदा. डोके दुखणे, मूळव्याध, फिशर-फिश्‍च्युला, हर्निया, निद्रानाश, निरुत्साह, आळस, सर्वांग जड होणे, अंग दुखणे वगैरे.

    म्हणूनच मलावष्टंभावर वेळीच व योग्य उपचार करावेत. केवळ पोट साफ होण्यासाठी औषध घेणे किंवा पोट साफ व्हावे म्हणून सकाळी तीन – चार लिटर पाणी पिणे म्हणजे मलावष्टंभावर उपचार केला, या भ्रमात न राहणेच चांगले होय. कारण अशा उपचारांनी मूळ मलावष्टंभात भर पडत असते व दिवसेंदिवस मलावष्टंभाची तीव्रता वाढत जाऊन असहाय अवस्थेला आमंत्रणच मिळत असते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट साफ होणे हे वाताचे कार्य आहे हे आपण जाणतोच. तर मलप्रवर्तनाचे कार्य वाताच्या काळात जेवढे चांगले व पूर्णतः होईल तेवढे इतर वेळी होणार नाही हे नक्की. वाताचा काळ म्हणजे रात्रीचा अंतिम भाग व भल्या पहाटेचा सूर्योदयाच्या आसपासची वेळ. सकाळी सहा – साडेसहा पर्यंत उठून शौचाला जाण्याची सवय शरीराला लावली तर आपोआपच वाताच्या वेळात वाताचे कार्य होऊन जाईल. यामुळे मलाष्टंभाचा त्रास उद्‌भवणारच नाही. मलाष्टंभाचा त्रास असणाऱ्यांनीही ही सवय लावून घ्यावी आज ना उद्या त्याचा निश्‍चित फायदा होईल.

    बद्धकोष्ठावरील उपाय*    मलावष्टंभाची आपल्या आरोग्याच्या बाबतीतील कारणे शोधून काढून त्यानुसार आहार-आचरणात योग्य बदल करावेत.
    *    उकळलेले गरम पाणी पिणे हे कोणत्याही प्रकारच्या मलावष्टंभात एक उत्तम सहायक उपाय आहे.
    *    घरी बनवलेले साजूक तूप हेही यासाठी एक वरदानच होय. कारण ते अग्नीची ताकद वाढवते, समान वायूला संतुलित करून त्याची शक्‍ती वाढवते व अपान वायूला अनुलोमनाची गती देते त्यामुळे आहारात तर साजूक तुपाचा समावेश करावाच शिवाय रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व दोन चिमूट सैंधव मीठ टाकून प्यावे.
    *    वातप्रधान मलावष्टंभ असल्यास स्निग्ध द्रव्यांचा वापर करावा उदा. एरंडेल तेल, बहावा, मनुका, निशोत्तर वगैरे.
    *    सौम्य मलावष्टंभ असल्यास अविपत्तिकर चूर्ण, भिजवलेल्या मनुका, अंजीर वगैरे गोष्टी कामास येतात. तर तीव्र मलावष्टंभ असल्यास गंधर्वहरीतकी, सुखसारक चूर्ण वगैरे औषधांची मदत घ्यावी लागते.
    *    वातशामक औषधांनी सिद्ध तेलाचा बस्ती (आयुर्वेदिक एनिमा) हाही एक प्रभावी उपचार आहे.
    *    आम व कफाचा संबंध असणाऱ्या मलावष्टंभात आमपचनापासून सुरुवात करावी लागते त्यासाठी हिंग्वाष्टक चूर्ण, शंखवटी, आमपाचक वटीचा वापर केला जातो.तसेच आतील चिकटा काढून टाकण्यासाठी पिच्छिल म्हणजे बुळबुळीत द्रव्यांची मदत घेतली जाते. उदा. इसबगोल, अहळीव वगैरे. बरोबरीने त्रिफळा, हिरडा, सोनामुखी वगैरे मलप्रवर्तन करणाऱ्या वनस्पतीही वापरल्या जातात.
    *    पोटावर हलक्‍या हाताने तेल चोळल्यास वात सरून पोट साफ होण्यास मदत होते. वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेल असल्यास उत्तमच अथवा एरंडेलही चालू शकते.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • काळजी हृदयाची

    काळजी हृदयाची

    आयुर्वेदात “स्रोतस’ नावाची एक विशेष संकल्पना आहे. शरीरात महत्त्वाची अशी तेरा स्रोतसे असतात. प्रत्येक स्रोतसाची काही विशिष्ट कामे असतात. उदा. अन्नवहस्रोतसाचे काम अन्न स्वीकारणे, ते पचवणे, नंतर उरलेला मलभाग शरीरातून टाकून देणे असते. प्राणवहस्रोतसाचे काम श्‍वासामार्फत आलेला प्राण स्वीकारून उच्छ्वास बाहेर टाकण्याचे असते. स्रोतसाचे असे विशिष्ट अवयव असतातच, पण प्रत्येक स्रोतसाची दोन मुळे असतात. ही मुळे प्रत्यक्ष स्रोतसापासून शरीरात शारीरिकदृष्ट्या दूरही असू शकतात. पण स्रोतसाच्या कार्यकारित्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. हदय हे रसवहस्रोतसाचे व प्राणवहस्रोतसाचे मूळ असते. म्हणूनच या दोन स्रोतसांमधला बिघाड हृदयाला बाधक ठरू शकतो आणि हृदयातील दोषामुळे या दोन स्रोतसांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

    प्राणवहस्रोतसाचे एक मूळ हृदय असते, तर दुसरे मूळ असते महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग. स्रोतसाचे एक मूळ बिघडले तर त्याचा परिणाम दुसऱ्या मुळावर होणेही स्वाभाविक असते. थोडक्‍यात, रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

    स्रोतस व हृदय
    अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनम्‌ । अन्नवाहिनी दुष्यन्ति वैगुण्यात्‌ पावकस्य च ।। …चरक विमानस्थान
    अवेळी अति प्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

    रसवहस्रोतस व हृदय
    गुरुशीतमतिस्निग्धं अतिमात्रं समश्‍नताम्‌। रसवाहिनी दुष्यन्ति चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌ ।। …चरक विमानस्थान
    पचण्यास जड, अति थंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अति मात्रेत भोजन करण्याने व अति चिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो.

    कारणानुरूप ज्या कोणत्या दोषात बिघाड होतो तो दोष रसधातूला बिघडवतो. बिघडलेला रसधातू हृदयात पोचला की त्या ठिकाणी बाधा उत्पन्न करतो आणि हृद्रोग होतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते, की कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृद्रोगाची लक्षणे बदलतात. नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृद्रोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरू नये.

    वातामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे * हृद्‌शून्यभाव – हृदयात पोकळी असल्यासारखे वाटणे.
    * हृद्‌द्रव – छातीत धडधडणे. व्यायाम वा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृद्रोगात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते.
    * हृत्शोष – छातीत, हृदयात शोष पडण्यासारखे वाटणे, कोरडेपणा वाटणे.
    * हृन्भेद – हृदयाच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे.
    * हृत्स्तंभ – हृदयाचे कार्य एकाएकी थांबले आहे असे वाटणे.
    * हृदयोद्वेष्टन – छातीत पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे.
    * हृत्तोद – छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे.
    * दीनता-भय-शोकप्रतीती – एकाएकी, विशेष असे कारण नसतानाही दीन, खिन्न होणे, भीती वाटणे, शोकग्रस्त होणे.
    * शब्दासहिष्णुता – मोठा आवाज, गोंगाट, गडबड सहन न होणे.
    * वेपथुः – सर्वांगाला कापरे भरणे.
    * श्‍वासरोध – श्‍वास घेण्यास व सोडण्यास त्रास होणे.
    * अल्पनिद्रता – झोप कमी येणे.
    वातकाळात म्हणजे जेवण पचल्यावर, अगदी पहाटे वा सूर्यास्तानंतर छातीत वेदना होणे.

    पित्तामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
    * हृद्‌दाह – छातीत जळजळणे.
    * तिक्‍तास्यता – तोंडात कायम कडवट चव जाणवणे.
    * अम्लोद्‌गार – आंबट ढेकर येणे.
    * क्‍लम – अकारण थकवा वाटणे.
    * शोष – पाणी प्यायले तरी तहान न शमणे.
    * मूर्च्छा – घेरी / चक्कर येऊन खाली पडणे.
    * भ्रम – गरगरणे.
    * स्वेद – अकारण, एकाएकी घाम फुटणे.
    * अम्लच्छर्दि – आंबट चवीची उलटी होणे.
    * धूमक – हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे.
    * तमःप्रवेश- डोळ्यासमोर अंधारी येणे.
    * ज्वर – शरीरतापमान वाढणे.
    जेवणानंतर थोड्या वेळाने, भूक लागली असता वा मध्यरात्री त्रास होणे.

    कफदोष वाढल्यामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
    * हृद्‌भार – छातीत जडपणा जाणवणे.
    * हृत्स्तंभ – हृदयात जखडल्यासारखे वाटणे.
    * तंद्रा – आळस, तंद्रीत असल्यासारखे वाटणे.
    * अरुची – तोंडाला चव नसणे.
    * अग्निसाद – भूक न लागणे, अग्नीचे काम मंदावणे.
    * अतिनिद्रा – अति प्रमाणात झोप येणे.
    * आस्यमाधुर्य – तोंडात गोडसर चव राहणे.
    जेवणानंतर लगेच वा सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे.

  • उत्तरायण सुरु झाले, दिनचर्या बदला

    उत्तरायण सुरु झाले, दिनचर्या बदला

    उत्तरायण सुरु झाले
    दिनचर्या बदला
    – डॉ. श्री बालाजी तांबे
    आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
    =====================
    भारतीय कालगणनेनुसार सहा ऋतूंचे एक वर्ष असते. तीन-तीन ऋतूंचे दोन गट केले असता त्याला “अयन’ असे म्हणतात. अर्थातच संपूर्ण वर्षात दोन “अयने’ असतात. शिशिर, वसंत व ग्रीष्म या तीन ऋतूंच्या कालावधीला “उत्तरायण’ म्हणतात, तर वर्षा, शरद व हेमंत या तीन ऋतूंच्या कालावधीला “दक्षिणायन’ म्हणतात. उत्तरायणात सूर्य क्रमाक्रमाने तीव्र होत जात असल्याने उत्तरायणाला आग्नेय काल म्हणतात, तर दक्षिणायनात ढग, पाऊस, वाऱ्यामुळे सूर्याची तीव्रता कमी कमी होत असल्याने हा काळ सौम्य समजला जातो.

    सूर्याची तीव्रता वाढली की ओलावा कमी होणे, स्निग्धता कमी होणे ओघाने येतेच. उत्तरायणात म्हणजे शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूत शरीरातील स्निग्धता क्रमाक्रमाने कमी होऊन कोरडेपणा वाढणार असतो, म्हणूनच उत्तरायण सुरू होण्यापूर्वीच म्हणजे हेमंत ऋतूपासून आयुर्वेदाने अभ्यंग करण्यास सुचवले आहे.

    शिशिर व हेमंत हे ऋतू म्हणजे थंडीचे दिवस. हेमंतामध्ये थंडीला सुरवात होते आणि शिशिरात खरी थंडी असते. थंडीत हवेतील रुक्षता वाढते, हे आपण त्वचा कोरडी पडणे, फुटणे वगैरे लक्षणांवरून सहज समजू शकतो. थंडीतील रुक्षतेचा त्रास होऊ नये म्हणून थंडीत अभ्यंग करायचा असतो. थंडीत अनुभूत होणारी दुसरी गोष्ट म्हणजे थंडीत भूक जास्त लागते. भूक चांगली लागणे, हे पचनशक्‍ती चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे निदर्शक असते. पचनशक्‍ती चांगली असली की शरीरशक्‍ती वाढणे शक्‍य असते. यालाच महत्त्वाचा हातभार लावत असतो अभ्यंग. याही कारणामुळे थंडीत अभ्यंग करणे उत्तम समजले जाते.

    अभ्यंगामुळे त्वचा निरोगी राहतेच, पण शरीरदृढतेसाठी, एकंदर शरीरशक्‍ती व्यवस्थित राहण्यासाठीही अभ्यंग खूप उपयोगी असतो. चरकसंहितेत यासंबंधी सांगितले आहे…
    न चाभिघाताभिहतं गात्रमभ्यंग सेविनः ।
    विकारं भजते।त्य़र्थं बलकर्मेणि वा क्वचित्‌ ।।
    सुस्पर्शोपचितांगश्‍च बलवान्‌ प्रियदर्शिनः ।
    भवत्यभ्यंगं नित्यत्वात्‌ नरो।ल्पजर एव च ।।
    …चरक सूत्रस्थान

    नियमित अभ्यंग करणाऱ्या व्यक्‍तीला श्रम झाले तरी सहज सहन होऊ शकतात, अति श्रमाने थकवा येत नाही किंवा इतर विकार होत नाहीत. त्वचा कोमल, स्पर्शाला सुखावह वाटेल अशी होते. शरीर भरते, मनुष्य बलवान व बघत राहावा असा होतो व वृद्ध झाला तरी त्याच्यात वृद्धत्वाची लक्षणे कमीत कमी प्रकट होतात.
    प्रशान्तमारुताबाधं क्‍लेशव्यायामसंसहम्‌ ।

    नित्य अभ्यंग करणाऱ्यास वातजन्य रोग होत नाहीत. क्‍लेश, श्रम सहन होतात. व्यायाम सहन करण्याची शक्‍ती येते.
    अष्टांगहृदयात दिनचर्या सांगताना अभ्यंग रोज करावा, असे सांगितले आहे…
    अभ्यंगमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ।
    दृष्टिः प्रसादः पुष्टयायुः स्वप्नसुत्वक्‍त्वदार्ढ्यकृत्‌ ।।
    …अष्टांगहृदय सूत्रस्थान

    अभ्यंग करण्याने म्हातारपण येत नाही. म्हणजेच वय वाढले तरी म्हातारपणामुळे येणारी अशक्‍तता, परावलंबित्व येत नाही, तारुण्य टिकून राहते. श्रम सहन करण्याची क्षमता वाढते, वातदोष संतुलित राहतो, दृष्टी उत्तम राहते, शरीर पुष्ट होते (या ठिकाणी पुष्ट याचा लठ्ठ असा अर्थ अभिप्रेत नाही, तर शरीर भरणे, बलवान होणे या अर्थाने पुष्ट शब्द वापरला आहे). अभ्यंग करण्याने दीर्घायुष्याचा लाभ होतो. झोप शांत लागते. त्वचा सुकुमार, कोमल राहते. त्वचा घट्ट राहते व एकंदरीत शरीर दृढ राहते.
    अभ्यंगाचे हे सगळे फायदे जास्तीत जास्त मिळण्यासाठी थंडीचे दिवस उत्तम असतात. म्हणूनच हेमंत व शिशिर ऋतूत अभ्यंग नक्की करावा.
    आयुर्वेदात ऋतुचर्या सांगताना दोन – दोन ऋतूंचे तीन गट पाडलेले दिसतात.
    *ग्रीष्म व वर्षा ऋतूचा एक गट होतो. या काळात आहार, आचरण खूप काळजीपूर्वक करायचे असते. खाण्या-पिण्यावर संयम ठेवायचा असतो.
    *शरद व वसंत ऋतूंचा दुसरा गट होतो. या ऋतूंमध्ये शरीरशक्‍ती साधारण असते, त्यामुळे या काळात थोडीफार काळजी घेतली तर एकंदर आरोग्य टिकू शकते.
    *शिशिर व हेमंत या दोन ऋतूंमध्ये शरीरशक्‍ती उत्तम असते, त्यामुळे हा काळ शरीरशक्‍ती अधिकाधिक वाढवण्यासाठी उत्तम समजला जातो. उत्तम पोषक अन्न, च्यवनप्राश, धात्री रसायनसारखे धातुपोषक रसायन, नियमित अभ्यंग करण्याने शरीरशक्‍ती वाढवणे सहज शक्‍य असते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत अभ्यंग नियमित करणे सर्वांच्याच हिताचे असते.

    अभ्यंग शब्दात अंगाला तेल लावणे व जिरवणे अभिप्रेत असते. शास्त्रोक्‍त पद्धतीने तयार केलेले औषधी तेल शरीरात आतपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे असते. त्यामुळे वर पाहिलेले अभ्यंगाचे फायदे मिळण्यासाठी तेल औषधी असायला हवे, म्हणजेच ते वातशामक, शरीरपोषक द्रव्यांचा संस्कार केलेले असावे. नुसत्या तिळाच्या, खोबऱ्याच्या वा मोहरीच्या तेलाने अभ्यंग केल्याने अभ्यंगाचे खरे फायदे मिळू शकणार नाहीत.
    अभ्यंग करताना सहसा पायापासून सुरवात केली जाते. केसांच्या विरुद्ध दिशेने तेल लावले की आतपर्यंत जिरणे सोपे असते, असे सांगितलेले असल्याने तेल लावताना खालून वर, या दिशेने लावायचे असते.फार रगडून किंवा जोर लावून तेल लावणे, हाही एक प्रकारचा अभ्यंग असू शकतो, ज्याला संस्कृतमध्ये “मर्दन-अभ्यंग’ म्हटले जाते; पण त्यासाठी प्रशिक्षित परिचारक (थेरपिस्ट) असणे आवश्‍यक होय. आतल्या शरीरावयवांची रचना समजून घेऊन कुठल्या ठिकाणी किती दाब द्यायचा, किती वेळ चोळायचे, हे समजू शकणाऱ्या परिचारकाकडूनच “मर्दन अभ्यंग’ करून घ्यावा. एरवी आपले आपण औषधी तेल जिरविण्यानेही अभ्यंगाचे फायदे मिळू शकतात. तरफेने वजन उचलताना जसे तरफेच्या लांबीला महत्त्व असते, तसेच मसाज करत असताना दाब व वेळ, यापैकी वेळ तरफेचे काम करते. किती दाब द्यायचा याबरोबरच किती वेळ दाब द्यायचा, हेही महत्त्वाचे असते.

    थंडीत अभ्यंग करण्याचा अजून एक फायदा म्हणजे कितीही थंडी असली तरी त्वचा फुटत नाही. त्वचा कोरडी पडण्याने तडतडणे, खाज येणे वगैरे त्रास अजिबात होत नाहीत आणि शरीर उबदार राहते. अभ्यंग करण्याने एकंदरच रक्‍ताभिसरण सुधारत असल्याने शरीराला आवश्‍यक देहोष्मा कायम राहतो. हात-पाय गारठणे, सुन्न होणे वगैरे त्रासांना आपोआपच प्रतिबंध होतो.
    पादाभ्यंग हाही अभ्यंगाचाच एक प्रकार होय. पादाभ्यंग म्हणजे काशाच्या वाटीने पायाच्या तळव्यांना तूप चोळणे. पायाला अभ्यंग करण्याचेही खूप फायदे मिळतात. मुळाला पाणी घातल्याने जसे झाड सर्व बाजूंनी बहरते, तसेच पादाभ्यंग केल्याने संपूर्ण शरीराचे पोषण होते.
    खरत्वं स्तब्धतां रौक्ष्यं श्रमः सुप्तिश्‍च पादयोः ।
    सद्य एवोपशाम्यन्ति पादाभ्यंगनिषेवणात्‌ ।।
    जायते सौकुमार्यं च बलं स्थैर्यं च पादयोः ।
    दृष्टिःप्रसादं लभते मारुश्‍चोपशाम्यति ।।
    न च स्यात्‌ गृध्रसीवातः पादयोः स्फुटनं न च ।
    न सिरास्नायुसंकोचः पादाभ्यंगेन पादयोः ।।
    ….चरक संहिता
    पायांना अभ्यंग केल्यास पायांचा खरखरीतपणा, पाय जखडणे, रुक्षता, थकावट, बधिरता, मुंग्या येणे वगैरे त्रास नाहीसे होतात, पाय कोमल होतात व त्यांच्यातील बल व स्निग्धता वाढते; डोळ्यांची आग व लाली कमी होऊन डोळे प्रसन्न होतात, वाताचे शमन होते, सायटिका होत नाही, पायांना भेगा पडत नाहीत, सिरा व स्नायूंचा संकोचही होत नाही.
    संपूर्ण शरीराला अभ्यंग करता येतो, त्याचप्रमाणे विशिष्ट अवयवाला, शरीरातील विशिष्ट भागाला स्थानिक अभ्यंग करता येतो. उदा. गुडघे दुखत असल्यास फक्‍त गुडघ्यांना किंवा सांधे दुखत असल्यास फक्‍त सांध्यांना खास तेल लावण्याचा व जिरविण्याचा फायदा होतो.

    बामसारखे केवळ वेदना कमी करणारे तेल एखाद्या वेळी वापरता येते. मात्र गुडघ्यांची, सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी अभ्यंग करायचा असल्यास “शांती तेला’सारखी तेले आयुर्वेदात सांगितलेली असतात. ही तेले आतपर्यंत जिरून, वात कमी करून झीज भरून आणतात आणि खऱ्या अर्थाने उपयोगी पडतात.
    पाठीच्या मणक्‍यावरही विशेष अभ्यंग करता येतो. मणके, तसेच मणक्‍यांना धरून ठेवणारे स्नायूंचे स्तंभ यांच्यावर अभ्यंग करता येतो. मान व पाठीच्या त्रासासाठी संशोधन करून “कुंडलिनी मसाज’ नावाची विशेष अभ्यंग पद्धती मी विकसित केलेली आहे, ज्याचा फायदा स्लिप्ड डिस्क, मणक्‍यांची झीज, स्पॉंडिलायटीस असे त्रास बरे करण्यासाठी तर होतोच; पण मुळात असे त्रास होऊ नये म्हणूनही मेरुदंडाचा विशेष अभ्यंग नियमाने घेता येतो आणि त्यासाठी “कुंडलिनी’ नावाचे विशेष विकसित केलेले तेल वापरता येते.
    एकंदरच तारुण्य टिकविण्यासाठी, शरीरशक्‍ती वाढविण्यासाठी अभ्यंग हा सहज करता येण्याजोगा व अतिशय प्रभावी उपचार आहे. सध्याच्या धावपळीच्या व मानसिक ताणाने भरलेल्या जीवनशैलीसाठी तर अभ्यंग हे जणू वरदानच म्हणावे लागेल. थोडा वेळ काढून स्वतःला अभ्यंग करण्याने आणि महिन्या-दोन महिन्यांतून आयुर्वेदिक प्रशिक्षित परिचारकाकडून अभ्यंग मसाज घेण्याने आरोग्याचे रक्षण करणे सहज शक्‍य होते.