Category: दैनिक आरोग्य

  • उत्तरायण सुरु झाले, दिनचर्या बदला

    उत्तरायण सुरु झाले, दिनचर्या बदला

    उत्तरायण सुरु झाले
    दिनचर्या बदला
    – डॉ. श्री बालाजी तांबे
    आत्मसंतुलनव्हिलेज, कार्ला 410 405
    =====================
    भारतीय कालगणनेनुसार सहा ऋतूंचे एक वर्ष असते. तीन-तीन ऋतूंचे दोन गट केले असता त्याला “अयन’ असे म्हणतात. अर्थातच संपूर्ण वर्षात दोन “अयने’ असतात. शिशिर, वसंत व ग्रीष्म या तीन ऋतूंच्या कालावधीला “उत्तरायण’ म्हणतात, तर वर्षा, शरद व हेमंत या तीन ऋतूंच्या कालावधीला “दक्षिणायन’ म्हणतात. उत्तरायणात सूर्य क्रमाक्रमाने तीव्र होत जात असल्याने उत्तरायणाला आग्नेय काल म्हणतात, तर दक्षिणायनात ढग, पाऊस, वाऱ्यामुळे सूर्याची तीव्रता कमी कमी होत असल्याने हा काळ सौम्य समजला जातो.

    सूर्याची तीव्रता वाढली की ओलावा कमी होणे, स्निग्धता कमी होणे ओघाने येतेच. उत्तरायणात म्हणजे शिशिर, वसंत व ग्रीष्म ऋतूत शरीरातील स्निग्धता क्रमाक्रमाने कमी होऊन कोरडेपणा वाढणार असतो, म्हणूनच उत्तरायण सुरू होण्यापूर्वीच म्हणजे हेमंत ऋतूपासून आयुर्वेदाने अभ्यंग करण्यास सुचवले आहे.

    शिशिर व हेमंत हे ऋतू म्हणजे थंडीचे दिवस. हेमंतामध्ये थंडीला सुरवात होते आणि शिशिरात खरी थंडी असते. थंडीत हवेतील रुक्षता वाढते, हे आपण त्वचा कोरडी पडणे, फुटणे वगैरे लक्षणांवरून सहज समजू शकतो. थंडीतील रुक्षतेचा त्रास होऊ नये म्हणून थंडीत अभ्यंग करायचा असतो. थंडीत अनुभूत होणारी दुसरी गोष्ट म्हणजे थंडीत भूक जास्त लागते. भूक चांगली लागणे, हे पचनशक्‍ती चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे निदर्शक असते. पचनशक्‍ती चांगली असली की शरीरशक्‍ती वाढणे शक्‍य असते. यालाच महत्त्वाचा हातभार लावत असतो अभ्यंग. याही कारणामुळे थंडीत अभ्यंग करणे उत्तम समजले जाते.

    अभ्यंगामुळे त्वचा निरोगी राहतेच, पण शरीरदृढतेसाठी, एकंदर शरीरशक्‍ती व्यवस्थित राहण्यासाठीही अभ्यंग खूप उपयोगी असतो. चरकसंहितेत यासंबंधी सांगितले आहे…
    न चाभिघाताभिहतं गात्रमभ्यंग सेविनः ।
    विकारं भजते।त्य़र्थं बलकर्मेणि वा क्वचित्‌ ।।
    सुस्पर्शोपचितांगश्‍च बलवान्‌ प्रियदर्शिनः ।
    भवत्यभ्यंगं नित्यत्वात्‌ नरो।ल्पजर एव च ।।
    …चरक सूत्रस्थान

    नियमित अभ्यंग करणाऱ्या व्यक्‍तीला श्रम झाले तरी सहज सहन होऊ शकतात, अति श्रमाने थकवा येत नाही किंवा इतर विकार होत नाहीत. त्वचा कोमल, स्पर्शाला सुखावह वाटेल अशी होते. शरीर भरते, मनुष्य बलवान व बघत राहावा असा होतो व वृद्ध झाला तरी त्याच्यात वृद्धत्वाची लक्षणे कमीत कमी प्रकट होतात.
    प्रशान्तमारुताबाधं क्‍लेशव्यायामसंसहम्‌ ।

    नित्य अभ्यंग करणाऱ्यास वातजन्य रोग होत नाहीत. क्‍लेश, श्रम सहन होतात. व्यायाम सहन करण्याची शक्‍ती येते.
    अष्टांगहृदयात दिनचर्या सांगताना अभ्यंग रोज करावा, असे सांगितले आहे…
    अभ्यंगमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा ।
    दृष्टिः प्रसादः पुष्टयायुः स्वप्नसुत्वक्‍त्वदार्ढ्यकृत्‌ ।।
    …अष्टांगहृदय सूत्रस्थान

    अभ्यंग करण्याने म्हातारपण येत नाही. म्हणजेच वय वाढले तरी म्हातारपणामुळे येणारी अशक्‍तता, परावलंबित्व येत नाही, तारुण्य टिकून राहते. श्रम सहन करण्याची क्षमता वाढते, वातदोष संतुलित राहतो, दृष्टी उत्तम राहते, शरीर पुष्ट होते (या ठिकाणी पुष्ट याचा लठ्ठ असा अर्थ अभिप्रेत नाही, तर शरीर भरणे, बलवान होणे या अर्थाने पुष्ट शब्द वापरला आहे). अभ्यंग करण्याने दीर्घायुष्याचा लाभ होतो. झोप शांत लागते. त्वचा सुकुमार, कोमल राहते. त्वचा घट्ट राहते व एकंदरीत शरीर दृढ राहते.
    अभ्यंगाचे हे सगळे फायदे जास्तीत जास्त मिळण्यासाठी थंडीचे दिवस उत्तम असतात. म्हणूनच हेमंत व शिशिर ऋतूत अभ्यंग नक्की करावा.
    आयुर्वेदात ऋतुचर्या सांगताना दोन – दोन ऋतूंचे तीन गट पाडलेले दिसतात.
    *ग्रीष्म व वर्षा ऋतूचा एक गट होतो. या काळात आहार, आचरण खूप काळजीपूर्वक करायचे असते. खाण्या-पिण्यावर संयम ठेवायचा असतो.
    *शरद व वसंत ऋतूंचा दुसरा गट होतो. या ऋतूंमध्ये शरीरशक्‍ती साधारण असते, त्यामुळे या काळात थोडीफार काळजी घेतली तर एकंदर आरोग्य टिकू शकते.
    *शिशिर व हेमंत या दोन ऋतूंमध्ये शरीरशक्‍ती उत्तम असते, त्यामुळे हा काळ शरीरशक्‍ती अधिकाधिक वाढवण्यासाठी उत्तम समजला जातो. उत्तम पोषक अन्न, च्यवनप्राश, धात्री रसायनसारखे धातुपोषक रसायन, नियमित अभ्यंग करण्याने शरीरशक्‍ती वाढवणे सहज शक्‍य असते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत अभ्यंग नियमित करणे सर्वांच्याच हिताचे असते.

    अभ्यंग शब्दात अंगाला तेल लावणे व जिरवणे अभिप्रेत असते. शास्त्रोक्‍त पद्धतीने तयार केलेले औषधी तेल शरीरात आतपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे असते. त्यामुळे वर पाहिलेले अभ्यंगाचे फायदे मिळण्यासाठी तेल औषधी असायला हवे, म्हणजेच ते वातशामक, शरीरपोषक द्रव्यांचा संस्कार केलेले असावे. नुसत्या तिळाच्या, खोबऱ्याच्या वा मोहरीच्या तेलाने अभ्यंग केल्याने अभ्यंगाचे खरे फायदे मिळू शकणार नाहीत.
    अभ्यंग करताना सहसा पायापासून सुरवात केली जाते. केसांच्या विरुद्ध दिशेने तेल लावले की आतपर्यंत जिरणे सोपे असते, असे सांगितलेले असल्याने तेल लावताना खालून वर, या दिशेने लावायचे असते.फार रगडून किंवा जोर लावून तेल लावणे, हाही एक प्रकारचा अभ्यंग असू शकतो, ज्याला संस्कृतमध्ये “मर्दन-अभ्यंग’ म्हटले जाते; पण त्यासाठी प्रशिक्षित परिचारक (थेरपिस्ट) असणे आवश्‍यक होय. आतल्या शरीरावयवांची रचना समजून घेऊन कुठल्या ठिकाणी किती दाब द्यायचा, किती वेळ चोळायचे, हे समजू शकणाऱ्या परिचारकाकडूनच “मर्दन अभ्यंग’ करून घ्यावा. एरवी आपले आपण औषधी तेल जिरविण्यानेही अभ्यंगाचे फायदे मिळू शकतात. तरफेने वजन उचलताना जसे तरफेच्या लांबीला महत्त्व असते, तसेच मसाज करत असताना दाब व वेळ, यापैकी वेळ तरफेचे काम करते. किती दाब द्यायचा याबरोबरच किती वेळ दाब द्यायचा, हेही महत्त्वाचे असते.

    थंडीत अभ्यंग करण्याचा अजून एक फायदा म्हणजे कितीही थंडी असली तरी त्वचा फुटत नाही. त्वचा कोरडी पडण्याने तडतडणे, खाज येणे वगैरे त्रास अजिबात होत नाहीत आणि शरीर उबदार राहते. अभ्यंग करण्याने एकंदरच रक्‍ताभिसरण सुधारत असल्याने शरीराला आवश्‍यक देहोष्मा कायम राहतो. हात-पाय गारठणे, सुन्न होणे वगैरे त्रासांना आपोआपच प्रतिबंध होतो.
    पादाभ्यंग हाही अभ्यंगाचाच एक प्रकार होय. पादाभ्यंग म्हणजे काशाच्या वाटीने पायाच्या तळव्यांना तूप चोळणे. पायाला अभ्यंग करण्याचेही खूप फायदे मिळतात. मुळाला पाणी घातल्याने जसे झाड सर्व बाजूंनी बहरते, तसेच पादाभ्यंग केल्याने संपूर्ण शरीराचे पोषण होते.
    खरत्वं स्तब्धतां रौक्ष्यं श्रमः सुप्तिश्‍च पादयोः ।
    सद्य एवोपशाम्यन्ति पादाभ्यंगनिषेवणात्‌ ।।
    जायते सौकुमार्यं च बलं स्थैर्यं च पादयोः ।
    दृष्टिःप्रसादं लभते मारुश्‍चोपशाम्यति ।।
    न च स्यात्‌ गृध्रसीवातः पादयोः स्फुटनं न च ।
    न सिरास्नायुसंकोचः पादाभ्यंगेन पादयोः ।।
    ….चरक संहिता
    पायांना अभ्यंग केल्यास पायांचा खरखरीतपणा, पाय जखडणे, रुक्षता, थकावट, बधिरता, मुंग्या येणे वगैरे त्रास नाहीसे होतात, पाय कोमल होतात व त्यांच्यातील बल व स्निग्धता वाढते; डोळ्यांची आग व लाली कमी होऊन डोळे प्रसन्न होतात, वाताचे शमन होते, सायटिका होत नाही, पायांना भेगा पडत नाहीत, सिरा व स्नायूंचा संकोचही होत नाही.
    संपूर्ण शरीराला अभ्यंग करता येतो, त्याचप्रमाणे विशिष्ट अवयवाला, शरीरातील विशिष्ट भागाला स्थानिक अभ्यंग करता येतो. उदा. गुडघे दुखत असल्यास फक्‍त गुडघ्यांना किंवा सांधे दुखत असल्यास फक्‍त सांध्यांना खास तेल लावण्याचा व जिरविण्याचा फायदा होतो.

    बामसारखे केवळ वेदना कमी करणारे तेल एखाद्या वेळी वापरता येते. मात्र गुडघ्यांची, सांध्यांची झीज भरून आणण्यासाठी अभ्यंग करायचा असल्यास “शांती तेला’सारखी तेले आयुर्वेदात सांगितलेली असतात. ही तेले आतपर्यंत जिरून, वात कमी करून झीज भरून आणतात आणि खऱ्या अर्थाने उपयोगी पडतात.
    पाठीच्या मणक्‍यावरही विशेष अभ्यंग करता येतो. मणके, तसेच मणक्‍यांना धरून ठेवणारे स्नायूंचे स्तंभ यांच्यावर अभ्यंग करता येतो. मान व पाठीच्या त्रासासाठी संशोधन करून “कुंडलिनी मसाज’ नावाची विशेष अभ्यंग पद्धती मी विकसित केलेली आहे, ज्याचा फायदा स्लिप्ड डिस्क, मणक्‍यांची झीज, स्पॉंडिलायटीस असे त्रास बरे करण्यासाठी तर होतोच; पण मुळात असे त्रास होऊ नये म्हणूनही मेरुदंडाचा विशेष अभ्यंग नियमाने घेता येतो आणि त्यासाठी “कुंडलिनी’ नावाचे विशेष विकसित केलेले तेल वापरता येते.
    एकंदरच तारुण्य टिकविण्यासाठी, शरीरशक्‍ती वाढविण्यासाठी अभ्यंग हा सहज करता येण्याजोगा व अतिशय प्रभावी उपचार आहे. सध्याच्या धावपळीच्या व मानसिक ताणाने भरलेल्या जीवनशैलीसाठी तर अभ्यंग हे जणू वरदानच म्हणावे लागेल. थोडा वेळ काढून स्वतःला अभ्यंग करण्याने आणि महिन्या-दोन महिन्यांतून आयुर्वेदिक प्रशिक्षित परिचारकाकडून अभ्यंग मसाज घेण्याने आरोग्याचे रक्षण करणे सहज शक्‍य होते.

  • तिळगूळ का खायचा

    तिळगूळ का खायचा

    तिळगूळ का खायचा?
    (डॉ. श्री बालाजी तांबे)
    थंडीने गारठून टाकणाऱ्या हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे, असे आयुर्वेद सांगतो. संक्रांतीला आपण नेमके हेच करतो.
    नवीन इंग्रजी वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत. तिळगूळ खायला मिळणार म्हणूून लहान मुले आनंदात असतात तर स्त्रिया हळदी-कुंकू समारंभाची, संक्रांतीनिमित्त कोणत्या गोष्टी लुटायच्या याची योजना करत असतात, नववधू तसेच नवजात बाळासाठी दागिने आणण्याची लगबग सुरू असते, दागिने पण तिळ-साखरेच्या हलव्याचेच असतात.
    मुले-बाळे, पुरुषमंडळी पतंग उडविण्यासाठी उत्सुक असतात. एकंदर संक्रांत हा उत्साहपूर्ण व मैत्रीपूर्ण सण म्हणता यावा.
    आयुर्वेदिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर संक्रांत येते थंडीच्या दिवसात म्हणजे हेमंत ऋतूत. हेमंतानंतर येतो शिशिर ऋतू, जो आदान काळातला पहिला ऋतू असतो.आदानाचे वैशिष्ट्य म्हणजे “रौक्ष्यं आदानजम्‌’ अर्थात आदानकाळात रुक्षता वाढू लागते, शिवाय शिशिरात थंडीचे प्रमाण खूप वाढणार असते. थंडीपाठोपाठ रुक्षता वाढतेच. संक्रांतीच्या दिवशी केल्या जाणारे सर्व रीतिरिवाज रुक्षता कमी करणारे व थंडीचे निवारण करणारे असतात.आयुर्वेदाने फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही तर संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूत असेच शीतता व रुक्षता कमी करणारे उपाय योजण्यास सांगितले आहेत.
    चरकसंहितेमधील या सूत्रांवरून हे स्पष्ट होईल.
    गोरसानिक्षुविकृतीर्वसा तैलं नवौदनम्‌ ।
    हेमन्ते।भ्य़स्यतस्तोयमुष्णं चायुर्न हीयते ।।
    अभ्यंगोत्सादनं मूर्ध्नि तैलं जेन्ताकमातपम्‌ ।
    … चरक संहिता

    हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे.
    संक्रांत साजरी करताना आपण नेमक्‍या याच गोष्टी करत असतो. उसापासून बनविलेल्या गुळाशिवाय संक्रांत पूर्ण होणार नाही. थंडीच्या दिवसात जे स्निग्ध पदार्थ खायचे, त्यात तीळ अग्रणी ठरावेत. म्हणूनच संक्रांतीला “तिळगूळ घ्या गोड बोला’ हा जणू परवलीचा शब्द असतो.संक्रांतीच्या दिवशी तिळाचे महत्त्व इतके की त्यांचा होता होईल तेवढा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत असते. तीळ-गूळ खाण्याबरोबर तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तिळाचे उटणे अंगाला लावणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तीळ वाटणे वगैरे निरनिराळ्या मार्गांनी तीळ वापरायचे असतात.आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंगही औषधांनी सिद्ध तीळ तेलाचाच करायचा असतो. स्निग्ध द्रव्यांचे उटणे बनविताना त्यात त्वचेला हितकर तीळ अग्रणी असावेच लागतात. पतंग उडविण्याच्या निमित्ताने अंगावर ऊनही घेतले जाते.
    तीळ, गूळ स्वयंपाकघरात बऱ्याचशा प्रमाणात वापरले जातातच पण औषध म्हणूनही त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो.
    उष्णस्त्वच्यो हिमः स्पर्शः केश्‍यो बल्यस्तिलो गुरुः ।
    अल्पमूत्रः कटु पाके मेधाग्निकफपित्तकृत्‌ ।।
    … वाग्भट सूत्रस्थान
    तीळ वीर्याने उष्ण पण स्पर्शाला शीतल असतात, त्वचेला तसेच केसांना हितकर असतात, ताकद वाढवितात, मुत्राचे प्रमाण कमी करतात, अग्नी तसेच मेधा (ग्रहणशक्‍ती) वाढवितात, कफ-पित्त वाढविणारे असतात.
    पांढरे व काळे असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ औषधाच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतात.
    औषध म्हणून तिळाचा उपयोग अनेक प्रकारांनी केला जातो.
    – मूळव्याधीमुळे विशेषतः वात-कफ असंतुलनामुळे गुदभागी सूज, वेदना असता तिळाचा कल्क लावण्याने बरे वाटते.
    कल्कस्तिलानां कृष्णानां शर्करा पांचभागिकः ।
    अजेन पयसा पीतः सद्यो रक्‍तं नियच्छति ।।
    … वाग्भट चिकित्सास्थान
    काळ्या तिळाचा कल्क एक भाग, त्याच्या पाच पट साखर हे मिश्रण बकरीच्या दुधासह योग्य प्रमाणात घेण्याने जुलाबासह रक्‍त पडणे थांबते.
    – संपूर्ण तिळाचे झाड जाळून बनविलेला क्षार बकरीच्या दुधात टाकून घेणे मूतखड्यावर उत्तम असते.
    – तीळ रजःप्रवर्तन वाढवणारे असतात. अंगावरून कमी जात असल्यास तिळाचा काढा गूळ घालून घेतला जातो. गर्भाशयातला वातदोष कमी करण्याच्या दृष्टीनेही तीळ उत्तम असतात. म्हणूनच बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्याच्या दृष्टीने तीळ-ओवा-खोबऱ्याची सुपारी खायची पद्धत आहे.
    दिने दिने कृष्णतिलं प्रकुंचं समश्‍नतः शीतजलानुपानम्‌ ।
    पोषो शरीरस्य भवत्यनल्पः दृढीं भवन्त्यामरणाच्च दन्ताः ।।


    रोज काळे तीळ चावून खावे व वरून थंड पाणी प्यावे. यामुळे दात बळकट बनतात.
    – जखमेवर तिळाचा कल्क लावला असता जखम कोरडी पडत नाही, उलट लवकर भरून येते.
    – वाटलेले तीळ अंगाला लावून स्नान केले असता त्वचा स्निग्ध व सुकुमार बनते.
    अर्थात तिळाचे हे सर्व उपयोग अतिशय प्रभावी असले तरी त्यांचा प्रयोग करताना तीळ उष्ण असतात हे निश्‍चितपणे लक्षात घ्यावे लागते. प्रकृती, हवामान, शरीरातले पित्तदोषाचे प्रमाण या गोष्टी लक्षात घेऊनच तिळाचा सरसकट औषधी वापर करावा.

    गूळ उसाच्या रसापासून बनवितात हे सर्व जण जाणतात, पण गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत उसाच्या रसावरची मळी काढणे आवश्‍यक असते. मळी काढून तयार झालेला शुद्ध गूळ चवीला मधुर, वात-पित्तशामक व रक्‍तधातूला प्रसन्न करणारा असतो.
    गूळ वर्षभर ठेवून जुना झाला की मग वापरायचा असतो. नवीन गुळामुळे कफदोष वाढू शकतो, तसेच अग्नीचा अवसाद होतो. त्याउलट जुना गूळ गुणांनी श्रेष्ठ असतो.
    स्वादुतरः स्निग्धो लघुरग्निदीपनो विण्मूत्रामयशोधनो रुच्यो हृद्यः पित्तघ्नो वातघ्नस्त्रिदोषघ्नो ज्वरहरः सन्ताप शान्तीप्रदः श्रमहरः पाण्डुप्रमेहान्तकः पथ्यश्‍च ।
    … राजनिघण्टु

    जुना गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्नीदीपन करतो, मल-मूत्र वाढण्याने झालेले रोग दूर करतो. हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, ताप दूर करतो, संताप दूर करुन मन शांत करतो, क्षम नाहिसे करतो, पांडू, रक्‍ताल्पता व प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो.

    थकून भागून आलेल्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत असते कारण तो ताप-संताप दूर करून श्रम नाहीसे करू शकतो.

    गूळ रक्‍तधातूपोषक व गर्भाशयाची शुद्धी करणारा असतो. त्यामुळे बाळंतपणानंतर घेण्यास उत्तम असतो.
    थंडीच्या दिवसात जेवणात तूप-गूळ खाण्याने थंडीचे निवारण होते, शिवाय ताकद वाढते.

    तिळाप्रमाणेच गुळाचीही आयुर्वेदाने खूप स्तुती केलेली असली तरी गूळही उष्ण असतो,तो हे लक्षात घ्यावे लागेल. शिवाय गूळ पचला नाही किंवा अशुद्ध स्वरूपातला गूळ सेवन केला तर त्यामुळे जंत होऊ शकतात, मेदधातू वाढू शकतो.
    संक्रांतीच्या दिवशी जेवणात गुळाची पोळी असतेच. ही पोळी कशी बनवावी व तिचे काय फायदे होतात हे आयुर्वेदाने याप्रमाणे सांगितले आहे,
    गोधूमचूर्णं क्षिप्ताज्यं जलेनार्द्रं विमर्दयेत्‌ ।
    मृदोस्तस्मात्संप्रगृह्य तुल्यां पूगफलेन च ।।
    कृत्वा पर्पटिकां तस्य शर्कराचूर्णगर्भिताम्‌ ।
    गुटिं बध्वा पिधायास्यं वेल्लयेत्पूर्णपीठके ।।
    पर्पटेन समां कृत्वा घृते सुविपचेत्ततः ।
    सा गुडोरी गुरुर्वृष्या शुक्रला वातपित्तनुत्‌ ।
    एतादृशी गुडस्यापि भवतीति सुनिश्‍चितम्‌ ।।
    …निघण्टु रत्नाकर

    गव्हाच्या पिठात तुपाचे मोहन घालून पाण्यासह मळावे. मऊसर मळले गेले की सुपारी एवढी गोळे करावेत. गोळा लाटून लहानशी पोळी बनवावी. यात गुळाचे किंवा साखरेचे पुरण भरून मोदक बनवून त्याचा पुन्हा गोळा करावा व लाटावा. लाटलेली पोळी तुपावर व्यवस्थित शेकावी. अशी ही गुडोरी (गूळ-पोळी) वात-पित्तशामक असते, पचायला जरी थोडी जड असली तरी शक्रधातूला पोषक असते.

    संक्रांतीच्या निमित्ताने संपूर्ण हेमंत-शिशिर या ऋतूत करण्यासाठी सुरू होते सूर्यस्नान. आकाशध्यान व सूर्यस्नान करण्यासाठी गच्चीवर उघड्या आकाशाखाली पतंग उडविण्यासाठी लहान थोर सर्वच जातात व हा सण आनंदाने साजरा करतात.
    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • आरोग्य दीपावली

    आरोग्य दीपावली

    दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली येते. पावसाळ्यात मंदावलेला अग्नी दीपावलीच्या सुमारास हळूहळू पुन्हा बलवान होण्यास सुरुवात होते.
    दीपावली म्हणजे प्रकाशाचा, तेजाचा महोत्सव. भारतीय दिनगणनेनुसार दीपावली आश्‍विन महिन्याच्या शेवटी व कार्तिक महिन्याच्या सुरुवातीला असते. भारतातील सर्वात महत्त्वाचा व सर्वात मोठा असा हा सण साजरा करण्याबरोबर आरोग्याची जोपासना हा हेतूही असतोच. पावसाळा संपता संपता दीपावली येते. पावसाळ्यातील दमटपणा, अंधार, मरगळ दूर सारून पुन्हा उत्साहाने वर्षाची सुुरुवात व्हावी यासाठीच जणू दीपावली येते. पावसाळ्यात मंदावलेला अग्नी दीपावलीच्या सुमारास हळूहळू पुन्हा बलवान होण्यास सुरुवात होते. पचनात सुधारणा ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने सर्वात अनुकूल असते. सण, उत्सव म्हटला की खाणे-पिणे महत्त्वाचे असतेच. पण दीपावलीच्या या उत्सवात भारतीय संस्कृतीने आहाराबरोबरच शारीरिक, मानसिक आचार-विचार, प्राणी, निसर्ग, देव-देवता, नातेसंबंध, सृजनता अशा सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला आहे. या सर्वांचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असतो.

    निसर्गाशी संतुलित संबंधदीपावलीची सुरुवात होते आश्‍विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी म्हणजे वसुबारसेने. उत्सवाचा पहिला मान दिला जातो तो निसर्गाला, पशुधनाला. सवत्स गाईचे पूजन करून तिला चांगले अन्न देऊन आरोग्यासाठी प्राण्यांची आवश्‍यकता आहे यावर जणू दरवर्षी शिक्कामोर्तब केले जाते. दीपावलीच्या सणात प्राण्यांनाही समाविष्ट करून घेण्याने मनुष्य-निसर्गाचा संबंध संतुलित असल्याचीही ग्वाही मिळते.

    वसुबारसेनंतर येते धनत्रयोदशी. आयुर्वेदाची देवता म्हणजेच पर्यायाने आरोग्याची देवता असणाऱ्या धन्वंतरीची पूजा या दिवशी केली जाते. धन्वंतरींनी हातात घेतलेले जलौका व अमृतकलश हे योग्य वेळी शरीरशुद्धी व नियमित रसायन सेवन यांचे द्योतक असतात. शरद ऋतूत शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन, बस्ती वगैरे उपचार करून घेतले आणि दीपावलीपासून प्रकृतीला अनुरूप व संपन्न वीर्यवान औषधांपासून तयार केलेले रसायन सेवनास सुरुवात केली तर ते आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरावे. शरद ऋतूत पित्तदोषाचा प्रकोप होत असतो. या पित्ताला संतुलित करण्यासाठी दीपावली उत्सवाच्या पूजेत साळीच्या लाह्या, धणे यांचा प्रसाद दाखविला जातो व सेवन केला जातो.

    अभ्यंगाचे महत्त्वयानंतर येतात नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन. या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करण्याची पद्धत असते. अभ्यंग आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचा असतो हे आयुर्वेदातील या श्‍लोकावरून समजते.

    अभ्यन्नित्यं स जराश्रमवातहा ।दृष्टिःप्रसादपुष्ट्यायुः स्वप्नसुत्वकत्व दार्ढ्यकृत्‌ ।।

    * अभ्यंगाने म्हातारपण उशिरा येते, वय वाढले तरी त्यामुळे होणारा त्रास वाचतो.
    * शरीरश्रमांनी आलेला थकवा नष्ट होतो.
    * वातदोष संतुलित राहतो, त्यामुळे वातरोगांना प्रतिबंध होतो.
    * डोळ्यांची शक्‍ती चांगली राहते.
    * शरीरबांधा व्यवस्थित राहतो.
    * दीर्घायुष्याचा लाभ होतो.
    * झोप शांत लागण्यास मदत होते.
    * त्वचेचा वर्ण उजळतो, त्वचा सुकुमार, मऊ, स्निग्ध राहते.
    * त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.

    अर्थात हे सर्व फायदे मिळण्यासाठी तेलही औषधांचा विधिपूर्वक संस्कार करून तयार केलेले असावे लागते. त्वचेतून आतपर्यंत जिरणारे, फक्‍त त्वचेलाच नाही तर संपूर्ण शरीराला उचित स्निग्धता देण्यास सक्षम असणारे तेल वापरणे श्रेयस्कर असते.

    नितळ त्वचेसाठी उटणे
    अभ्यंगस्नानात अभ्यंगाबरोबरच उटण्याचाही समावेश असतो. आयुर्वेदात उटणे लावण्यास उद्वर्तन म्हटले जाते.
    उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।स्थिरीकरणमानां त्वक्‌ प्रसादकरं परम्‌ ।।
    उटण्याने अनावश्‍यक, मलरूप कफदोष स्वच्छ होतो. मेदाचे विलयन झाल्याने लठ्ठपणा कमी होतो. त्वचा प्रसन्न अर्थात स्वच्छ, मऊ, नितळ व तेजस्वी होते. अकाली सुरकुत्या पडत नाहीत आणि सर्व अवयव रेखीव व स्थिर दिसतात. तेलात किंवा दुधात उटणे कालवून संपूर्ण अंगाला लावता येते व कोमट पाण्याने स्नान करता येते. उटणे लावण्याने अतिरिक्‍त प्रमाणात येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी होते अणि उटण्यातील सुगंधी द्रव्यांमुळे मनही प्रसन्न होते. चंदन, अगरु, वाळा, हळद, यासारख्या सुगंधी, कांतिवर्धक द्रव्यांनी युक्‍त उटणे आपल्या व पर्यावरणाच्या आरोग्यासाठीही 100 टक्के सुरक्षित असते. अशा प्रकारच्या अभ्यंगस्नानाने ताजेतवाने वाटते, उत्सवाचा उत्साह येतो, शिवाय पुढील आयुर्वेदोक्‍त फायदेही मिळतात.

    दीपनं वृष्यमायुष्यं स्नानमूर्जाबलप्रदम्‌ ।
    कण्डु-मल-श्रम-स्वेद-तन्द्रा-तृड्‌-दाहपाप्मजित्‌ ।।
    स्नानामुळे शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो. शरीरशक्‍ती, वीर्य यांची वृद्धी होते. दीर्घायुष्याचा लाभ होतो. त्वचेवरील मळ-घाम-कंड यांचा नाश होऊन श्रमाचा परिहार होतो. आळस दूर होतो, घशाला पडणारी कोरड कमी होते, शरीरदाह थांबतो आणि पापांचा नाश होतो. दीपावलीपुरते म्हणायचे झाले तर नरकचतुर्दशी, पाडवा, भाऊबीज या तिन्ही दिवशी अभ्यंगस्नान करायचे असते.

    मात्र आरोग्याच्या दृष्टीने पुढे येणाऱ्या संपूर्ण हिवाळ्यात अभ्यंगस्नान नियमित करणे अत्युत्तम होय.
    पाडव्याच्या दिवशी पत्नीने पतीला आणि भाऊबीजेच्या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करायचे असते. “दीपदर्शन’ हे आयुर्वेदाने मंगलकारक, भाग्यवर्धक सांगितले आहे, नात्यांमधली ओढ तेजाने उजळून जावी, अजून पक्‍की व्हावी हाही उद्देश असतोच.

    फराळ नव्हे, रसायनसेवन
    दीपावलीमध्ये अनारसा, लाडू, करंजी, शंकरपाळे वगैरे फराळाचे पदार्थ नुसत्या चवीसाठी नव्हे तर रसायनांचे फायदे मिळण्यासाटी योजलेले असतात. दीपावलीनंतरही संपूर्ण हिवाळ्यात “मॅरोसॅन’, च्यवनप्राशासारखे रसायन नियमित घेणे उत्तम असते. आकाशकंदील बनवणे, किल्ला बनवणे, प्रियजनांना भेटवस्तू देणे या सर्व गोष्टींमुळे मनाची प्रसन्नता वाढते, सृजनतेला वाव मिळतो आणि मनाची मनाचे आरोग्य टिकायलाही मदत मिळते.
    अग्नी तत्त्वाची आराधना, जोपासना आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची असते. शरीरातील अग्नी प्रदीप्त असला की पचन व्यवस्थित राहाते, पर्यायाने आरोग्य नीट राहाते. बाह्य जगातील अग्नी व प्रकाश अंधार व शंका यांना दूर करतो. अग्नीजवळ दमटपणा, अतिरिक्‍त ओलावा, जीवजंतूंना थारा मिळत नाही, पर्यायाने रोगराई दूर राहते, मरगळ झटकून उत्साहाचा अनुभव घेता येतो. दीपावली हा अग्नीचा. तेजाचा उत्सव. म्हणूनच दीपावलीला “आरोग्य दीपावली’ म्हणणे अतिशय सार्थ होय.

  • थंडीतील उपचार - मसाज

    थंडीतील उपचार – मसाज

    निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून “बाह्यस्नेहन’ रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधूनमधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.
    थंडी पडली, की वातावरणात कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. शरीराला आतून-बाहेरून स्निग्धतेची आवश्‍यकता भासू लागते. याला आयुर्वेदात “स्नेहन’ असे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही यंत्राला वंगणाची आवश्‍यकता असते, साध्या वाहनातही नुसते इंधन घालणे पुरत नाही, त्याप्रमाणे निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून “बाह्यस्नेहन’ रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधून मधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.

    अभ्यंग शब्दातील “अंग’ हे क्रियापद गती या अर्थाने आलेले आहे. जेथे जेथे गती असते तेथे उष्णता व ऊब तयार होतेच उदा. थंडीच्या दिवसांत एका ठिकाणी बसले किंवा उभे पाहिले की वाजणारी थंडी चालले, पळले की अजिबात वाजेनाशी होते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात ज्या क्रियेमुळे गतीमानता येते, अशा अभ्यंगाने शरीराला ऊब मिळणे सहज शक्‍य असते.

    अभ्यंगातून ऊब
    ऊब ही रक्‍ताभिसरणावरही अवलंबून असते. फार वेळ एका ठिकाणी बसल्यावर पायाला मुंग्या येतात. अशा वेळी पाय थंड पडतो, याचा सगळ्यांना अनुभव असेल. पाय हलवला आणि रक्‍ताभिसरण पूर्ववत सुरू झाले की पायाचे तापमान पुन्हा पूर्वीसारखे होते. अभ्यंगामुळे रक्‍ताभिसरणाला मदत मिळत असल्याने अभ्यंग शरीराला ऊब देण्यास उत्तम असतो. शरीरातील ऊब कमी झाली की हालचालींवरही मर्यादा येतात. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जीभ गारठली की बोलता येत नाही, हात गारठले की बोटे जखडल्यासारखी वाटतात, याचाही सर्वांना अनुभव असेल. म्हणूनच सर्व हालचाली व्यवस्थित व्हाव्यात, हालचालींमधला सहजपण, चपळपणा कायम राहावा, यासाठीही अभ्यंग, अभ्यंगातून मिळणारी ऊब आवश्‍यक असते.

    अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. हे तेल वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असावे, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे.

    यथा जातान्न पानेभ्यो मारुतघ्नैः सुगन्धिभिः ।
    अथर्तु सस्पर्श सुखैस्तैलैः अभ्यंगमाचरेत्‌ ।। …अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
    वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असे ऋतूला व प्रकृतीला अनुकूल तेल, जे स्पर्श केले असता सुखकर असते, अभ्यंगासाठी वापरावे. क्वचित काही ठिकाणी औषधांनी संस्कारित तूप किंवा वसा (मांसातील स्निग्ध पदार्थ) वापरण्यासही सांगितले आहे. मात्र सहसा तिळाचे तेल अभ्यंगासाठी उत्तम समजले जाते.

    रोज करायचा अभ्यंग स्वतः स्वतःला करायचा असतो. मात्र प्रशिक्षित परिचारकाकडून (ट्रेंड थेरपिस्ट) अभ्यंग करून घेण्याचे फायदे वेगळे असतात. विशेषतः पंचकर्म करताना बाह्यस्नेहन म्हणून करायचा अभ्यंग किंवा वातविकारात उपचार म्हणून घ्यायचा अभ्यंग किंवा अति प्रवास, अति दगदग, अति मानसिक ताण यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून घ्यायचा अभ्यंग हा मसाजिस्ट – थेरपिस्टकडून करून घेणे अधिक गुणकारी असते.

    पेशीच्या ठेवणीनुसार मसाज
    मसाज करणाऱ्याला मानवी शरीराचे रचनात्मक व क्रियात्मक ज्ञान असणे आवश्‍यक असते. विविध मांसपेशी, त्यांचा उगम, विस्तार, दिशा यांची सविस्तर माहिती असावी लागते. सांध्यांच्या ठिकाणी असणारी दोन किंवा अधिक हाडांची रचना, सांध्यांना पकडून ठेवणाऱ्या स्नायूंची रचना, रक्‍तवाहिन्या, मज्जातंतूंचे स्थान, विविध मर्मे वगैरे अनेक गोष्टी मसाज करण्यापूर्वी माहीत असाव्या लागतात.

    मसाजचे परिणाम सर्व शरीरात होत असले तरी मसाज केला जातो तो वरच्यावरच. त्वचेच्या आश्रयाने राहणारे भ्राजक पित्त तेलाचा स्वीकार करून त्याचे पचन करून ते सर्व शरीरपोषणासाठी शोषून घेते. अर्थात यासाठी वापरले जाणारे तेलही उत्तम प्रतीचे, औषधांनी सिद्ध केलेले व अग्नीचा यथायोग्य संस्कार झाल्याने “सूक्ष्म’ अर्थात लहानात लहान पोकळीतही पोचण्याचे सामर्थ्य असणारे असावे लागते. नुसतेच अर्क किंवा सुगंध घातलेले तेल किंवा कमी दर्जाचे तेल, कच्चे तीळ तेल वा खोबरेल तेल वापरून कितीही चांगला मसाज केला तरी त्याने तेलाचे आतपर्यंत जिरण्याचे व त्यायोगे धातुपोषणाचे कार्य होऊ शकत नाही.

    मसाज करताना प्रत्येक पेशीचा आकार ध्यानात घ्यावा लागतो. नाजूक पेशीच्या ठिकाणी मसाजही नाजूकपणेच करावा लागतो, तर बळकट पेशीला मसाज करताना बळ पणाला लावावे लागते. तसेच पेशीचा आकार, तिची दिशा, लांबी यावरून त्या ठिकाणी कसा मसाज करायचा ते ठरवले जाते. पेशीच्या नैसर्गिक ठेवणीनुसार मसाज केल्यास तो सुखावहही ठरतो व उपयोगीही असतो; अन्यथा त्याने पीडा कमी होण्याऐवजी वाढूही शकते.

    ‘मर्मा’वर बोट
    मसाजचा विचार करताना “मर्म’ हाही विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा होय. प्राणशक्‍तीचे अस्तित्व सर्व शरीरात असले तरी काही विशिष्ट ठिकाणी ती अधिक प्रमाणात एकवटलेली असते. आयुर्वेदात या विशिष्ट ठिकाणांना “मर्म’ ही संज्ञा दिली आहे. मर्माच्या ठिकाणी शरीरातील शिरा, स्नायू, संधी, अस्थी, मांस यांपैकी एकाहून अधिक घटक एकत्र आलेले असतात व त्यामुळे मसाज करताना त्याच्या ठिकाणी किती प्रमाणात दाब द्यावा, किती वेळ दाब द्यावा, या गोष्टीचा विचार करावा लागतो.

    मसाजचे सार्वदैहिक मसाज आणि स्थानिक मसाज असे दोन प्रकार संभवतात. वातशमनासाठी आणि शरीरशक्‍ती वाढून स्वास्थ्य टिकवण्यासाठी केला जाणारा मसाज सर्व शरीरभर केला जातो; मात्र पाठ दुखत असल्यास नुसत्या पाठीला किंवा पायाला सुन्नपणा आला असल्यास फक्‍त पायांना असा स्थानिक मसाजही केला जातो.

    संपूर्ण शरीराचा मसाज होण्यासाठी साधारणतः एक तास लागू शकतो. मसाज झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास विश्रांती घ्यावी, वाऱ्याचा झोत अंगावर येणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनातून जायचे झाल्यास कानाला स्कार्फ बांधावा. थंडीच्या दिवसांत पायात मोजे घालावेत. अशा प्रकारे अभ्यंग, मसाजसाठी रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढला, तर त्यामुळे जीवन उबदार व्हायला आणि जीवनाचा आनंद द्विगुणित व्हायला निश्‍चित हातभार लागेल.

    मसाज करण्याचा सर्वसाधारण क्रम
    – मसाज करताना सर्वप्रथम तेलाचे दोन थेंब टाळूवर हलक्‍या हाताने चोळावेत, तसेच कानांमध्ये व नाभीवर दोन-तीन थेंब टाकावेत. मसाज करताना नेहमी पायापासून सुरवात करावी. प्रथम पायाच्या तळव्यांवर तेल जिरवावे. मसाज करताना पायाच्या तळव्यापासून सुरवात करावी. घोटा, गुडघा या ठिकाणी गोलाकार मसाज करावा. पोटरी, मांडीला सोसवेल त्याप्रमाणे दाब देऊन मोकळे करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा पाय करावा.

    – यानंतर हाताच्या तळव्यापासून सुरवात करावी, मनगट व कोपरावर वर्तुळाकार तर बाकी दंडाला वगैरे अंगठा व चार बोटे यांच्या साहाय्याने दाब सोसवेल अशा पद्धतीने मसाज करावा.
    – पोटावर मसाज करताना मोठ्या आतड्याची रचना व गती ध्यानात घ्यावी लागते. फार दाब न देता वर्तुळाकार गतीने मसाज केल्यास आतड्यातील वायूला स्वाभाविक गती मिळते व सरून जायला मदत होते.
    – कूस व छातीवरती हलक्‍या हाताने मसाज करावा. छातीवर दोन्ही हातांनी छातीच्या हाडापासून ते खांद्यापर्यंत मसाज करावा.
    – नितंब, अंसफलक (scapula) यांठिकाणी मांसपेशी व हाडाच्या आकारानुरूप गोलाकार मसाज करावा. कंबर व संपूर्ण पाठीलाही खालून वरपर्यंत सरळ रेषेत मागे पाहिल्याप्रमाणे वाहक, कंपन वगैरे पद्धतीने मसाज करावा. मानेवर मात्र दाब न देता हलक्‍या हाताने तरंग पद्धतीने वर जावे. पाठ व मानेला जोडणाऱ्या मांसपेशी त्रिकोणाकार असल्याने त्यांच्यावर मसाज करताना त्यांचा विशिष्ट आकार ध्यानात घ्यावा लागतो. चेहऱ्यावरही मसाज अत्यंत हलक्‍या हाताने करावा व त्याची दिशा जबड्यापासून ते कानशिलापर्यंत ठेवावी.
    – मसाज करताना वापरावयाचे तेल किंचित गरम करून वापरावे. याने वात शमन व्हायला अधिक मदत मिळते, तसेच तेलाचे शोषणही अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
    – मसाज घेताना पोट रिकामे असू नये, तसेच जेवल्याजेवल्याही मसाज घेऊ नये.
    – मसाज करायची जागा हवेशीर असावी; मात्र प्रत्यक्ष हवेचा झोत अथवा वारा येणार नाही याची काळजी घ्यावी. खोलीत पुरेसा उजेड असावा.
    – मसाज घेताना शयनस्थिती सर्वांत उत्तम होय. पालथे झोपलेल्या स्थितीत पाठीचा कणा, मान, नितंब, यावर मसाज केला जातो, तर पाठीवर झोपलेल्या स्थितीत हात, पाय, पोट, छाती व चेहऱ्यावर मसाज केला जातो. एखाद्या व्यक्‍तीला झोपणे, विशेषतः पालथे झोपणे शक्‍य नसेल, तर मात्र मसाज बसूनही करता येतो.

  • उबदार अभ्यंग -1

    उबदार अभ्यंग -1

    केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.

    थंडीच्या दिवसांत असते थंडगार वातावरण, थंडगार हवा, थंडगार पाणी, थंडगार स्पर्श. थंडी म्हणजे गोठणे. गोठणे याचा अर्थ इतरांपासून वेगळे पडणे. सर्व जगात पूजा होते अग्नीची. कारण तो सर्वांना आकर्षित करतो, जवळ आणतो. या अग्नीचे आकर्षण एवढे असते, की शरीरातूनसुद्धा पाहिली जाते ऊब. हालचाल करत नसलेल्या माणसाच्या कपाळाला स्पर्श करून पाहतात, की तो आहे की गेला. म्हणजेच त्याच्या शरीरात ऊब आहे की तो थंड पडला, हे पाहिले जाते. त्याच्या स्पर्शावरून कळते, की जीवन प्रवाहित आहे की नाही. जीवनप्रवाहातून वेगळेपणा कोणालाच आवडत नाही. जीवनप्रवाहात राहणे व जीवनाची ऊब मिळविणे, त्याचा आनंद घेणे प्रत्येकालाच आवडते.

    अशा या थंडीमध्ये, एकसंध असलेली शरीराची त्वचा किंवा स्नायू गोठायला म्हणजे आखडायला सुरवात होते. त्वचेचा काही भाग गोठला, आखडला की इतर भागापासून सुटा पडतो, म्हणजेच शरीरावर भेगा पडायला सुरवात होते, शरीर तडतडायला लागते आणि कंड सुटायला लागते.

    हे सर्व टाळण्यासाठी औषध एकच असते व ते म्हणजे ऊब. आपल्याला ऊब अनेक प्रकारे मिळते. ऊब मिळवायचा सोप्यात सोपा मार्ग म्हणजे शरीर चोळणे, घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे, मसाज करणे. त्यानंतर ऊब मिळविण्यासाठी करावी लागते धावपळ, म्हणजेच व्यायाम. तसेच ऊब मिळविण्यासाठी योग्य आहाराची योजना करणे आवश्‍यक असते. तसे पाहता थंडीच्या दिवसांत बाहेर सूर्यप्रकाशात, त्याच्या उबेत बसण्याएवढे आनंददायक दुसरे काही नाही. म्हणून सूर्यध्यान, खास ऊब देणाऱ्या पदार्थांचे सेवन अशा गोष्टींपासून ऊब मिळविणे आवश्‍यक असते. त्यानंतरही समाधान झाले नाही तर शेकोटी पेटवून बसणे, होळीसारखे उत्सव साजरे करणे, अशा प्रकारच्या योजना करून मनुष्य ऊब मिळविण्याच्या मागे लागतो. अर्थात थंडीच्या दिवसांत उबदार कपडे घालून संरक्षण करता येते.

    थंडी हा ऋतू चांगला असतो. त्यामुळेच आपण पाहतो, की थंड प्रदेशांतील लोक भरपूर अन्न खातात, पेये पितात, मेहनत करतात, ते उंचेपुरे, गोरेगोमटे असतात. पण तेथली थंडी सहन करण्यासाठी ऊब आवश्‍यक असतेच. तेथे घरे गरम करण्याची व्यवस्था असते, गरम कपडे वापरावे लागतात.

    भारतासारख्या प्रदेशात एकमेकाला भेटल्यानंतर दुरूनच नमस्कार करून मिळालेली ऊब पुरेशी ठरते, पण थंड प्रदेशांत गेले तर हाताला हात मिळवून उबेचे आदान-प्रदान व्हावे लागते आणि एवढ्याने समाधान झाले नाही तर कडकडून मिठी मारावी लागते.

    शरीराच्या एखाद्या भागाला, पायाच्या बोटाला रक्‍ताभिसरण कमी झाले, तेवढा भाग रक्‍तसंचारापासून वंचित झाला तर तेवढा भाग थंड पडून बधिर होण्याची, तेथे मुंग्या येण्याची शक्‍यता असते. असे झाल्यास नखावर खाजवले असता पुन्हा तेथील रक्‍ताभिसरण वाढून ऊब निर्माण होते व त्रास जातो. हात गार पडून लिहिता येत नाही, काम होत नाही, अशा वेळी दोन हात एकमेकांवर घासण्याची क्रिया साहजिकच घडते. थोडी अधिक माहिती असणारा मनुष्य पुढून-मागून सर्व दिशांनी हात घासतोच व बरोबरीने बोटे एकमेकांत अडकवून, दाबून धरून ओढायचा प्रयत्न करतो, म्हणजे बोटांच्या कडांचे, दोन बोटांच्या मध्ये असलेल्या जागेचे घर्षण होते आणि उबेचा उत्साह येतो. पाठीवर थाप मारायची, हाही एक ऊब देण्याचाच प्रकार.

    हे सर्व लक्षात घेतले तर ऊब देणे, रक्‍ताचा संचार वाढवणे, थंडीमुळे किंवा इतर कारणामुळे अवघड जागी साकळलेले रक्‍त किंवा अडकलेला रक्‍तप्रवाह दूर करण्यासाठी त्या ठिकाणी घर्षण करणे म्हणजेच अभ्यंग करणे- मसाज देणे अभिप्रेत असते. परंतु शरीराचे दोन भाग एकमेकांवर घासताना ते जर कोरडे असतील तर त्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या उष्णतेमुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. शिवाय मुख्य म्हणजे स्नेहन, मैत्री, आपुलकी शरीराशी व्हावी लागते, त्यासाठी तेलाने किंवा तत्सम पदार्थाने मसाज करणे अभिप्रेत असते. नुसते वास दिलेले तेल असेल तर त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा असंस्कारित तेलाच्या वापरामुळे त्वचेवरची रंध्रे बंद होतात. असे तेल वापरून मसाज घेताना वाटलेले सुख नंतर महागात पडते.

    म्हणून आयुर्वेदाने अभ्यंगासाठी वेगवेगळ्या प्रकारची अनेक तेले सुचविलेली आहेत. ही तेले बनविताना वेगवेगळ्या वनस्पती, दूध, दही, ताक, निवळी अशी अनेक द्रव्ये वापरलेली असतात, अगदी केशर, कापरासारखी द्रव्येही वापरलेली असतात. अशा तेलाने योग्य मसाज केला तर नुसती तात्पुरती ऊब न येता शरीरात टिकून राहणारी व शरीराला फायदा करणारी ऊब तयार होते. तेव्हा थंडीच्या दिवसांत प्रत्येकाने खास मसाजसाठी तयार केलेले अप्रतिम अभ्यंग तेल घेऊन स्वतःच शरीरावर चोळून व्यवस्थित मसाज करावा. जमेल त्यांनी उपचार केंद्रात जाऊन प्रशिक्षित परिचारकाकडून मसाज करून घ्यावा.

    केव्हातरी थंड हवेच्या ठिकाणी गेले असता, भरपूर चालून झाल्यावर थकवा घालविण्यासाठी फक्‍त मसाज घेण्यापेक्षा जो नियमितपणे अभ्यंग मसाज घेतो तो तरुण राहतो, त्याची ताकद वाढते, त्याची रोगप्रतिकारशक्‍तीही चांगली राहते व उबदार प्रेम देता-घेता येते.

  • उबदार अभ्यंग -2

    उबदार अभ्यंग -2

    आपल्याला ऊब ही हवीच असते. उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. मात्र, थंडीच्या दिवसात उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार.
    उबेचे माहात्म्य आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहे व त्यामुळे लहान मुले आईच्या कुशीत येऊन का झोपतात ह्याचा बरोबर उलगडा होऊ शकतो. शरीरात पायापर्यंत रक्‍तप्रवाह पोचला नाही, काही कारणांनी पायामध्ये पाणी राहून पाय जड झाला, थंड पडला किंवा डोक्‍याला वारा लागल्यामुळे डोके थंड झाले, तर चोळल्याने म्हणजे घर्षणाने ऊब मिळते. छाती व छातीच्या आसपासचा भाग नेहमी गरम राहतो, कारण हृदय सतत धडकत असते. त्याचे आकुंचन-प्रसरण सतत चालू असल्यामुळे मिठी मारताना, कुशीत येताना छातीजवळ डोके वा शरीर येण्याने ऊब चांगली मिळते, हा सर्वांच्याच अनुभवाचा विषय असतो.

    एक गोष्ट नक्की, की आपल्याला ऊब ही हवीच असते. परंतु अति ऊब वा अति अग्नी त्रासदायक ठरू शकतो. पृथ्वीचे तापमान वाढते आहे व त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत. वृक्ष, वनराई, नद्या, पर्वत, बर्फाच्छादित शिखरे यात होणाऱ्या बदलांमुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवेल की काय, अशी शंकेची पाल मनात चुकचुकलेली आहे. योग्य प्रमाणात अग्नी म्हणजे ऊब. शरीर गरम झाले, की तापावर औषध द्यावे लागते. ज्याचे शरीर जास्त प्रमाणात उष्ण राहते, त्याला थकवा लवकर येतो, अर्थात त्या प्रमाणात त्याचे आयुष्यही कमी होते.

    तेव्हा एका बाजूने उष्णता-ऊब आवश्‍यक असते, तर दुसऱ्या बाजूने अति उष्णता कामाची नसते. थंडी वाजल्यावर एखादा मनुष्य थोडे चालून आला किंवा जागच्या जागी पळाला, तर त्याला बरे वाटते. परंतु तो खूप पळाला, तर दमून जाणे, पाय दुखणे वगैरे त्रास होऊ शकतात. मनुष्येतर प्राणिमात्रांचा मेरुदंड जमिनीला समांतर असतो, परंतु उबेचे महत्त्व समजल्यामुळे मनुष्य दोन पायांवर उभा राहिला व त्याने आपला मेरुदंड पृथ्वीच्या काटकोनात आणून ठेवला. हे गणित लक्षात घेतले तर उठून बसले, की थंडी कमी का होते हे लक्षात येईल. पळाल्यानंतर थंडी खूप कमी होईल हे वेगळे, पण उठून बसल्यानंतर शरीरात उष्णता निर्माण होते, रक्‍तप्रवाह मेंदूकडे जाऊ लागतो व त्यातूनच ध्यानासाठी, योगासने करण्यासाठी, शरीरस्वास्थ्य, आत्म्याचे स्वास्थ्य, आत्म्याचे कल्याण ह्यासाठी पद्मासनात ताठ बसावे हा शोध लागला. बरे वाटावे, उत्साह यावा यासाठी बसणे किंवा उभे राहणे आवश्‍यक असते. तसेच 24 तासातील निदान सहा – सात तास आडवे राहिले नाही, तर मनुष्य उष्णतेमुळे थकून जातो. म्हणून थंडी वाजते आहे ह्या कारणासाठी झोपायचेच नाही असे ठरवून चालत नाही.

    थंडीच्या दिवसात, मग ती गुलाबी थंडी असो, कडकडीत थंडी असो,छान पैकी उबदार रजई पांघरून घेऊन झोपणे कल्याणकारक असते.
    जमिनीवर मांडी घालून ताठ बसणे किंवा ऊबदार रजई घेऊन झोपणे हा झाला तात्पुरता इलाज. परंतु थंडीपासून खरे संरक्षण केवळ कुडकुडणे थांबवून मिळू शकत नाही. उत्तम तेलाचा अभ्यंग हा खरा थंडीवरचा उपचार. आपण दीपावलीच्या वेळी अंगाला तेल-उटणे लावून ओवाळतो, ते येणाऱ्या थंडीत अभ्यंग आवश्‍यक करावा लागेल हे लक्षात ठेवण्यासाठी. अभ्यंग करत असताना खोलीत खूप थंड वातावरण नसावे. अभ्यंगाच्या वेळी बाहेर खूप थंडी असेल तर खोलीत शेगडी पेटवून ठेवावी