Category: पंचेंद्रिय

  • केसांची काळजी

    केसांची काळजी

    तेलाने केस खरंच वाढतात का?

    केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होईल. त्यामुळे अमुक तेल लावले, की केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
    डोळे, दात, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे गोष्टी व्यक्‍तिविशिष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्‍तीत वेगवेगळ्या असतात. तसेच केसांची ठेवण, केसांची प्रत, केसांचा रंग तसेच केसांची लांबी वगैरे गोष्टीसुद्धा प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरत असतात. म्हणूनच प्रकृतिपरीक्षणात “केस’ हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो.

    तेलाने केस वाढतात का हे समजण्यासाठी आधी केसांची मूलभूत माहिती घ्यायला हवी. आयुर्वेदाने केसांचा संबंध हाडांशी असतो असे सांगितले आहे.
    स्यात्‌ किट्टं केशलोमास्थ्नो ।
    …चरक चिकित्सास्थान
    अस्थिधातूचा मलभाग म्हणजे केस व रोम होत. अस्थिधातू तयार होतानाच केस तयार होतात व म्हणूनच केसांचा हाडांशी खूप जवळचा संबंध असतो. हाडे अशक्‍त झाली तर त्याचा केसांवर दुष्परिणाम होतो असेही आयुर्वेदात सांगितले आहे.
    केशलोमनखश्‍मश्रुद्विजप्रपतनं श्रमः ।
    ज्ञेयमस्थिक्षये लिं सन्धिशैथिल्यमेव च ।।
    ….. चरक सूत्रस्थान
    केस, रोम, नख, दाढी-मिशांचे केस गळणे तसेच दात तुटणे, फार परिश्रम न करताही थकवा जाणवणे, सांध्यांमध्ये शिथिलता जाणवणे ही सर्व लक्षणे हाडांचा क्षय झाल्यामुळे उद्‌भवतात.

    प्रकृतीनुसारही केस निरनिराळे असतात. कफप्रकृतीचे केस आदर्श म्हणावे असे असतात. दाट, मऊ, लांब व सहसा न गळणारे, न पिकणारे केस कफाचे असतात, पित्तप्रकृतीमध्ये केस गळण्याची, पिकण्याची प्रवृत्ती बरीच असते, तसेच पित्ताचे केस मऊ असले तरी फार दाट नसतात. वातप्रकृतीचे केस राठ असतात, केसांची टोके दुभंगणे, केस तुटणे व गळणे वगैरे लक्षणे वातप्रकृतीमध्ये दिसतात.
    आनुवंशिकतेचाही केसांशी संबंध असू शकतो. आजीचे, आईचे लांब केस असण्याची प्रवृत्ती असली तर मुलीचेही केस लांब असण्याची शक्‍यता मोठी असते, अर्थात आनुवंशिकता प्रकृतीमध्ये अंतर्भूत असतेच.

    या सर्व माहितीवरून लक्षात येऊ शकते की केसांवर प्रकृतीचा व हाडांचा मोठा प्रभाव असतो.

    केशवर्धनासाठी योग व तेले
    केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग दिलेले आहेत, अनेक तेलेही सांगितली आहेत की ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहील व केस वाढतील. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर शरीरस्वभावाच्या मर्यादेतच होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. अमुक तेल लावले की माझे केस लांबसडक होतीलच अशी खोटी आशा बाळगण्यात अर्थ नाही.
    बऱ्याचदा केसांच्या बाबतीत फक्‍त बाह्योपचार पुरेसे आहेत असे समजले जाते. अमुक तेल लावले, अमुक पदार्थ वापरून केस धुतले की चांगले राहतील, वाढतील अशी अपेक्षा ठेवली जाते, मात्र त्याहून अधिक महत्त्व अस्थिपोषक द्रव्ये घेण्याला असते. दूध, खारीक, शतावरी कल्प, नैसर्गिक कॅल्शियम असणारी शंखभस्म, प्रवाळभस्म, कुक्कुटाण्डत्वक्‌ यांसारखी द्रव्ये केसांच्या आरोग्यासाठी बाह्योपचारापेक्षा अधिक उपयुक्‍त असतात. बऱ्याचदा असे दिसते की हाडांशी संबंधित विकारांवर उपचार करत असता केसांमध्ये अनपेक्षित सुधारणा होताना दिसते किंवा च्यवनप्राश, सॅनरोझसारखी एकंदर प्रतिकारशक्‍ती वाढवणारी रसायने नियमित सेवन केली, प्रकृतीनुरूप आहार-आचरणाने दोष संतुलित ठेवता आले तर केस गळायचे थांबतात, काही लोकांचे अकाली पांढरे झालेले केस काळे होताना
    दिसतात.

    केसांची निगा राखण्यामध्ये तेल लावणे महत्त्वाचे असते यात संशय नाही. अस्थिधातू, केस हे शरीरघटक वाताच्या आधिपत्याखाली येतात आणि वात म्हटला की त्याला संतुलित ठेवण्यासाठी तेलासारखा दुसरा श्रेष्ठ उपचार नाही. केसांना तेल लावण्याने त्यांच्यातला वात नियंत्रित राहतो, अर्थातच केस तुटणे, कोरडे होणे, दुभंगणे, गळणे या सर्वांना प्रतिबंध होतो.
    केसांच्या मुळाशी तेल लावल्याने केस मजबूत व्हायला मदत मिळते. डोक्‍यात कोंडा होणे, खवडे होणे वगैरे त्रास सहसा होत नाहीत, मात्र हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेल चांगल्या प्रतीचे, केश्‍य म्हणजे केसांना हितकर द्रव्यांनी सिद्ध केलेले असावे लागते. असे सिद्ध तेल केसांच्या मुळांना लावले की लगेचच आतपर्यंत शोषले जाते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य नीट राहायला मदत मिळते. मात्र कच्चे तेल म्हणजे ज्याच्यावर अग्निसंस्कार झालेला नाही असे तेल कितीही शुद्ध असले, भेसळमुक्‍त असले तरी ते आतपर्यंत जिरण्यास अक्षम असल्याने केसांना तेलकटपणा आणण्याशिवाय फारसे उपयोगी पडत नाही. उलट केस तेलकट झाले की तेल काढून टाकण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून बनविलेले शांपू, साबण वापरावे लागतात, ज्यांचे वेगळे दुष्परिणाम होऊ शकतात.

    केस निरोगी हवेत
    तेल लावण्याने केसांचे आरोग्य सुधारत असल्याने काही प्रमाणात केस लांब होण्यासाठीही फायदा होऊ शकतो; पण त्या लांब होण्याला प्रकृतीची, वयाची, एकंदर शरीरशक्‍तीची मर्यादा राहील हे लक्षात घ्यायला हवे.
    केसांच्या लांबीची चर्चा करताना एक गोष्ट समजून घ्यायला हवी की केस नुसतेच लांब असण्यापेक्षा ते निरोगी असणे अधिक महत्त्वाचे असते. मूळचे लांब केसही गळत असले, तुटत असले आणि निर्जीव दिसत असले तर आकर्षक वाटणे शक्‍य नसते. त्यामुळे केसांची नुसती लांबी वाढविण्याच्या मागे न लागता केस बळकट राहतील, छान तेजस्वी राहतील, काळे राहतील याकडे लक्ष द्यायला हवे.

    आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून उपाय
    केश्‍य द्रव्यांनी सिद्ध केलेले व आतपर्यंत जिरणारे “संतुलन व्हिलेज हेअर तेला’सारखे तेल केसांना नियमितपणे लावणे केसांसाठी उत्तम असते. कृत्रिम रंग, गंध घालून तयार केलेले तेल टाळणेच श्रेयस्कर होय.
    केस धुण्यासाठी रासायनिक द्रव्यांपासून तयार केलेली उत्पादने वापरण्याऐवजी नैसर्गिक द्रव्ये, उदा., शिकेकाई, रिठा, नागरमोथा वगैरेंचे मिश्रण किंवा तयार “संतुलन सुकेशा’ वापरणे चांगले असते.
    आठवड्यातून दोन वेळा केस धुवावे.
    केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
    आठवड्यातून एकदा, केस धुण्याआधी केसांच्या मुळाशी लिंबाची फोड चोळून नंतर अर्धा तास कोरफडीचा गर लावून ठेवण्यानेही केसांचे आरोग्य चांगले राहते. केस गळणे, कोंडा होणे वगैरेंना प्रतिबंध होतो.
    आहारात दूध, खारीक, शतावरी कल्प, “कॅल्सिसॅन’, “सॅनरोझ’ वगैरेंचा समावेश असू द्यावा.
    उन्हात फिरताना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी उपाय योजणे, उष्णतेजवळ किंवा संगणकावर काम असल्यास, रात्रीची जागरणे किंवा रात्रपाळी असल्यास पित्त कमी करण्यासाठी “सॅनकूल चूर्ण’, “संतुलन पित्तशांती गोळ्या’, नियमित पादाभ्यंग वगैरे उपाय योजणेही केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असते.

  • त्वचेची काळजी

    त्वचेची काळजी

    त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होते आहे की नाही हे अचूकपणे सांगणारा आरसाही असते. म्हणूनच त्वचेवर झालेला बदल त्रासदायक असला – नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही.
    प्रथमदर्शनीचा प्रभाव ज्या महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतो, त्यातील एक म्हणजे त्वचा. बऱ्याचदा त्वचेचे सौंदर्य गोरा-सावळा-काळा अशा रंगात मोजले जाते. पण त्वचेची खरी आकर्षकता असते ती सतेजतेत. सावळ्या-काळ्या रंगाची त्वचाही सतेज असली, तर आकर्षक वाटते.
    त्वचा हा एक अवयव आहे आणि ती स्पर्शेन्द्रियाचे स्थानही आहे. दोन्ही दृष्टीने त्वचेची नीट काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होते आहे की नाही हे अचूकपणे सांगणारा आरसाही असते. म्हणूनच त्वचेवर झालेला बदल त्रासदायक असला – नसला तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चांगले नाही किंवा त्वचेवरील पुरळ, गळू, फोड वगैरे नुसतेच दाबून टाकणेही योग्य नाही. त्वचा खूप संवेदनशील असते. ऊन, उष्णता, रासायनिक पदार्थ, अति थंडी, जोराचा वारा वगैरे गोष्टींचा इतकेच नाही, तर मानसिक भावनांचाही त्वचेवर परिणाम होऊ शकतो. वयानुसार शरीरात जे बदल होत असतात, त्यानुसारही त्वचा बदलत जाते. उदा. मुलगा-मुलगी वयात येताना चेहऱ्यावर तारुण्यपीटिका येतात. स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपणानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर चेहऱ्यावर वांग येऊ शकतात वगैरे. पण त्वचा निरोगी राहावी, सतेज राहावी यासाठी प्रयत्नशील राहता येते. तारुण्यात पदार्पण केल्याचे एक लक्षण म्हणून तारुण्यपीटिकांकडे पाहिले तरी त्यामुळे ऐन तारुण्यात तोंड लपविण्याची पाळी येऊ नये यासाठी नक्की प्रयत्न करता येतात.

    त्वचेची निर्मिती
    मुळात त्वचा कशी तयार होते हे आपण पाहू.
    गर्भे शुक्रशोणितस्याभिपच्यमानस्य क्षीरस्य संतानिका इव सप्त त्वचो भवन्ति ।…सुश्रुत शारीरस्थान

    ज्याप्रमाणे दूध तापत असता त्यावर साय येते, त्याप्रमाणे शुक्र व आर्तव म्हणजे पुरुषबीज व स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ बनत असताना त्वचा तयार होते. थोडक्‍यात त्वचेमध्ये सातही धातू अभिव्यक्‍त झालेले असतात. आणि म्हणूनच त्वचा आरोग्याचा आरसा असते.
    त्वचा निरोगी असणे म्हणजे नेमके काय हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे,
    स्निग्धश्‍लक्ष्णमृदुश्‍लक्ष्णमृदुप्रसन्नसूक्ष्माल्पगम्भीरसुकुमारलोमा सप्रभेव त्वक्‌ चास्य भवति ।…चरक विमानस्थान

    स्निग्ध – त्वचा उचित प्रमाणात स्निग्ध असावी. अतिशय तेलकट त्वचाही चांगली नाही किंवा खूप कोरडी त्वचाही चांगली नाही. श्‍लक्ष्ण, मृदु – त्वचा मऊ व नाजूक असावी. अतिशय राकट, खरखरीत त्वचा असणे चांगले नाही.
    प्रसन्न – त्वचा प्रसन्न म्हणजे आकर्षक, बघितल्यावर प्रसन्नता देणारी असावी, काळवंडलेली नसावी, त्वचेवर कुठेही रॅश, पिटीका, फोड, डाग वगैरे नसावेत.
    सूक्ष्म – त्वचा पातळ असावी. खूप जाड, निबर त्वचा असणे आरोग्याचे लक्षण नाही.

    अल्प-गंभीर-सुकुमार-लोमा – त्वचेवरची लव अल्प असावी, खोलवर मूळ असलेली असावी आणि नाजूक सुकुमार अशी असावी.
    सप्रभा – सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्वचा सतेज असावी. रंग कोणताही असला तरी जर त्वचेवर सतेजता असली तर ती आकर्षकच वाटते.
    जखम लवकर भरून येणे आणि त्या ठिकाणची त्वचा बाजूच्या त्वचेच्या रंगासारखी होणे हे सुद्धा त्वचा निरोगी असण्याचे लक्षण असते. अजिबात घाम येत नसला किंवा नेहमीपेक्षा फारच अधिक प्रमाणात घाम येऊ लागला तर ते त्वचारोगाचे पूर्वरूप समजले जाते.

    आहार आणि आचार
    त्वचा निरोगी राहावी, आकर्षक असावी असे कोणाला वाटणार नाही? वय वाढले तरी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू नये असे कोणाला वाटणार नाही? आहार-आचरणात थोडे पथ्य सांभाळले, थोडे नियम पाळले तर हे नक्कीच शक्‍य होईल. आहारातील अपथ्य आणि आचरणातील नियम पुढीलप्रमाणे होत.
    – दूध व फळे; मुगाची खिचडी व दूध; दूध व मीठ; दुधाबरोबर लसूण, मुळा, शेवग्याच्या शेंगा वगैरे पदार्थ एकत्र करून खाणे त्वचेसाठी अपथ्यकर होय.
    – रोज दही खाणे, मासे, अति प्रमाणात मीठ, अति प्रमाणात आंबट पदार्थ, तीळ, गवार, वांगे, ढोबळी मिरची, उडीद, शेतातले नवे अन्न या गोष्टी अपथ्यकर होय.
    – उन्हात फार वेळ राहण्यानेही त्वचा खराब होऊ शकते.
    – पोटभर जेवल्यावर लगेचच धावपळीचे काम किंवा व्यायाम करणे हे सुद्धा त्वचेसाठी अहितकर होय.
    – उलटीचा वेग दाबून ठेवल्यानेही त्वचा बिघडू शकते.
    – उन्हातून आल्यावर किंवा अन्य काही कारणाने शरीर तापले असताना लगेच थंड पाणी पिण्याने किंवा थंड पाण्याने स्नान करण्याने त्वचा खराब होऊ शकते.
    – दिवसा झोपण्याने सुद्धा त्वचारोग होऊ शकतात.
    – ज्ञानी, गुरुजनांचा अपमान करण्याने, चोरी-व्यभिचारादी वाईट कर्मे करण्यानेही त्वचा खराब होऊ शकते, असे आयुर्वेद सांगतो.

    त्वचेच्या आश्रयाने स्पर्शेन्द्रिय सुद्धा राहात असते. म्हणजे स्पर्शज्ञानाची महत्त्वाची जबाबदारीसुद्धा त्वचेवर असते. म्हणूनच सौंदर्य व आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी ज्यावर अवलंबून असतात, त्या त्वचेची काळजी आवर्जून घ्यायला हवी.

    सतेज त्वचेसाठी हे कराच!
    त्वचेसाठी हितावह असे काही साधे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.
    – दुधावरची साय त्वचेसाठी खूप चांगली असते. चेहरा, हात, मान वगैरे नाजूक त्वचा असणाऱ्या ठिकाणी १५-२० मिनिटांसाठी साय लावून नंतर कोमट पाण्याने धुणे.
    – झोपण्यापूर्वी नाकात साजूक तुपाचे किंवा औषधांनी सिद्ध तुपाचे थेंब टाकण्यानेही त्वचेचे आरोग्य, विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेचे आरोग्य चांगले राहायला मदत मिळते. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे वगैरे तक्रारींना प्रतिबंध होतो.
    – त्वचा कोरडी होणे, फुटणे, तळपाय-तळहाताला भेगा पडणे, त्वचा काळवंडणे, निस्तेज होणे, अकाली सुरकुतणे वगैरे त्रास वातदोषाच्या असंतुलनातून होत असतात. यावर आहारात दूध, लोणी वगैरे उचित स्निग्ध पदार्थांचा समावेश करणे, अभ्यंग, उटणे, नस्य वगैरे उपायांचा फायदा होतो.
    – त्वचा लालसर होणे, गांधी उठणे, चेहऱ्यावर वांग उठणे, पीटिका येणे, गळू होणे, तळहात-तळपायातून रक्‍त येणे वगैरे त्रास मुख्यत्वे पित्तदोषाच्या असंतुलनातून होऊ शकतात. यावर नियमित पादाभ्यंग, गुलकंद-मोरावळ्यासारख्या थंड गोष्टी खाणे, रात्री जागरणे न करणे वगैरे उपाय करता येतात.

    त्वचेमधले बिघाड हे बऱ्याचदा हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळेही होऊ शकतात. अशा वेळी मात्र तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ला घेणेच चांगले असते.

    अति ऊन, उष्णता वगैरे गोष्टीं त्वचेसाठी हानिकारक आहेत
    अति थंडी, जोराचा वारा वगैरे गोष्टीं त्वचेसाठी हानिकारक आहेत
    शक्यतो रासायनिक पदार्थ त्वचेवर लावणे टाळावे
    रात्री झोपण्यापूर्वी किंवा स्नानापूर्वी एक – दोन तास तेल जिरवावे

    सुगंधी वनस्पतींच्या उटण्याने स्नान करण्याने त्वचा सतेज होते, वर्ण उजळतो व त्वचारोगांना प्रतिबंध होतो

     स्नानाच्या आधी पाच – सात मिनिटांसाठी कोरफडीचा ताजा गर लावून ठेवता येतो.

    गर्भवतीचा आहार व बाळाची त्वचा
    त्वचा निरोगी राहावी, वर्ण उजळावा यासाठी सुरुवातीपासून काळजी घेता येते. अगदी गर्भवती स्त्रीच्या आहार-आचरणावर जन्मणाऱ्या बालकाच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते. गर्भारपणात दूध, लोणी, तूप, पंचामृत, केशर, सुवर्णवर्ख, शहाळ्याचे पाणी, गोड व ताज्या फळांचे रस वगैरे गोष्टींचे नियमित सेवन करण्याने त्वचेची मूळ जडणघडण व्यवस्थित होण्यास मदत मिळते, त्वचेची सतेजता, नितळता व एकंदरच निरोगित्व सुधारू शकते. त्वचेला हितकर असणाऱ्या दूध, लोणी वगैरे गोष्टी एकंदर आरोग्यासाठीही चांगल्या असतात.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • डोळ्यांची काळजी

    डोळ्यांची काळजी

    आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो.
    डोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सर्वच इंद्रिये संपन्न असायला हवीत हे खरे असले तरी त्यातल्या त्यात डोळे अग्रणी ठरावेत. अष्टांगसंग्रहात डोळ्यांचे महत्त्व अशा प्रकारे सांगितले आहे,

    चक्षुरक्षायां सर्वकालं मनुष्यैःयत्नः कर्तव्यो जीविते यावदिच्छा ।व्यर्थो लोको।य़ं तुल्यरात्रिनिन्दवानांपुंसामन्धानां विद्यमाने।पि वित्ते ।।
    … अष्टांगसंग्रह उत्तरस्थान

    जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मनुष्याने डोळ्यांच्या रक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. अंध व्यक्‍तीजवळ धन-संपत्ती असली तरी त्याच्यासाठी दिवस व रात्र एकच असल्याने सर्वच व्यर्थ होते.

    डोळे अतिशय संवेदनशील तसेच नाजूक असतात. बाह्य वातावरण, शरीरातील दोष-धातूंची स्थिती एवढेच नाही तर मानसिक अवस्थेचाही डोळ्यांवर चांगला-वाईट परिणाम होत असतो. दृष्टी म्हणजेच दिसण्याची क्रिया योग्य असण्यासाठी दर्शनग्रहण करणारे चक्षुरेंद्रिय तर चांगले हवेच पण ते ज्या आधारे राहते ते डोळेरूपी अवयवही उत्तम असायला हवेत.

    चष्मा लागतो म्हणजेच दृष्टी किंवा नजर कमकुवत होते. यामागे अनेक बिघाड असू शकतात. या बिघाडांची अनेक कारणे असू शकतात. सगळेच बिघाड झटपट दूर होतील असे नाही पण आयुर्वेदशास्त्रात नेत्ररोगाची कारणे, प्रकार व उपचार यांची सविस्तर माहिती दिलेली आढळते.

    सुश्रुतसंहितेमध्ये ७६ प्रकारचे नेत्ररोग वर्णन केलेले आहेत, तर वाग्भटाचार्यांच्या मते ९४ प्रकारचे नेत्ररोग आहेत. नेत्रदोषाचे निदान करताना तो वातदोषातील बिघाडामुळे झाला आहे का पित्तदोषातील असंतुलनामुळे झाला आहे का कफदोष अति प्रमाणात वाढल्यामुळे झाला आहे हे मुख्यत्वाने पहावे लागते, तसेच रक्‍तात बिघाड झाल्याने, शरीरधातूंची ताकद कमी झाल्याने दृष्टी खालावते आहे का होही पाहावे लागते. अर्थातच उपचारांचे स्वरूप व उपचारांचा कालावधी त्या अनुषंगाने बदलत जातो.

    सर्वसाधारणपणे नेत्ररोगावर खालील प्रकारचे उपचार केले जातात.

    नेत्रबस्ती (नेत्रतर्पण) – यामध्ये उडदाच्या पिठाच्या सहायाने डोळ्यांभोवती पाळे तयार केले जाते व त्यात डोळा, पापण्या व पापण्यांचे केस बुडतील एवढ्या प्रमाणात औषधांनी सिद्ध केलेले तेल अथवा तूप भरले की डोळ्यांची उघडझाप करायची असते आणि साधारणपणे १५ ते २५ मिनिटांपर्यंत अशी नेत्रबस्ती घ्यायची असते. रोगाच्या अवस्थेनुसार ही नेत्रबस्ती रोज वा एक दिवसा आड घेता येते. नेत्रबस्तीमुळे डोळ्यांची ताकद तर वाढतेच पण दृष्टीही सुधारू शकते. नेत्रबस्तीत वापरलेल्या औषधी द्रव्यांचा परिणाम दृष्टिनाडीपर्यंत सुद्धा पोचू शकतो.

    नस्य – सिद्ध घृत वा तेल नाकामध्ये टाकणे म्हणजे नस्य होय. नाक, कान व डोळे ही तिन्ही इंद्रिये एकमेकांशी संबंधित असतात हे सर्वज्ञातच आहे. आयुर्वेदात तर या तिन्ही इंद्रियांचा शिरामध्ये ज्या एका बिंदूपाशी संयोग होतो त्याला “शृंगाटक मर्म’ अशी संज्ञा दिलेली आहे. नस्याद्वारे औषध शृंगाटक मर्मापर्यंत पोचले की त्याचा डोळ्यांवर, दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणूनच दृष्टी सुधारण्यासाठी नस्य हा एक महत्त्वाचा उपचार असतो.

    शिरोबस्ती – नेत्रबस्तीमध्ये जसे डोळ्यांभोवती पाळे बांधले जाते, तसेच शिरोबस्तीमध्ये डोक्‍यावर उंच टोपी घातल्याप्रमाणे उडदाच्या पिठाच्या व चामड्याच्या साहाय्याने पाळे बांधले जाते व त्यात सिद्ध घृत वा सिद्ध तेल ३० ते ९० मिनिटांपर्यंत भरून धारण केले जाते. या उपचारांचा डोळ्यांशी प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी प्रत्यक्षात त्याचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी तसेच नेत्ररोगनिवारणासाठी होताना दिसतो.

    पुटपाक – नेत्रबस्तीप्रमाणेच या उपचारामध्ये वनस्पतीचा ताजा रस डोळ्यांवर धारण केला जातो. ज्या द्रव्यांचा रस निघत नाही अशा द्रव्यांचा रस पुटपाक पद्धतीने काढला जातो.

    अंजन – डोळ्यात काजळाप्रमाणे औषध घालणे म्हणजे अंजन करणे होय. अंजन ज्या द्रव्यांपासून बनविले जाते त्यानुसार त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य असते. काही अंजनांमुळे डोळ्यांचे प्रसादन होते म्हणजेच डोळ्यांचा थकवा दूर होतो. संगणक वगैरे प्रखर गोष्टींकडे सातत्याने बघितल्यामुळे येणारा डोळ्यांवरचा ताण नाहीसा होण्यास मदत मिळते. उदा. “सॅन अंजन -क्‍लिअर’. काही अंजनांमुळे डोळ्यातील अतिरिक्‍त कफ वाहून जातो व डोळे स्वच्छ होतात. उदा. रसांजन

    नेत्रधावन – त्रिफळा, लोध्र वगैरे द्रव्यांच्या काढ्याने डोळे धुणे म्हणजे नेत्रधावन. यामुळे जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो, डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते, कंड, चिकटपणा वगैरे त्रास दूर होतात.

    वर्ती – डोळ्यांना व दृष्टीला हितकर असणारी द्रव्ये घोटून, वाळवून वातीप्रमाणे बारीक वर्ती (लांबुडकी मात्रा) केली जाते व ती मध, त्रिफळा काढा वगैरे द्रवात बुडवून डोळ्यामध्ये फिरवली जाते किंवा उगाळून घातली जाते. यामुळे डोळ्यांची शक्‍ती वाढते, विविध नेत्ररोग बरे होतात, दृष्टी सुधारण्यासाठी मदत मिळते.

    चक्षुष्य बस्ती – मध, तेल, शतपुष्पा, एरंडमूळ, ज्येष्ठमध वगैरे द्रव्यांपासून तयार केलेली चक्षुष्य बस्ती बस्तीरूपाने (आयुर्वेदिक एनिमा) घेण्यानेही दृष्टी सुधारायला मदत मिळते.

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी, दृष्टी सुधारण्यासाठी हे उपचार उत्तम असतातच, बरोबरीने डोळ्यांना हितकर द्रव्यांचे सेवन करण्याचाही चांगला उपयोग होताना दिसतो. त्रिफळा हे चूर्ण डोळ्यांसाठी उत्तम असते, विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण मध व तुपासह घेणे हितकारक असते. त्रिफळा, दारुहळद वगैरे द्रव्यांपासून बनविलेले त्रिफळा घृत, जीवनीय गणातील औषधांचा विशेष संस्कार केलेले “संतुलन सुनयन घृत’ यांचाही नेत्ररोगावर खूप चांगला उपयोग होतो. नवायास लोह, रौप्य भस्म, मौक्‍तिक भस्म वगैरे औषधी योगही डोळ्यांसाठी उत्तम असतात.

    नेत्ररोग झाल्यावर किंवा चष्मा लागल्यावर उपचार करण्यापेक्षा डोळे निरोगी राहण्यासाठी अगोदरपासून काळजी घेणे निश्‍चितच चांगले असते. त्यादृष्टीने डोळ्यात आयुर्वेदिक अंजन घालणे, नेत्र्य द्रव्यानी सिद्ध तेल उदा., “संतुलन सुनयन तेल’ टाकणे, पादाभ्यंग करणे, तोंडात थोडे पाणी घेऊन व गाल फुगवून बंद डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारणे, जेवणानंतर दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासून डोळ्यांना लावणे यासारखे साधे सोपे पण प्रभावी उपचार करता येतात.

    डोळ्यांसाठी विशेष हितकर पदार्थ – मूग, जव, लाल तांदूळ, जुने तूप, कुळीथ सूप, पेज, कण्हेरी, गाजर, मेथी, पालक, पपई, सुरण, परवर, वांगे, काकडी, मुळा, मनुका, गाईचे दूध, तूप, साखर, धणे, सैंधव, मध, वगैरे आहारातील गोष्टी; पुनर्नवा, माका, कोरफड, त्रिफळा, चंदन, कापूर, लोध्र वगैरे औषधी द्वव्ये.

    डोळ्यांसाठी अहितकर गोष्टी – क्रोध, शोक, मैथुन, अश्रू-वायू-मूत्र वगैरे वेगांचा अवरोध करणे, रात्री जड भोजन करणे, सातत्याने उन्हात किंवा उष्णतेसन्निध राहणे, फार बोलणे, वमन, अतिजलपान, दही, पालेभाज्या, टरबूज, मोड आणलेली कडधान्ये, मासे, मद्य, पाण्यातील प्राणी, मीठ, अतिशय तिखट, अतिशय आंबट व जड अन्नपान, मोहरीचे तेल, रात्रीचे जागरण वगैरे.

    डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी

    रात्री उशिरापर्यंत जागू नये, लवकर झोपावे. रात्री नाकात साजूक तुपाचे थेंब टाकावेत.

    टी.व्ही., संगणकाचा स्क्रीनकडे सतत पाहू नये.

    मोबाईल वा तेजस्वी प्रकाशाकडे सतत पाहू नये.

    शुद्ध आयुर्वेदिक काजळ (सौंदर्य प्रसाधनातील नव्हे), अंजन नित्य वापरावे. पुरुषांना काळे काजळ घालणे योग्य वाटत नसले तर “संतुलन काजळ- क्‍लिअर’ वापरावे. “संतुलन सुनयन घृता’ सारखे योग नियमित वापरावेत.

    दूध, लोणी, गाजर, मेथी, पालक, पपई वगैरे भाजीपाला व फळे आहारात अवश्‍य सेवन करावे.