Category: दैनिक आरोग्य

  • लठ्ठपणा

    लठ्ठपणा

    व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

    कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. काही जणांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे वजन कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणि उलट पूर्वीपेक्षा अजूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक विकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन चरकसंहितेमध्ये अतिलठ्ठपणा ही निंद्य अवस्था असते असे सांगितले आहे.

    एका बाजूने मेद कमी करायचा ठरविले तरी दुसऱ्या बाजूने वातदोष वाढणार नाही, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सतेजता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणि त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश्‍यक असते. यापैकी आहाराबाबतची सविस्तर माहिती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुर्वेदाने सुचविलेले मुख्य मुद्दे याप्रमाणे होत,

    • अस्वप्न – कमी झोप
    • चिंतन – मानसिक व्यग्रता
    • आतपसेवन – उन्हाचा संपर्क
    • शारीरिक व्यायाम
    • अध्व – पायी चालणे

    कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जितकी आवश्‍यक आहे तेवढीच घेणे आणि दुपारी अजिबात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. कधीतरी जागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणे, जेवणानंतर विश्रांती म्हणून झोपून जाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

    मानसिक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राहिले, चिंतन करण्याजोग्या गोष्टीत गुंतून राहिले तर त्याचाही वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

    थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

    व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सहज करता येण्याजोगे, न थकवणारे व्यायाम करणेच हितावह असते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

    योग्य औषधयोजना हीसुद्धा वजन कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. फक्‍त मेदनलेखन इतकाच उद्देश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भडिमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अजूनच समस्या निर्माण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व वजन कमी करा, महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, तिखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

    • “काथ’ हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर व विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
    • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.
    • सकाळी उठल्यावर कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही वजन कमी होण्यास मदत मिळते.
    • माक्‍याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्‍या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

    उद्वर्तन – उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
    …अष्टांगहृदय सूत्रस्थान कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसाजच असतो, फक्‍त यात तेलाऐवजी बारीक चूर्ण वापरले जाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वर्तनाचे कोरडे चूर्ण चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिचारकाकाडून व्यवस्थित उद्वर्तन करून घेण्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होताना दिसतो.

    शरीरशुद्धी – वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला “मेद’ हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की जेवढे वजन कमी होणे अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व पंचकर्माच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक्‍तीचे वजन 20 किलो अधिक असले तर शास्त्रोक्‍त विरेचन, विशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वर्तन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकर्माच्या दरम्यान 6-8 किलो वजन कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकर्मानंतरही क्रमाक्रमाने वजन कमी होताना दिसते. एकाएकी वजन कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिणाम यात होत नाहीत, शिवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले वजन सहसा पुन्हा वाढतही नाही.

    – डॉ. श्री. बालाजी तांबे
  • डोकेदुखी

    डोकेदुखी

    डोके दुखणे माहीत नाही, अशी व्यक्‍ती सापडणे अवघडच असावे. वेदना वा दुखणे नकोसे वाटणे अगदी साहजिक असते; पण डोकेदुखी खरोखर खूप त्रासदायक असते.
    आयुर्वेदात डोक्‍याला उत्तमांग म्हटले आहे; कारण डोके हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू डोक्‍यात असतो, सर्व संप्रेरकांना चालना देणारी पिच्युटरी ग्रंथी डोक्‍यात असते, कान-नाक-डोळे वगैरे इंद्रियांचे अधिष्ठानही डोक्‍यात असते. मेंदूची जास्तीत जास्ती काळजी घ्यायला हवी, यात कोणत्याही शास्त्राचे दुमत नसावे. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीची तीव्रता, कालावधीसुद्धा व्यक्‍तीनुरूप व कालानुरूप बदलू शकते. म्हणूनच डोकेदुखीवर उपचार करताना अनेक मुद्‌द्‌यांवर विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे अचूक निदान करणे खूपच गरजेचे असते.डोकेदुखीची कारणे आयुर्वेदात याप्रमाणे दिलेली आहेत-
    * मल, मूत्र, शिंक वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवणे.
    * दिवसा झोपणे.
    * रात्री जागरण करणे.
    * अति मद्यपान किंवा अंमल चढणाऱ्या वस्तूंच्या आहारी जाणे.
    * डोक्‍यावर जोराचा वारा लागणे.
    * अति मैथुन करणे.
    * न आवडणारा वास घेणे.
    * धूळ, धूर, अतिशय थंडी किंवा उन्हाच्या संपर्कात येणे.
    * पचण्यास जड, आंबट, गोष्टींचे तसेच पुदिना, मिरची वगैरे हरितवर्गातील गोष्टींचे अतिसेवन.
    * अतिशय थंड पाणी पिणे.
    * डोक्‍याला मार लागणे.
    * अश्रूंना अडवून ठेवणे किंवा खूप रडणे.
    * शरीरात आमदोष वाढणे.
    * आकाशात मेघ दाटून येणे.
    * अतिशय मानसिक कष्ट होणे.
    * जनपदोध्वंसातील देश आणि काळ बिघडणे.
    यातील एक किंवा अनेक कारणांनी वातादी दोष असंतुलित होतात आणि डोक्‍यात जाऊन तेथील रक्तधातूला दूषित करतात. यातून अनेक प्रकारचे शिरोरोग उत्पन्न होतात. या शिरोरोगांचे मुख्य लक्षण असते शिरःशूळ अर्थात डोकेदुखी.
    शिरःशूळाचे एकूण 11 प्रकार सांगितलेले आहेत.
    1. वातदोषा : यामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये एकाएकी, क्षुल्लक कारणानेसुद्धा डोके खूप दुखू लागते. डोकेदुखी रात्री अधिक वाढते. डोक्‍यावर गरम वस्त्र आवळून बांधल्याने, तसेच डोक्‍याला शेक करण्याने या प्रकारचे दुखणे कमी होते.

    2. पित्तदोष: यामुळे डोके दुखते तेव्हा डोके व डोळ्यांची आग होते, श्‍वास गरम भासतो, दिवसा वेदना वाढतात तसेच गरम गोष्टी नकोशा वाटतात. डोक्‍याला थंड स्पर्शाने बरे वाटते. रात्री वेदना कमी होतात.

    3. कफदोष : यामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने डोके जड, जखडल्यासारखे वाटते; चेहऱ्यावर, डोळ्यांखाली सूज दुपारनंतर सूर्य खाली जातो तसतशा वेदना कमी होत जातात आणि सूर्यास्तानंतर थांबतात.

    4. अनन्तवात : वातादी तिन्ही दोष प्रकोपित होऊन मानेत तीव्र वेदना करतात. ही वेदना भुवया, डोळे व शंखप्रदेशापर्यंत पोचते, मान जखडू शकते, हनुवटी जखडू शकते. अनंतवातामुळे विविध प्रकारचे नेत्ररोगसुद्धा होऊ शकतात.

    5. अर्धावभेदक : याला सामान्य भाषेत अर्धशिशी असे म्हणतात. यात डोक्‍याच्या डाव्या वा उजव्या बाजूला अतिशय तीव्र वेदना होतात. या वेदना इतक्‍या तीव्र असतात, की जणू डोक्‍यात शस्त्राने प्रहार होत आहेत असे वाटते किंवा ऐरणीतून आग निघत असल्यासारखे वाटते. अर्धावभेदक खूप तीव्र झाला, तर त्याचा कान किंवा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

    6. शंखक : रक्‍त, पित्त व वात हे तिन्ही प्रकोपित झाल्याने ही डोकेदुखी होते. ती इतकी भयंकर असते, की तीन दिवसांच्या आत योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्‍ती मृत्युमुखी पडू शकते. डोकेदुखीवर उपचार करण्यापूर्वी नेमके कारण शोधून काढणे सर्वांत महत्त्वाचे असते. बहुतांशी वेळेला डोके दुखायला लागले, की केवळ वेदनाशामक उपचार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तात्पुरते बरे वाटले, तरी पुन्हा पुन्हा डोके दुखू शकते.

    7. वात : वातामुळे डोके दुखत असल्यास कानात तेल टाकता येते, नाकात तूप घालता येते, डोक्‍याला वातशामक तेल लावण्याचाही उपयोग होतो.

    8. पित्त : पित्तामुळे डोके दुखत असल्यास दुधात भिजविलेली आवळकाठी बारीक करून त्याचा डोक्‍यावर लेप लावल्यास बरे वाटते. दुधात तूप-साखर व थोडे केशर घालून पिण्याचाही फायदा होतो. ऊन लागून पित्त वाढत असल्यास कोकमाचे तेल व नारळाचे तेल गरम करून एकत्र करून थंड झाले, की डोक्‍याला लावण्याने बरे वाटते. गुलाबपाण्यात चंदन उगाळून त्याचा डोक्‍यावर लेप लावण्यानेही बरे वाटते.

    9. कफ : कफामुळे डोके दुखत असल्यास आल्याच्या रसात थोडीशी पिंपळी उगाळून त्यात थोडे सैंधव व गूळ मिसळून सेवन करण्याने बरे वाटते. सर्दीमुळे डोके दुखत असल्यास दुधात किंवा पाण्यात दालचिनी उगाळून लेप लावल्यास बरे वाटते. निर्गुडी, कडुनिंब, आघाडा यांचा पाला पाण्यात घालून त्याचा वाफारा घेतल्यानेही कफदोषाशी संबंधित डोकेदुखी दूर व्हायला मदत मिळते.

    10. रक्त : रक्तातील दोषामुळे डोके दुखते, त्यावर पित्तशामक उपचार करण्याचा उपयोग होतो. शतधौत तूप (म्हणजे 100 वेळा थंड पाण्याने धुतलेले तूप) डोक्‍यावर चोळण्याचा फायदा होतो. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन आणि रक्तमोक्षण करून घेण्याचाही फायदा होतो.

    वारंवार डोके दुखण्याची सवय असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही गोष्टी: 

    1. आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करणे.
    2. रात्री झोपताना नाकात साजूक तूप किवा अधिक गुण यावा म्हणून नस्यसॅन घृतासारखे औषधी तूप घालणे.
    3. संगणकावर काम करणाऱ्यांनी डोळ्यांत सॅन अंजनासारखे उष्णता कमी करण्यास मदत करणारे अंजन घालणे.
    4. स्त्रियांनी स्त्री संतुलनाकडे, विशेषतः पाळी नियमित आणि व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे.
    5. उन्हात किंवा वाऱ्यात जावे लागल्यास डोक्‍याला पुरेसे संरक्षण द्यावे.
    6. डोक्‍याला नियमित, कमीत कमी दोन वेळा तरी वातशामक व केसांना हितकर औषधी द्रव्यांनी संस्कारित तेल लावणे.
    7. रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • शाकाहार

    शाकाहार

    डॉ. श्री बालाजी तांबे

    अन्नाचे मुख्य कार्य शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार करणे हेच आहे. तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिकरीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो.

    शा काहार व मांसाहार असे आहाराचे दोन प्रकारात वर्गीकरण होते. आयुर्वेदात भाज्या, फळे वगैरे शाकाहारी द्रव्यांचे गुणधर्म सांगितले आहेत, त्याचप्रमाणे विविध पक्षी-प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्मही वर्णन केले आहेत. मात्र आयुर्वेदातील “अन्नयोग’ संकल्पना अंमलात आणायची ठरविले, औषधे बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घटकद्रव्यांचा आढावा घेतला तर मांसाहारापेक्षा शाकाहारालाच अधिक महत्त्व दिलेले आढळते.

    “चतुर्विध आहार’ ही संकल्पना आयुर्वेदात तसेच इतरही भारतीय शास्त्रांमध्येही आहे. पेय म्हणजे पिण्यास योग्य पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्याजोगे पदार्थ, भोज्य म्हणजे सहज खाता येतील असे पदार्थ आणि भक्ष्य म्हणजे चावून खाण्याजोगे पदार्थ असा चार प्रकारचा आहार असावा. कारण असा आहार शरीरपोषण व्यवस्थित करण्यास सक्षम असतो. या प्रकारचे चतुर्विधत्व आहारातून सहज शक्‍य असते. मांसाहार हा फक्‍त भक्ष्य प्रकारात आणि मांसापासून “मांसरस (सूप)’ तयार केला तर, फार तर पेय प्रकारात बसू शकतो.

    आयुर्वेदाने अन्नयोग संकल्पनेमध्ये षड्रस म्हणजे मधुर, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट अशा सहा चवींचा समावेश केला आहे.

    सर्व रसाभ्यासो बलकराणां श्रेष्ठः ।एक रसाभ्यासो दौर्बल्यकराणाम्‌ ।।…चरक सूत्रस्थान

    सहाही रसांचे (चवींचे) सेवन बल वाढवण्यासाठी व स्वास्थ्य टिकवण्यासाठी अत्यावश्‍यक आहे. केवळ एक-दोन रसांचे सेवन केल्यास मनुष्याला दुर्बलता येते व त्यातून विविध रोगही उद्भवू शकतात.

    शाकाहारातून षड्रस
    धान्ये, कडधान्ये, भाज्या, फळे यांचे गुणधर्म पाहिले असता लक्षात येते, की त्यांच्या योग्य संयोगातून आपणास सहाही रस मिळू शकतात. ऋतूंनुसार मिळणाऱ्या भाज्या व फळांतूनही त्या त्या ऋतूतील दोषस्थितीचे संतुलन करता येऊ शकते. याउलट मांसाहाराचा विचार केल्यास समजते, की बहुतांशी सर्व प्रकारचे मांस मधुर रसाचे आहे. क्वचित एखादेच मांस मधुर रसासह तुरट रसाचे किंवा तिखट विपाकाचे आहेत. अर्थात त्यामुळे मांसाहार हा पूर्ण आहार होऊ शकत नाही. आयुर्वेदात मांसाचे जे गुणधर्म सांगितले आहेत, त्यानुसार बहुतेक सर्व मांस पचण्यास अतिशय अवघड, उष्णता वाढविणारे व कफ, पित्तदोष वाढविणारे असतात असे समजते म्हणूनच जे नित्य व्यायाम करतात व ज्यांचा अग्नी प्रदीप्त आहे अशा व्यक्‍ती जर असा मांसाहार पचवू शकल्या तरच त्यापासून त्यांचे बल वाढू शकते, शुक्रधातूला शक्‍ती मिळू शकते.

    मांसाहार पचन क्षमतेत घट
    सध्याची जीवनशैली पाहता, हवामानातील बदल पाहता मांसाहार अनुकूल ठरण्याची शक्‍यता फारच कमी झालेली दिसते. मांसाहार पचण्यासाठी शारीरिक मेहनत आवश्‍यक असते, सध्या शरीराच्या तुलनेत मानसिक, बौद्धिक श्रमांचेच प्रमाण इतके वाढले आहे की मांसाहार पचवण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होते आहे.

    निसर्गातही काही पक्षी व प्राणी शाकाहारी तर काही मांसाहारी असतात असे आढळते. मात्र या प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा, शरीरक्रियांचा अभ्यास केला तर शाकाहारी प्राण्यांपेक्षा मांसाहारी प्राण्यांची मूलभूत जडणघडण विशेष पद्धतीने झाली आहे असे समजते. मांसाहारी प्राण्यांमधली आक्रमकता वेगळी असते, त्यांची मानसिकता, जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते. त्यांचे दात व पचनसंस्था वेगळ्या तऱ्हेने विकसित झालेली असते. मानवी शरीराची जडणघडण या पद्धतीची नाही. प्राण्यांपेक्षा वेगळी जीवनपद्धती, वेगळी मानसिकता असणे अपेक्षित असणाऱ्या मनुष्यप्राण्यासाठी मांसाहार हा आदर्श नाही. औषधातही फार क्वचित ठिकाणी मांसाचा अंतर्भाव केलेला आढळतो. खूपच धातुक्षय झाला असेल, तातडीने शक्‍ती देण्याची आवश्‍यकता असेल, तेव्हासुद्धा मांसाहारापेक्षा मांसरस (सूप) घ्यायला सांगितलेला दिसतो. मांससूप तृप्ती करणारे आहे. ज्याचे शरीर सुकत चालले आहे, जो रोगापासून मुक्‍त झाला आहे, जो स्वभावतःच कृश आहे व ज्यांचे शुक्र क्षीण झाले आहे त्यांनी मांससूप सेवन करावे असे चरकाचार्य म्हणतात. पण त्याच्याच पुढे ते असेही म्हणतात, व्यायामनित्याः । अर्थात जे नित्य व्यायाम करतात, म्हणजेच ज्यांचा जाठराग्नी प्रदीप्त असल्याने पचायला जड असणाऱ्या मांसाला पचवण्यास समर्थ आहे त्यांनीच मांससूप सेवन करावे. मद्य व मांस दोन्हीही राजस, तामस व मनोदोष वाढवणारे आहेत.

    शाकाहार सुरक्षित
    आहार सेवनाचा मुख्य उद्देश असतो, शरीराचे धारण करणे, शरीरावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होणे. हा उद्देश पूर्ण होण्याबरोबरच दुसऱ्या बाजूने त्यामुळे काही नुकसान तर होत नाही ना याकडे लक्ष देणेही आवश्‍यक असते. जसे गाडीमध्ये इंधन टाकताना आपण ते जितक्‍या चांगल्या प्रतीचे, जितके शुद्ध स्वरूपातील निवडू तितकी गाडी अधिक चांगली पळते, अधिक टिकते. शाकाहार व मांसाहार दोन्हीही पोट भरण्यास सक्षम असले तरी मांसाहाराच्या तुलनेत शाकाहार शरीराबरोबरच मानसिक पातळीवरसुद्धा अधिक सुरक्षित असतो, नुकसान न करणारा असतो.

    सध्या तर प्राण्यांचे वजन वाढावे, अंडी मिळण्याचे प्रमाणे वाढावे, कमीत कमी वेळात अधिक अंडी मिळावीत म्हणून अनेक अनैसर्गिक औषधांचा, हॉर्मोन्सचा सर्रास वापर केला जातो. ही सर्व शरीरघातक, अनैसर्गिक तत्त्वे मांसाहारात तशीच राहतात, मांसाहार सेवन करण्याच्या पोटात जातात, त्यामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

    बऱ्याचदा शाकाहारातून जीवनावश्‍यक सर्व तत्त्वांची पूर्ती होत नाही म्हणून मांसाहार आवश्‍यक आहे असा प्रचार केला जातो, पण संतुलित शाकाहार म्हणजे दूध, तूप, भाज्या, फळे, धान्ये, कडधान्ये वगैरे सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहार असला तर त्यातून सर्व आवश्‍यक तत्त्वे मिळू शकतात व ती सहज पचतात.

    एक गोष्ट लक्षात घ्यावी की खाणे जरी आपल्या हातात असले तरी पचवणे आपल्या हातात नाही. शेवटी जिभेला चांगले लागणारे असो, खाण्यापूर्वी ते अन्न कसेही असो, पचनानंतर त्याचे काय होते त्यालाच महत्त्व असते. म्हणजे त्यापासून कशा प्रकारचे शरीर, बल, प्राणशक्‍ती व मनोधारणा तयार होते हेच महत्त्वाचे ठरते.

    तेव्हा आपल्या शरीराला जे मानवेल, म्हणजेच नैसर्गिक रीत्या पचून बल देईल, असे अन्न प्रत्येकाने खावे. पूर्वी आपण पाहिले आहेच की केवळ शाकाहारच षड्ररसपूर्ण व चार प्रकारचे अन्न पुरवू शकतो. तेव्हा शाकाहाराचे महत्त्व ओळखून प्रत्येकाने शाकाहार करावा.

  • पावसाळा

    पावसाळा

    चातुर्मासातील व्रतांच्या मागे असलेले विज्ञान किती अचूक आहे हे आपल्याला सहज कळते; पण याकडे स्थूलपणे पाहिले, तरी इतर कुठली स्वर्गीय मदत मिळो – न मिळो, पण आरोग्य चांगले राहण्यासाठी ह्या सर्व व्रतवैकल्यांचा उपयोग होतो हे लक्षात येईल.

    चातुर्मास म्हणजे चार महिने. वर्षाचे ऋतू सहा आहेत असे आपण मानतो. चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू, आश्‍विन-कार्तिक शरद ऋतू, मार्गशीर्ष -पौष हेमंत ऋतू, आणि माघ-फाल्गुन शिशिर ऋतू असे सर्वसाधारण ऋतुचक्र असते.

    श्रावण-भाद्रपद वर्षा ऋतू असे म्हटले गेले असले, तरी अलीकडचे काही दिवस व पलीकडचे काही दिवस मिळून पावसाळा साधारण चार महिने असतो. हा चार महिन्यांचा कालखंड चातुर्मास म्हणून ओळखला जातो. बहुतेक ठिकाणी चार ऋतू महत्त्वाचे समजले जातात. तीन तीन महिन्यांचे चार ऋतू अशा तऱ्हेनेही वर्षाची विभागणी केलेली दिसते.

    वातावरण जसे बदलते तसे सर्वच प्राणिमात्रांमध्ये, सृष्टीमध्ये फरक पडतो. त्या दृष्टीने जीवनाच्या गणिताचे मोजमाप करावे लागते. पावसाचे महिने आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसतात. म्हणून पावसाळा आला रे आला की आषाढी एकादशीपासूनच काळजी घ्यायला सुरू करणे आवश्‍यक असते. ही काळजी घेण्याच्या दृष्टीने या दिवसापासून सुरू झालेला चातुर्मास दीपावलीपर्यंत चालतो. चातुर्मासाचा एकूणच पाप-पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी संबंध जोडणे मनुष्याला अधिक सोयीचे वाटते. कारण आचरणात आणण्यासाठी सोपे जाते म्हणून चातुर्मासाची व्रतवैकल्ये भारतीय संस्कृतीने बेतून दिलेली आहेत.
    या सर्व व्रतवैकल्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे खाण्या-पिण्यावरील निर्बंध. एकदा जेवणे, सूर्यास्तापूर्वी जेवणे, अमुक वस्तू अमुक दिवशी न खाणे, सोमवारी मुगाची खिचडी न करणे, विशिष्ट दिवशी विशिष्ट पक्वान्न करणे, कुठला तरी एक दिवस चूल न पेटवणे असे नियम केलेले दिसतात.

    श्रावणातील ऋषिपंचमीचे व्रत म्हणजे सेंद्रिय शेतीला, तसेच शेतीसाठी केलेल्या कष्टांना महत्त्व देण्याचाच एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही. नागाची पूजा करून सर्पांना अभयदान देण्यासाठी नागपंचमी; वडाची पूजा करून मनुष्याला पुनरुत्पत्तीसाठी व स्वतःचे शरीर नीट टिकवून सौंदर्य वाढविण्यासाठी तसेच उन्हातान्हात सावलीसाठी वटवृक्ष एखाद्या वृद्ध आजोबांसारखा मदत करतो ही माहिती सांगण्यासाठी वटपौर्णिमा; पावसाळ्यात बाहेरचे फिरणे कमी झाल्याने घरातल्या घरात स्वतःविषयीचा अभ्यास, अंतर्मुखता कशी साधावी यांचे ज्ञान मिळवून सद्गुरुंच्या पायी समर्पित होण्यासाठी तसेच गुरुतत्त्वाचा, ज्ञानाचा, मेंदूचा, मोठेपणाचा आदर करून त्यांना आपल्या जीवनात समाविष्ट करून घेऊन आपणही त्या लक्ष्यापर्यंत पोचू हे ध्येय डोळ्यासमोर राहण्यासाठी असलेली गुरुपौर्णिमा; शिवभक्‍ती करून जीवनात सौंदर्य व शांती मिळविण्यासाठी केलेले श्रावणात श्रावणी सोमवार;, अंगाला तेल लावून स्नान व अन्नदान करण्यासाठी श्रावणातले शनिवार; वनस्पतींची ओळख, त्यांचे घरगुती उपचार माहीत करून घेण्यासाठी (पत्री तोडताना संबंधित वनस्पतीच्या रसाचे सूक्ष्म भावाने आरोग्यप्राप्ती करून घेता येते) साजरे केलेले मंगळागौरी, हरतालिका हे सण; लग्नापूर्वीच्या मैत्रिणींना पुन्हा एकदा एकत्र करून रात्री जागरणे व खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाळा देऊन प्रेम वाढविण्यासाठी रात्रभर जागवलेल्या मंगळागौरी; लोकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कार्यक्रम आयोजित करून साजरा केलेला गणेशचतुर्थीचा उत्सव; शक्‍ति उपासना, कुंडलिनी जागरण व स्त्री-पुरुषांना एकत्र कार्य करता यावे या हेतूने असलेली नवरात्रातील दुर्गोपासना अशी अनेक व्रतवैकल्ये चातुर्मासात येतात.

    सूक्ष्मपणे विचार केला, तर या व्रतांच्या मागे असलेले विज्ञान किती अचूक आहे हे आपल्याला कळतेच; पण याकडे स्थूलपणे पाहिले तरी इतर कुठली स्वर्गीय मदत मिळो – न मिळो, पण आरोग्य चांगले राहण्यासाठी ह्या सर्व व्रतवैकल्यांचा उपयोग होतो हे सहज लक्षात येते.

    पावसाळ्यात जाठराग्नी मंद झालेला असतो, सूर्याचे दर्शन रोज होईलच याची शाश्‍वती नसते अशा वेळी पोटाचे स्वास्थ्य सांभाळण्यासाठी श्रावणाचा एक महिना मांसाहार वा जडान्न न खाण्याचे व्रत पाळणारे भाग्यवान ठरतात. एरवीही मांसाहार वा जडान्न पचले नाही तर मोठमोठ्या रोगांना आमंत्रण मिळते, तर मग पावसाळ्यात व भर श्रावणात मांसाहार केला तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील हे सांगण्यासाठी धन्वंतरीची आवश्‍यकता नाही. भारतीय संस्कृतीवर बाहेरून कितीही आघात झाले तरी आजही चातुर्मासातील व्रतवैकल्ये आदराने, प्रेमाने व श्रद्धेने सर्व लोक करत असतात. या व्रतवैकल्यांमुळे शरीर-मनावर होणारे फायदे ताबडतोब दिसून येतात. विद्यापीठाच्या पातळीवर हे सर्व कुणी सिद्ध केले असेल वा नसेल, पण वैयक्‍तिक पातळीवर ह्या व्रतवैकल्यांचा सर्वांनी अनुभव घेतलेला असतो व त्यातून मिळालेले फायदे पदरात पाडून घेतलेले असतात.

    हे सर्व थोतांड आहे, ह्याने काय होणार असे आक्षेप बऱ्याच वेळा आधुनिकतेच्या नावाखाली घेतले जातात व हे सर्व सिद्ध झालेले आहे का, कोण ह्या देवता, देवदेवतांच्या पूजा का करायची अशा शंका काढल्या जातात. पण हेच लोक गणपती उत्सव व नवरात्र हे दोन उत्सव मात्र हिरिरीने भाग घेऊन करतात. असा आक्षेप घेणारे काही जण असले तरी सर्वसामान्यजन चातुर्मासातील व्रतवैकल्ये अवश्‍य करतात. त्यातील काही व्यक्‍तिगत कारणाने, अहंकारापायी वा एखाद्या वस्तूची उपलब्धता असल्या-नसल्यामुळे फाफटपसारा वाढू शकतो. असे होणे चांगले नाही.

    तसे पाहिले तर केवळ चातुर्मासातील व्रतवैकल्येच वैज्ञानिक पायावरती, शरीर-मन व आत्म्याचे आरोग्य मिळावे व उत्कर्ष व्हावा या हेतूने तयार केलेली आहेत असे नव्हे, तर वर्षात येणारे सर्व सण व व्रतवैकल्ये कुठल्या ना कुठल्या फायद्यासाठी व विशिष्ट कारणानेच आयोजित केलेली दिसतात. अगदी दीपावलीच्या वेळी केली जाणारी फटाक्‍यांची आतषबाजी सुद्धा आवश्‍यक असते. तुझ्या फटाक्‍याचा आवाज मोठा का माझ्या फटाक्‍यांचा, अशा स्पर्धेपायी कानठळ्या बसविणारे उखळी बॉम्बसारखे फटाके फोडणे उचित नाही. अधिक वेळ चालण्यासाठी २०-२५ हजार फटाक्‍यांची माळ बनविणे वगैरे अतिरेक सोडून देऊन संतुलित पद्धतीने सण साजरे केले, तर त्यामागचे विज्ञान कळून येऊ शकते व त्याचे फायदे दिसतात.

    भाद्रपदात येणाऱ्या गणपतीचे व्रत हे केवळ सामाजिक संमेलनापुरतेच मर्यादित नसते, तर त्यात योगशास्त्राप्रमाणे असलेल्या शरीररचनेतील शक्‍तिउत्थापनाचे काम करता येईल अशी योजना केलेली असते.

    दीपावलीचे फराळाचे पदार्थ येणाऱ्या ऋतुमानात बदललेल्या पचनसंस्थेसाठी सुचविलेले असतात. एकूणच सर्व व्रतवैकल्यांची सांगड आरोग्याशी घातली गेली असल्यामुळे त्यांची यथासांग माहिती करून घेऊन त्यातल्या विज्ञानावर व स्वतःच्या लाभावर लक्ष ठेवून जर साजरी केली गेली तर देवाची कृपा, आरोग्यप्राप्ती व आनंदप्राप्ती होईल हे निश्‍चित !!

  • ’उन्हाळ्याच्या झळा’

    ’उन्हाळ्याच्या झळा’

    प्रत्येक प्राण्याच्या शरीराचे एक विशिष्ट तपमान असते. माणसाच्या शरीराचे तपमान सामान्यतः 98.6 फॅरनहीट असते. पण त्यात बदल होऊ लागला की अस्वस्थता जाणवते. शरीरात जवळ जवळ दोन तृतीयांश पाणीच असते व ह्यामुळे माणसाला ऊब जास्त आवडते. ऊब म्हणजे बाहेरील उष्णतेचा व मायेचा संबंध ! शरीर आतून किंवा बाहेरून उष्णतेने तापू लागले की शरीरातील पाणी कमी होऊ लागते व जीव अस्वस्थ होतो.
    शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडले की एूकणच जीवनाचेच संतुलन बिघडते. उन्हामुळे त्वचा काळी पडणे, डोळ्यांची आग होणे, लघवी कमी होणे, शौचाला-लघवीला जळजळ होणे, चक्कर येणे, याबरोबरच शरीरात रुक्षता जाणवते. पावसाळ्यातही रोगांची जास्ती काळजी घ्यावी लागते पण उन्हाळ्यात जरा जरी निष्काळजी राहिले तरी छोटे मोठे त्रास होण्याचा संभव अधिक असतो.

    उन्हाळ्यात वातावरणात खालील लक्षणे दिसू लागतात.

    * सूर्याची किरणे प्रखर होतात.
    * हवामान गरम होते.
    * नैर्ऋत्य दिशेने गरम वारे वाहू लागतात.
    * नद्या व इतर प्रवाहांचे पाणी कमी होते.
    * झाडांची पाने गळतात. गवत, झुडपे, वेली सुकून जातात.
    * जमिनीला भेगा पडतात.

    शरीरातील त्रिदोषांची स्थिति –
    आधीच्या म्हणजे वसंत ऋतूत वाढलेला कफदोष आपोआप कमी होतो. परंतु हवेतील उष्णता वाढल्याने वातावरण रुक्ष होते व शरीरात वातदोष साठावयास सुरवात होते.

    शरीराची पचनशक्ति –
    गरम हवेमुळे जाठराग्नीची पचनशक्ति कमी होते व म्हणूनच भूक फारशी लागत नाही.

    ऋतुचर्येचे मुख्य तत्त्व –
    स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम्‌ ।
    लवणाम्लकटूष्णानि व्यायामं चात्र वर्जयेत्‌ ॥…..चरक सूत्र
    मधुर म्हणजे चवीला गोड, थंड, द्रव व स्निग्ध अन्नपान या ऋतूत हितकर आहे तर खारट, आंबट, कडू, व उष्ण अन्नपदार्थ वर्ज्य करावेत. व्यायामही अति प्रमाणात करू नये.

    उन्हाळ्यात कसे वागावे?
    * अगदीच महत्त्वाचे व आवश्यिक काम असल्यासच उन्हात घराबाहेर पडावे.
    * पातळ व सुती कपडे घालावेत व तेही शक्यतो पांढऱ्या, किंवा फिक्या रंगांचे असावेत.
    * बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्सच्या चष्म्यांचा वापर करावा.
    * घरात पंखा, ए.सी. किंवा खिडक्यांवर वाळ्याचे पडदे लावून, पाणी छाटून थंडावा निर्माण करावा.
    * घामाघूम होईल असा व्यायाम न करता पोहण्याचा व्यायाम करावा.
    * शक्यतो गार पाण्याने स्नान करावे व अंगाला चंदन, वाळा, अशा शीत द्रव्यांचे चूर्ण लावावे.
    * इतर ऋतूत दुपारची झोप अत्यंत निषिद्ध सांगितलेली असली तरी उन्हाळ्यात अर्धा-पाऊण तास झोप आवश्य्क आहे. रात्र लहान असल्यामुळे झोप तशीही कमी झालेली असते.
    * सकाळी हिरव्या गवतावर अनवाणी चालावे. व सायंकाळी हिरवीगार झाडी असलेल्या बगीच्यात फिरायला अवश्यह जावे.
    * रात्री चांदण्यात झोपावे.
    * बाहेर उन्हात जाताना लिंबाचे सरबत पिऊन निघावे.
    * उष्माघात झाल्यास कांद्याचा रस पाजावा.
    * उन्हाळ्यात गुळवेल सत्त्व, प्रवाळ, मोती भस्म, गुलकंद, मोरावळा ह्या औषधींचा खास उपयोग होतो.
    * धान्यात तांदूळ, नाचणी, ज्वारी यांचा उपयोग करावा. बाजरी गुणधर्माने उष्ण असल्याने बाजरीचे पीठ वापरायचे झाल्यास त्यात ज्वारीचे पीठ समप्रमाणात मिसळावे व भाकरी करावी.
    * दूर्वांचा रस पोटात घेण्यास उत्तम आहे.
    * ग्रीष्म ऋतूत मूत्रल दोष उत्पन्न होतात. लघवी अडकणे, किंवा लघवीला आग होणे अशा तक्रारी जाणवतात. अशा वेळी धण्याची पूड काही वेळ पाण्यात भिजवून, खडीसाखर घालून प्यावे.
    * औदुंबराचे पाणी किंवा औदुंबराच्या फळाचे सरबत हे उन्हाळी लागल्यास उत्तम औषध आहे.
    * उन्हात खेळ खेळावे लागल्यास त्वचेवर संरक्षक मलम लावून खेळावे.
    * शरीरातील उष्णतेमुळे नाकातून रक्त येण्याची सवय असणाऱ्यांना उन्हाळ्यात हा त्रास अधिकच होतो. शरीरातील कडकी दूर करून थंडावा देणारी गुलकंद, प्रवाळ यासारखी औषधे घेतल्यास , कांदा सुंघवल्यास किंवा उगाळलेल्या चंदनाचा लेप कपाळावर लावल्याने हा त्रास कमी होतो.
    * व्यायामानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर बऱ्याच जणांना खूप घाम येतो. अशा वेळी घामाने भिजलेले कपडे अवश्यल बदलावेत. काखेत घामाचा बॅक्टेरियांशी संबंध आल्याने शरीराला दुर्गंध येऊ लागतो. त्यासाठी कोलन वॉटर ने काखा साफ करून तेथे चंदन, मंजिष्ठा, किंवा टाल्कम पावडर छिडवावी.
    * तळपाय व तळहाताची जळजळ होत असल्यास मेंदी वाटून किंवा भिजवून लेप केल्याने किंवा तूप लावून काशाच्या वाटीने तळपाय व तळहात घासल्याने दाह कमी होतो.
    * आहारात घरचे साजूक तूप, ताजे लोणी यांचा समावेश असणे. जेवणानंतर अविपत्तिकर चूर्ण, सॅनकूल चूर्ण तसेच कपभर कोमट पाण्यासह दोन चमचे साजूक तूप घेणे.
    * सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतु आहे.
    * पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
    * कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून आतील गर पाण्यात कुस्करून गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
    * साधे लिंबू सरबत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरते. येण्याऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा ऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब सरबत वगैरे द्यावे.
    * शहाळ्याचे पाणी व नारळाचे दूध थंडावा देऊन शरीराची ताकद वाढवते.
    * काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान! काकडी कापून मीठ, लावून खावी. तसेच काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात अवश्यण खावी. कमी होणाऱ्या लघवीसाठी पण काकडी उपयोगी पडते.
    * कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम ! आंबा हे फळ उन्हाळ्यात येत असले तरी उष्ण असल्यामुळे आमरस नेहमीच तूप घालूनच घ्यावा.

    उन्हाळ्याच्या त्रासाला हरवणारा आहार
    * तिखट, रुक्ष व खूप गरम गोष्टी खाऊ नयेत.
    * दही, लस्सी वर्ज्य समजावी.
    * ढोबळी मिरची, कारले, मेथी या भाज्या सहसा वापरू नयेत
    * पचावयास जड आणि शरीरात वात वाढवणारे मटार, पावटा, चवळी, हरबरा, छोले, वाल अशी कडधान्ये टाळावीत.
    * हिंग, मोहरी, ओवा, तीळ, लाल मिरची, अशी तीक्ष्ण मसाल्याचे पदार्थ वापरू नयेत. चिंच अननस, कच्चा टोमॅटो ही आंबट फळे खाऊ नयेत.
    * डाळींचा उपयोग कमी करावा.
    * कांदा ग्रीष्म ऋतूसाठी लाभदायक आहे. लसणाची चटणी मात्र खाऊ नये.
    * सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आनंद घेण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतु आहे.
    * पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा.
    * कैरीचे पन्हे उन्हाळ्याच्या दिवसात उत्तम. कैरी उकडून आतील गर पाण्यात कुस्करून गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, मीठ, जिरे घालून पन्हे करावे.
    * साधे लिंबू सरबत सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरते. येण्याऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांसाठी चहा ऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, गुलाब सरबत वगैरे द्यावे.
    * शहाळ्याचे पाणी व नारळाचे दूध थंडावा देऊन शरीराची ताकद वाढवते.
    * काकडी उन्हाळ्यासाठी निसर्गाचे दुसरे वरदान! काकडी कापून मीठ, लावून खावी. तसेच काकडीची कोशिंबीर उन्हाळ्यात अवश्यन खावी. कमी होणाऱ्या लघवीसाठी पण काकडी उपयोगी पडते.
    * कोहळ्याचा पेठा उन्हाळ्यात कमी होणारी ताकद वाढवण्यासाठी उत्तम! आंबा हे फळ उन्हाळ्यात येत असले तरी उष्ण असल्यामुळे आमरस नेहमीच तूप घालूनच घ्यावा.

    उन्हाळ्यात त्वचेवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून उन्हात जाताना सनस्क्रीन क्रीम लावणे सर्वपरिचित असते. मात्र त्याबरोबरीने पुढील उपाय योजता येतात.
    स्नानाच्या वेळी साबणाऐवजी अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे वापरण्याने, मसुराचे पीठ व सॅन मसाज पावडर यांचे समभाग मिश्रण वापरण्यानेही उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण होत असते. उन्हाळ्यात कपडे सुती किंवा रेशमी, शक्यतो हलक्या रंगाचे घालणे, फार घट्ट कपडे घालणे टाळणे श्रेयस्कर असते. घामोळे आल्यास त्यावर चंदनाचे गंध लावण्याचा उपयोग होतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळ्या कमी होतात. शरीरातील उष्णता कमी व्हावी, बरोबरीने रक्तशुद्धी व्हावी याताठी अनंत कल्प, शतावरी कल्प, संतुलन पित्तशांती गोळ्या घेणेही उत्तम असते.
    सूर्य हाच जगाचा तारक आहे. शारीरिक आरोग्यासाठी सूर्य, मानसिक आरोग्यासाठी मोकळेपणा व पारदर्शकता देणारा सूर्य आणि अध्यात्मिक आरोग्यासाठी ज्ञानप्रकाश देणाराही सूर्यच !! उन्हाळ्यात होणाऱ्या थोड्याश्याळ गैरसोयी सोप्या उपायांनी कमी करून सूर्योपासना हाच मानवतेचा तारकमंत्र !!!

    घराच्या बाहेर जाताना छत्री, टोपी व गॉगल्सच्या चष्म्यांचा वापर करावा.

    उन्हात खेळ खेळावे लागल्यास त्वचेवर संरक्षक मलम लावून खेळावे.

    आहारात घरचे साजूक तूप ताजे लोणी यांचा समावेश असणे.

    सर्व तऱ्हेच्या फळांच्या सरबतांचा आहारात वापर करावा.

    पालक, तांदुळजा, माठ, राजगिरा, एवढेच नव्हे तर सर्व पालेभाज्यांचा भरपूर वापर करावा

  • ठिसूळ हाडे

    ठिसूळ हाडे

    ‘अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठर कणा टणक पाठ’
    असे कवी वसंत बापट यांनी वारा खात, गारा खात उन्हात ताठ वावरणाऱ्या एका कार्यकर्त्याचे वर्णन केले आहे. ज्याची हाडे भक्कम आहेत, अशा कुणासाठीही हे वर्णन चालू शकेल. पण या लाकडाचा आतून भुगा होऊ लागला की झाडही वाकू लागतं. हाडांमध्ये जाळी होऊ नये, ती ठिसूळ होऊ नयेत याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी.

    ऑस्टिओ म्हणजे हाड व पोरोसिस म्हणजे सच्छिद्रता, ठिसुळता. तेव्हा हाडे ठिसूळ होणे म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. वास्तविक हाडांचा सापळा हा शरीराचा भक्कम साचा असतो. या साच्याच्या आधारानेच शरीर बांधलेले असते. ताठपणे उभे राहायचे असेल, तर मुळातला हा साचा भक्कम असावा लागतो. ऑस्टिओपोरोसिसमध्ये मात्र साच्यातला कणखरपणा कमी होत असतो.

    हाडांच्या संरचनेबद्दल आयुर्वेदात सांगितले आहे-
    देहे शरीरधारकः कठिनतमः सारो धातुः।।…सुश्रुत सूत्रस्थान
    शरीर धारण करणारा सर्वांत कठीण, सारस्वरूप असणारा धातू म्हणजे अस्थिधातू होय.
    अस्थ्नोः जनिः स्वोष्मणः कृतः
    पृथिव्यग्न्यनिलादीनां संघातः खरत्वं प्रकरोति।
    ततोऽस्य नृणामस्थि जायते।
    अस्थ्नां मध्ये समीरिणः सौषिर्यं करोति।
    …चरक चिकित्सास्थान
    पृथ्वी, अग्नी आणि वायू यांचे एकत्र पचन होत असताना कठीणत्व तयार होते, त्यातून अस्थी तयार होतात. वायू अस्थींमध्ये पोकळी वा सच्छिद्रता निर्माण करतो.
    तत्स्वरूपम्‌ कठिनं स्थिरं, मज्जपूर्णं सुषिरम्‌।
    …अष्टांग हृदय, काश्‍यपसंहिता
    हाडे कठीण असतात, स्थिर असतात, सच्छिद्र व मज्जेने भरलेली असतात. पृथ्वी महाभूताचा संबंध असल्याने हाडे कठीण व स्थिर असतात आणि वायू महाभूताचा संबंध असल्याने हाडांमध्ये सच्छिद्रता असते. मज्जाधातू राहावा म्हणून हाडांमध्ये उचित पोकळी असते.
    मात्र, अस्थिधातूमधील पृथ्वी, अग्नी व वायू यांचे संतुलन बिघडले, की अस्थींमधली स्थिरता कमी होते व सच्छिद्रता वाढायला लागते आणि त्यातूनच ऑस्टिओपोरोसिसची सुरवात होते.

    रजोनिवृत्तीनंतरही शरीरात वातदोष वाढत असल्याने ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्‍यता वाढते. वयानुसार वाढणाऱ्या वाताला नियंत्रित केले नाही, तर त्यामुळेही अस्थी धातूतील सच्छिद्रता वाढू शकते. याशिवाय बाळंतपणानंतर वातदोषाला संतुलित करण्यासाठीचे उपचार न करणे, हाडांना पोषक आहारपदार्थांचे सेवन न करणे, स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, शरीरावश्‍यक धातू खर्च होणे, पुरुषांमध्ये शुक्रधातू अति प्रमाणात खर्च होणे यांसारख्या अनेक कारणांनी हाडांमध्ये वात वाढून ऑस्टिओपोरोसिसची संप्राप्ती सुरू होऊ शकते.
    ऑस्टिओपोरोसिसमध्ये हाडांची स्थिरता, घनता कमी होत असल्याने हाड मोडण्याची शक्‍यता वाढते. याशिवाय अस्थिक्षयाची म्हणून आयुर्वेदात सांगितलेली लक्षणेही दिसू लागतात.

    लक्षणे –
    केशलोमनखश्‍मश्रु द्विजप्रपतनं श्रमः।
    ज्ञेयमस्थिक्षये लिङगं सन्धिशैथिल्यमेव च।।
    …चरक सूत्रस्थान
    – केस, रोम, मिशा वगैरे झडणे
    – नखे न वाढणे वा तुटणे
    – दात तुटणे
    – सांध्यांमध्ये शैथिल्य उत्पन्न होणे
    – थोड्याही श्रमाने थकवा येणे

    याखेरीज ऑस्टिओपोरोसिसमध्ये सामान्यतः दिसणारी लक्षणे याप्रमाणे होत-
    – हात-पाय दुखणे
    – सांधे दुखणे
    – तोंड कोरडे पडणे
    – ताठ उभे राहता न येणे
    – कंबर-पाठ दुखणे
    – अशक्‍तता जाणवणे

    प्रतिबंधात्मक उपाय –
    आयुर्वेदिक जीवनशैलीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की त्यांचा रोजच्या जीवनात समावेश केला, तर ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध करता येईल.
    अभ्यंग- अंगाला नियमित तेल लावणे व ते आतपर्यंत जिरवणे हे सर्व धातूंसाठी पोषक सांगितले आहे. शास्त्रोक्‍त पद्धतीने तेल सिद्ध केलेले असेल, तर ते खरोखर आतपर्यंत जिरून अगदी हाडांपर्यंतही पोचू शकते व तेथे वातदोषाला संतुलित करून ऑस्टिओपोरोसिस होण्यास प्रतिबंध करू शकते. वाढलेला वात कमी करण्यासाठी म्हणजे ऑस्टिओपोरोसिसमुळे झिजणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्यासाठीही अभ्यंग करण्याचा उपयोग होताना दिसतो.
    व्यायाम – प्रकृतिनुरूप योग्य व्यायाम करण्याने सर्व शरीरधातू स्थिर होतात, सशक्‍त बनतात, असे सांगितले जाते. म्हणूनच नियमित व्यायामाने वात संतुलित ठेवता आला, की त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसला प्रतिबंध होऊ शकतो. व्यायामाच्या बाबतीत लक्षात घ्यायला हवे, की अतिव्यायाम, शरीरशक्‍तीचा विचार न करता केलेल्या व्यायामामुळे वात वाढून अपाय होऊ शकतो. तेव्हा शरीर दृढ होईल, असा व्यायाम करणेच चांगले.

    झोप – योग्य वेळेला योग्य प्रमाणात झोपणे हे सुद्धा धातुपोषक असते; तसेच शरीरदृढता, शरीरशक्‍ती टिकविण्यासाठी महत्त्वाची असते. रात्र-रात्र जागरण करणे, आवश्‍यकतेपेक्षा कमी झोपणे यामुळे वात वाढून उलट ऑस्टिओपोरोसिसला हातभार लागू शकतो.

    संतुलित आहार – आहारात सातही धातूंचे पोषण होईल अशी तत्त्वे असावीत, असे आयुर्वेद सांगतो; तसेच घेतलेला आहार पचून अंगी लागेल व सातही धातू सशक्‍त राहतील यासाठी मुळात पचनसंस्था व्यवस्थित असणे आवश्‍यक असते. हे दोन्ही हेतू साध्य होण्यासाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा ठरतो. ऑस्टिओपोरोसिस टाळण्याच्या दृष्टीने आहारात दूध, खारीक, तुपात तळलेल्या डिंकाची लाही, शतावरी कल्प वगैरे पदार्थ असणे अपेक्षित होय.

    औषधे घेताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, की औषधे शरीरात सात्म्य व्हायला पाहिजेत, म्हणजे पचन झाले पाहिजे. शिवाय रासायनिक औषधे उष्ण पडणार नाहीत व इतर कोठली रिऍक्‍शन येणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल. मौक्‍तिक, प्रवाळ या नैसर्गिक वस्तू उष्ण नसतात.
    थोडक्‍यात, योग्य उपचार केले, आहारात योग्य ती काळजी घेतली, तर ऑस्टिओपोरोसिसची भीती बाळगायची गरज नाही.

    ऑस्टिओपोरोसिसवर काही सामान्य उपाय सांगता येतील –
    – अंगाला नियमितपणे तेल लावणे. हे तेल वातशामक औषधांनी सिद्ध केलेले आहे व आत हाडांपर्यंत जिरण्याच्या क्षमतेचे आहे याची खात्री असायला हवी.
    – आहारात वातशमनाच्या दृष्टीने घरचे ताजे लोणी, साजूक तूप, मधुर चवीच्या पदार्थांचा समावेश करणे.
    – सेवन केलेला आहार हाडांपर्यंत पोचू शकेल यासाठी पचन व्यवस्थित ठेवणे.
    – आहारद्रव्यांपैकी दूध, खारीक, डिंकाचे लाडू वगैरेंचा, तर औषधद्रव्यांपैकी अश्‍वगंधा, प्रवाळभस्म, शंखभस्म, शतावरी, बला वगैरेंचे सेवन करणे.
    – कपभर दुधात चमचाभर खारकेची पूड टाकून मंद आचेवर थोडेसे उकळून पिणे.
    – प्रवाळपंचामृत, मुक्‍ता वटी, कॅल्सिसॅन, पित्तशांती वगैरे नैसर्गिक कॅल्शियमयुक्‍त योगांचे सेवन करणे.
    – पुनर्जीवनाच्या दृष्टीने शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे व नंतर अस्थिपोषक द्रव्यांनी; तसेच तिक्‍तरसयुक्‍त द्रव्यांनी सिद्ध तेल व दुधाची बस्ती घेणे.
    – गंध तेल, च्यवनप्राश, “मॅरोसॅन’, “सॅनरोझ’सारख्या रसायनांचे सेवन करणे.
    ऑस्टिओपोरोसिसवर उपचार करताना …
    – वातदोष संतुलित करणे.
    – हाडांना पोषक तत्त्वांचा पुरवठा करून अधिकाधिक झीज होण्यास प्रतिबंध करणे.
    – एकंदर शरीराचे पुनर्जीवन करून झालेली झीज भरून काढणे.

    – डॉ. श्री बालाजी तांबे

  • हाडांची काळजी

    हाडांची काळजी

    मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा आयुष्यात हाडांची काळजी घेतली गेली तर अशा तऱ्हेच्या रोगाचा त्रास होऊ नये.

    ऑस्टिओ म्हणजे हाडे व पोरोसिस म्हणजे छिद्रे असलेले. भुसभुशीत हाडे, असे ऑस्टिओपोरोसिस या शब्दाचे भाषांतर करायला हरकत नाही.
    कोकणात आमचे एक स्वयंभू गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय जुने आहे. आमच्या पूर्वजांपैकी एकाला दृष्टान्त देऊन श्री गणेशांनी त्या ठिकाणी वास्तव्य केले. माहेरची तांबे असलेली झाशीची राणी या गणपतीच्या दर्शनाला गेली असता त्या वेळी तिने तिचा हत्ती कोठे बांधला होता, असे सांगणारी मंडळी गावात आहेत. दर वर्षी माघी चतुर्थीला या गणपतीचा उत्सव असतो. हा गजानन नवसाला पावतो, त्याच्याशी बोलता येते, त्याला आपली संकटे सांगून सोडवून घेता येतात, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने चतुर्थीचा उत्सव जोरात होतो. काळाच्या ओघात तांबे मंडळी इकडे तिकडे पसरून गेली व आज तांब्यांची फक्‍त एक-दोन घरे तेथे आहेत. हे मंदिर जुने असले तरी अत्यंत सुंदर आहे. बाहेर सभामंडप असून, आतल्या छोट्या गर्भागारात श्री गजाननाची मूर्ती आहे. बाहेरच्या सभामंडपाला सहजपणे कवेत घेता येणार नाहीत, असे लाकडी खांब होते. हे खांब दिसायला व आकाराला फार सुंदर असले तरी ते सभामंडपातील मोठी जागा व्यापून उभे होते. खांबाच्या अंगावर जेव्हा भोके दिसायला लागली तेव्हा नीट पाहता लक्षात आले, की खांब आतून वाळवी वा किड्यांनी पोखरले गेले आहेत. खांबांची परीक्षा करणे खूप सोपे होते. बाहेरून टिचकीने वाजवले, की आतला पोकळपणा सहज कळून येत असे. मंदिर केव्हा पडेल, याची शाश्‍वती वाटेनाशी झाल्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार केला. अर्थात मूळ मंदिराची कोकणी पद्धतीची बांधणी होती तशीच ठेवून संपूर्ण मंदिर स्टील वापरून पुन्हा बांधून काढले. जेणेकरून सभामंडपातील जागाही वाढली.

    मंदिराचे खांब जसे पोकळ झाले, तसेच मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. साधारण धक्का लागला तरी हाड मोडणे, सांधे मजबूत न राहिल्याने सांध्यांच्या ठिकाणी दुखणे, अशा तऱ्हेचे विकार सुरू होतात. एकूणच हाडांमधली ताकद कमी होणे वा त्यात छिद्रे पडणे वा ती भुसभुशीत होणे, या सर्व प्रकाराला “ऑस्टिओपोरोसिस’ वा “अस्थिधातूचे दौर्बल्य’ असे म्हणायला हरकत नाही.

    याची कारणे अनेक असू शकतात. हाडांचे पोषण करणारे सर्वांत महत्त्वाचे अन्न आहे दूध व दुधाचे पदार्थ. जाड होण्याच्या भीतीने अनेकांनी दूधदुभते बंद केले व हा विकार वाढायला सुरवात झाली. इतर पदार्थांत कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, एवढीच गोष्ट पाहणे पुरेसे नसून, त्यातील कॅल्शियम शरीरात सुलभपणे सात्म्य होईल व शरीरात अतिरिक्‍त उष्णता उत्पन्न होणार नाही, या गोष्टींकडेही लक्ष देणे आवश्‍यक असते. अशा पदार्थांची आहारात कमतरता झाल्यामुळे हा विकार वाढणे अधिकच सोपे झाले. शिवाय मनुष्याला एकूणच सूर्यप्रकाश कमी मिळू लागला, पर्यावरण प्रदूषित झाले, गगनचुंबी खोल्यांमध्ये दोन वा तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना घरात तर सूर्यप्रकाश मिळेनासा झालाच; पण या उंच घरांच्या सावल्या रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरही सूर्यप्रकाश मिळेनासा झाला.

    हे कारणही हाडे भुसभुशीत होण्यासाठी पुरेसे असते. सारखे वातानुकूलित हवेत राहिल्यामुळे श्‍वसनावर व पचनावर परिणाम होऊन सरतेशेवटी याची परिणती मेदधातूच्या पलीकडे असणारे अस्थी, मज्जा व वीर्यधातू कमकुवत होण्यात होते. शिवाय सतत उभे राहून काम करणे, शरीराच्या ताकदीपलीकडे अति काम करणे, पैशाच्या लोभापायी काळवेळ न पाहता काम करणे, अशा सर्व कारणांनीसुद्धा असा विकार होऊ शकतो. अति मानसिक ताण किंवा अग्नीचे असंतुलन, हॉर्मोनल असंतुलन या कारणांमुळेसुद्धा एकूण शरीराचे संतुलन बिघडून मज्जा, अस्थी, वीर्य यावर परिणाम दिसून येतात. स्त्रियांच्या बाबतीत पाळीतील दोषांमुळे अंगावरून लाल-पांढरे जाण्याचा विकार जडल्यास पुढे हाडे भुसभुशीत होऊ शकतात. तेव्हा ऑस्टिओपोरोसिस हा रोग व्हायला एक ना दोन- अनेक कारणे असतात.

    एका बाजूने घर बांधत असताना कॉंक्रिटमध्ये टाकलेल्या सळया गंजून जाऊ नयेत, जास्ती टिकाव्यात यासाठी त्यांच्यावर वेष्टण केले जाते, तर दुसऱ्या बाजूने मनुष्याच्या अस्तित्वासाठी असलेले शरीर ज्या आर.सी.सी.रूपी हाडांवर उभे आहे, त्या हाडांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
    हाडे कमकुवत होत आहेत, हे वेळच्या वेळी लक्षात आले तर ठीक असते अन्यथा मोठे त्रास होऊ शकतात. सध्या हाडे मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ती कमकुवत झाली आहेत का, हे शोधण्यावर अधिक लक्ष दिलेले दिसते. हाडांचा कठीणपणा (घनता – डेन्सिटी) शोधणारी यंत्रे निर्माण झाली आहेत. तपासणी झाल्यानंतर अनेक प्रकारच्या गोळ्या घ्यायला सांगितल्या जातात. या गोळ्या पोटात गेल्यावर स्वीकारल्या जातात किंवा नाही, त्या शरीराला सात्म्य होतात की नाही व त्यांचा शरीरावर दुसरा काही परिणाम होतो आहे का, याकडे दुर्लक्ष केले जाते. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा आयुष्यात हाडांची काळजी घेतली गेली तर अशा तऱ्हेच्या रोगाचा त्रास होऊ नये. परंतु पूर्वी म्हटल्यानुसार आहारात दूध-दुभत्याचा अभाव असतो; डिंक, खारीक, शतावरी या पदार्थांची तर नावेच ऐकलेली नसतात.

    आयुर्वेदाने सुचविलेली प्रवाळ, मौक्‍तिक, शौक्‍तिक वगैरेंपासून बनविलेली कॅल्शियमयुक्‍त औषधे शरीरात उष्णता न वाढवता हाडांना मजबुती आणतात. ही नैसर्गिक द्रव्ये थोडी महाग असल्यामुळे स्वस्तातला चुना खाण्यात काही अर्थ नाही. हाडे बळकट करण्यासाठी उपलब्ध असलेली स्वस्तातली औषधे एकूणच “भीक नको पण कुत्रा आवर’ या वर्गातली असतात. स्वस्त-महाग पाहत असताना काळाचेही गणित सांभाळावे लागते, याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केलेले दिसते. स्वस्तातला कंपास घेतल्यास दर वर्षी मुलाला नवीन कंपास घेऊन द्यावा लागल्याची उदाहरणे दिसतात. याउलट वडील इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकताना त्यांनी वापरलेला कंपास त्यांच्या मुलाने तो इंजिनिअरिंग शिकत असताना वापरता येणार असला तर वडिलांना सुरवातीला महाग वाटणारा कंपास शेवटी स्वस्त ठरतो. अशी चांगली वस्तू घरात असल्याचे समाधान मिळते ते वेगळेच.

    शरीरातील हाडे खूप महत्त्वाची असतात व या अस्थिधातूचे संरक्षण करणे, हाच ऑस्टिओपोरोसिसवरचा खरा इलाज आहे.

  • कथा च्यवनप्राशाची

    कथा च्यवनप्राशाची

    कथा च्यवनप्राशाची

    आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

    च्यवन ऋषींनी अगदी म्हातारपण आल्यानंतर म्हणजे वृद्धत्वाची सर्व लक्षणे दिसू लागल्यानंतर, बरोबरीने मेरुदंड वाकून डोके जमिनीकडे जायला लागल्यानंतर संतानप्राप्तीची अपेक्षा केली. म्हणून प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी हा आवळ्याचा च्यवनप्राश बनवून त्यांना दिला व त्यानंतर त्यांचे वयस्थापन झाले म्हणजे त्यांना तारुण्य परत मिळाले, पाठीच्या मणक्‍यांना ताकद मिळाली, वीर्यवृद्धी झाली आणि उशिरा सुरू केलेला संसार साधता आला आणि ते निसर्गचक्राला गती देण्यास समर्थ झाले.

    आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असतोच पण त्यांना मन असते, प्राण असतो, त्यांना आत्मा असतो असे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे वनस्पतींचा स्वभाव विशिष्ट प्रकारे ठरलेला असतो. वनस्पतीवर संस्कार झाले तर त्यांचा स्वभाव बदलता येतो म्हणजेच त्या वनस्पतींचे गुणधर्म वाढवता येतात व मानवाला उपयोगी ठरतील असे गुणधर्म त्यात आणता येतात.

    आवळ्याच्या झाडाखाली श्री विष्णूंचा वास असतो म्हणून आवळ्याच्या झाडाचे आणि श्री विष्णूंचे पूजन व आवळीच्या सावलीत भोजन सांगितलेले असते. आवळ्याच्या झाडाच्या आसपास असणाऱ्या वातावरणात प्रतिकारशक्‍ती वाढवून चेतासंस्थेसाठी फायदा होईल असे वायू व शक्‍ती असणार म्हणूनच ह्या परंपरा भारतीयांनी स्वीकारल्या.

    आवळा चोचून साखरेच्या पाकात टाकून केलेला मोरावळा हा अवलेह सर्वांच्या परिचयाचा असतो. आवळा, आवळ्याचा रस, मोरावळा ही सर्व रसायनेच आहेत. म्हणूनच आवळा, हिरडा, बेहडा यांच्यापासून बनविलेला त्रिफळा हे सुद्धा एक रसायनच आहे. हिरडा हे स्वतंत्ररीत्याही एक रसायन आहेच.

    शिजवलेले आवळे, साखरेचा पाक व वेगवेगळ्या वनस्पतींची चूर्ण, घन वगैरे गोष्टींचे मिश्रण म्हणजे च्यवनप्राश नव्हे. आवळा कमी पडतो म्हणून आवळ्याच्या ऐवजी भोपळा टाकून बनविलेल्या च्यवनप्राशबद्दल तर काही बोलायलाच नको. च्यवनप्राश बनविताना वात-पित्त-कफ ह्यांचे संतुलन करणाऱ्या तसेच सप्तधातूंना संतुलित करून पुष्ट करणाऱ्या वनस्पती तसेच रक्‍तशुद्धीसाठी व एकूणच शरीराची प्रतिकारशक्‍ती वाढावी, वीर्यवर्धन व्हावे ह्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची योजना करून त्यांचा काढा बनविणे अभिप्रेत असते. काढा केल्याने वनस्पतींमध्ये असलेली द्रव्ये अति सूक्ष्म कणात (नॅनो) रूपांतरित होतात. काढा होत असताना त्यात आवळे शिजवले जातात त्यामुळे आवळ्यांवर वनस्पतींचा संस्कार व्हायला सुरुवात होते. शिजलेल्या आवळ्यांमधील बिया व रेषा काढून मिळालेला गर तुपावर लालसर परतून घेतला जातो, नंतर तेलावर परतला जातो. तयार झालेला काढा गाळून घेऊन वनस्पती टाकून दिल्या जातात व उरलेला काढा घट्ट केला जातो. साखरेच्या पाकात काढा व तेला-तुपावर परतलेला गर टाकून मिश्रण परत शिजविले जाते. हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात मध, सुगंधी द्रव्ये मिसळली जातात. ह्या सुगंधी द्रव्यांच्या औषधी गुणधर्माचा फायदा होतोच पण मन प्रसन्न करण्यासाठीही उपयोग होतो. हा झाला आयुर्वेदात सांगितलेल्या पाठानुसार बनविलेला च्यवनप्राश.

    ताज्या आवळ्यांऐवजी वाळलेले आवळे म्हणजे आवळकाठी, इतर वनस्पती एकत्र शिजवून त्यात साखर टाकून केलेल्या पदार्थाला च्यवनप्राश असे म्हणता येणार नाही. अश्‍विनीकुमारांनी च्यवनऋषींसाठी केलेला प्राश तो खरा च्यवनप्राश. तो बनविण्याची पद्धत बदलली, संस्कार करण्याची परंपरा बदलली तर बनलेल्या पदार्थाला च्यवनप्राश म्हणता येत नाही. शिवाय च्यवनप्राश बनविताना त्यातील काही महाग वनस्पती वापरल्याच नाही तरी त्याला च्यवनप्राश म्हणता येत नाही, त्याचा उपयोग पोळी-भाकरीबरोबर जॅम म्हणून खाण्यासाठी होऊ शकतो.

    च्यवनप्राश प्रत्यक्ष अश्‍विनीकुमारांनी मानवजातीला दिलेला प्रसाद आहे. सर्वसामान्यांना सर्वात सोपे रसायन कायम सेवन करता यावे आणि आजारपण दूर ठेवता यावे, तसेच शारीरिक ताकद चांगली राहावी यासाठी च्यवनप्राशची योजना करावी असे सांगितलेले आहे.

    प्रत्येकाने जर आवळ्याच्या ऋतूमध्ये आवळे घरी आणून च्यवनप्राश बनविण्याचा प्रयत्न केला तर वर्षभर घरात ठेवून प्रत्येकाला आपण स्वतः बनविलेला च्यवनप्राश सेवन केल्याचे समाधान मिळेल. यासाठी आवश्‍यक असलेल्या वनस्पती आणताना मात्र माहितगार व्यक्‍ती बरोबर असावी कारण वनस्पती बरोबर आहेत का शिवाय त्या वीर्यवान आहेत का वगैरे गोष्टी पारखून घेता येतील. च्यवनप्राश बनविताना दशमूळांचे महत्त्व असते. बाजारात मिळणाऱ्या दशमूळ भरड वा चूर्ण ह्या पदार्थात सर्व घटक आहेत का वा सर्व घटक योग्य प्रमाणात घेतलेले आहेत का हे कळायला काही मार्ग नसतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेला च्यवनप्राश सर्व लहान-मोठ्यांनी व सर्व ऋतूत सेवन करून वर्षभर सुखी तर व्हावेच व बरोबरीने वयस्थापन करून तारुण्य टिकवावे आणि जीवनाचा आनंद मिळत राहील. अशी ही च्यवनप्राशाची कथा.
    डॉ. श्री बालाजी तांबे

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीकायाकल्प– चवनप्राशच्या नियमित सेवनाने जोश वाढतो

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीस्मृती व बुद्धिवर्धक – बुद्धी तल्लख होण्यासाठी उपयोगी

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीआयुष्यवर्धन – आयुष्यमान वाढवण्यासाठी नियमित सेवन करावे

    अशी वाढवा प्रतिकारशक्तीमेरुदंडाचे पुनर्जीवन – चवनप्राशमुळे पाठीच्या कण्याला लाभ होतो

    रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी – ह्यामध्ये आवळा असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते

  • अशी वाढवा प्रतिकारशक्ती

    अशी वाढवा प्रतिकारशक्ती

    रोगप्रतिकारशक्‍ती

    उत्तम आरोग्यासाठी, संपन्न जीवनासाठी रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित हवी. सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या, वाढत्या रोगराईच्या काळात तर रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करायलाच हवेत आणि त्यासाठी आयुर्वेदिक जीवनशैली, आयुर्वेदिक रसायने यांना पर्याय नाही.
    रोगांना प्रतिकार करू शकणारी शक्‍ती म्हणजे रोगप्रतिकारशक्‍ती. आरोग्याचे रक्षण हे आयुर्वेदाचे प्रथम आणि महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आरोग्यरक्षण म्हणताना त्यामागे उत्तम रोगप्रतिकारशक्‍ती अध्याहृत असतेच.
    आयुर्वेदात मांडलेली व्याधिक्षमत्व ही संकल्पना रोगप्रतिकारशक्‍तीशी मिळती-जुळती आहे. व्याधिक्षमत्व जितके चांगले तेवढी रोग होण्याची शक्‍यता कमी, याउलट व्याधिक्षमत्व जेवढे कमी तितकी आजार होण्याची शक्‍यता अधिक. व्याधिक्षमत्व कमी असू शकणाऱ्या काही स्थिती आयुर्वेदात याप्रमाणे सांगितल्या आहेत.
    शरीराणि चातिस्थूलानि अतिकृशानि अनिविष्टमांसशोणितास्थीननि दुर्बलानि असात्म्य-आहारोपचितानि अल्पाहाराणि अल्पसत्त्वानि च भवन्ति अव्याधिसहानि, विपरीतानि पुनर्व्याधिसहानि ।
    …चरक सूत्रस्थान

    १. अतिस्थूल

    सप्तधातूंपैकी फक्‍त मेदधातूच शरीरात वाढला, तर त्यामुळे शरीराची एकंदर ताकद कमी होते. विशेषतः मेदधातूच्या पुढील धातू म्हणजे अस्थी, मज्जा, शुक्र या महत्त्वाच्या धातूंपर्यंत पोषण पोचले नाही, की शरीर हळूहळू निःसत्त्व होऊ लागते व त्यातून रोगप्रतिकारशक्‍ती कमी होते.

    २. अतिकृश

    जीवनशक्‍ती, रोगप्रतिकारशक्‍ती ही धातूंच्या आधाराने राहत असते. विशेषतः रसधातू, रक्‍तधातू, मज्जाधातू, शुक्रधातू हे सर्व धातू जीवनशक्‍तीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असतात. अतिकृश व्यक्‍तींमध्ये धातूंचे प्रमाणच कमी असल्याने रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते.

    ३. रक्‍त, मांस व हाडे शिथिल असणाऱ्या व्यक्‍ती

    रक्‍तधातूच्या ठिकाणी प्राण राहतात. मांसाच्या दृढतेवर, कणखरतेवर एकंदर शरीरशक्‍ती अवलंबून असते आणि हाडे म्हणजे शरीराचा मुख्य आधार, मुख्य कणा असतो. हे तिन्ही धातू व्यवस्थित नसतील, प्रमाणबद्ध नसतील, तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होऊ शकते.

    ४. दुर्बल

    स्वभावतःच ताकद कमी असल्यास किंवा खूप प्रवास, खूप परिश्रम, अति मानसिक ताण, एखादे मोठे आजारपण यामुळेही प्रतिकारशक्‍ती कमी होत असते.

    ५. असात्म्य आहार करणाऱ्या व्यक्‍ती –

    असात्म्य अन्न म्हणजे प्रकृतीला प्रतिकूल असणारे, शरीरात सहजपणे सामावू न शकणारे अन्न. जीवनशक्‍ती हवी तर त्यासाठी संपन्न धातू हवेत आणि संपन्न धातू हवे असले, तर पोषक, प्रकृतिनुरूप आहार सेवन कराला हवा. शरीरपोषणाचा विचार न करता कुठलेही अन्न सेवन करणाऱ्यांची प्रतिकारशक्‍ती, जीवनशक्‍ती कमी होऊ शकते, असे आयुर्वेदशास्त्र सांगते.

    ६. अल्प आहार करणाऱ्या व्यक्‍ती

    सर्वमन्ने प्रतिष्ठितम्‌ असे आयुर्वेदात सांगितले जाते. प्रतिकारशक्‍ती चांगली असण्यासाठी सकस, पोषक आणि पुरेसे अन्न खूप महत्त्वाचे असते. उपवास वा अन्य काही कारणांमुळे पुरेसे अन्न सेवन न करणे एकंदर शरीरशक्‍तीसाठी, प्रतिकारशक्‍तीसाठी चांगले नाही.

    ७. कमकुवत मन असणाऱ्या व्यक्‍ती

    मनाची शक्‍ती शरीरशक्‍तीपेक्षाही प्रभावी असते हे आपण जाणतोच. मनाची उभारी असेपर्यंत, मन श्रद्धा व विश्‍वासाने युक्‍त असेपर्यंत एकंदर शरीरशक्‍ती, जीवनशक्‍ती चांगली असते. अगदी मोठ्या आजारपणातूनही कणखर मनाच्या व्यक्‍ती संपूर्णपणे बऱ्या होतात. निरोगी शरीर असूनही, मन कमकुवत असले, तर रोग होण्यास वेळ लागत नाही हे आपण व्यवहारात अनेकदा पाहतो. थोडक्‍यात, या सात प्रकारांत मोडणाऱ्या व्यक्‍तीचे व्याधिक्षमत्व म्हणजेच रोगप्रतिकारशक्‍ती कमी असते, तर याविरुद्ध म्हणजे प्रकृतिनुरूप बांधा असणाऱ्या, कणखर व दृढ शरीरधातू असणाऱ्या, उत्तम शरीरशक्‍ती असणाऱ्या, प्रकृतिनुरूप व सत्त्वयुक्‍त अन्नाचे योग्य प्रमाणात सेवन करणाऱ्या व सशक्‍त मन असणाऱ्यांचे व्याधिक्षमत्व चांगले असते. व्याधिक्षमत्व, प्रतिकारशक्‍ती चांगली असण्यासाठी जबाबदार असणारे शरीरघटक खालीलप्रमाणे सांगता येतील.

    अग्नी –  बलमारोग्यमायुश्‍च प्राणाश्‍चाग्नौ प्रतिष्ठिता ।।
    …चरक सूत्रस्थान
    बल, आरोग्य, दीर्घायुष्य, प्राण हे सर्व अग्नीमध्ये प्रतिष्ठित असतात. म्हणजेच आरोग्य टिकविण्यासाठी, रोग होऊ नयेत यासाठी अग्नी संपन्न असणे आवश्‍यक असते. आहार-औषधातून पोषक तत्त्वे शरीरात गेली, तरीही ती पचवून शरीरात स्वीकारली जाण्यासाठी अग्नी आवश्‍यक असतो. आहाररसापासून सप्तधातू तयार होण्यासाठीही अग्नीची शक्‍ती लागतेच. सतेजता, काम करण्यासाठी लागणारी शक्‍ती आणि काम करण्यासाठी लागणारा उत्साह या गोष्टीही अग्नीवरच अवलंबून असतात.

    रसधातू –  रसधातू सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याचे काम करत असतो. म्हणूनच रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, तर त्यामुळे शरीरशक्‍ती कमी होते, थकवा जाणवतो, थोड्याही श्रमाने दम लागतो. अर्थातच, रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी रसधातू चांगला ठेवणे आवश्‍यक असते.

    रक्‍तधातू –  शरीरात ज्या दहा ठिकाणी प्राण राहतो, त्यांपैकी एक रक्‍तधातू होय. रक्‍तधातू शुद्ध व उत्तम असता शरीरशक्‍ती चांगली असते, वर्ण उत्तम असतो, जीवनशक्‍ती उत्तम असते आणि आयुष्य सुखाने संपन्न असते, असे आयुर्वेद म्हणतो. तेव्हा रोग होऊ नयेत यासाठी रक्‍तधातू उत्तम ठेवायलाच हवा. रक्‍त म्हणजे साक्षात जीवन असे आयुर्वेदात सांगितले आहे, त्यावरून रक्‍ताचे महत्त्व कळते. प्रत्यक्षातही हिमोग्लोबिन किंवा लोहतत्त्व कमी असणाऱ्या व्यक्‍तींमध्ये रोगप्रतिकारशक्‍ती कमी दिसते.

    मज्जाधातू –  मज्जा स्नेहं बलं शुक्रपुष्टिं पूरणमस्थ्नां च करोति ।
    …सुश्रुत सूत्रस्थान
    शरीराला उचित स्निग्धता देण्याचे, शरीरशक्‍ती उत्तम ठेवण्याचे, हाडांना व शुक्रधातूला पोसण्याचे महत्त्वाचे काम मज्जाधातू करत असतो. मेंदू, चेतासंस्था वगैरे महत्त्वाच्या गोष्टी मज्जाधातूवर अवलंबून असतात. काही कारणास्तव मज्जाधातू अशक्‍त झाला, तर त्यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी होताना दिसते.

    शुक्रधातू-  शुक्रधातू सर्व धातूंमधील शेवटचा धातू. अनेक वेळेला शुद्ध केलेले सुवर्ण जसे तेजस्वी व सारसंपन्न असते, त्याचप्रमाणे प्रत्येक धातू तयार होताना मलभाग निघून गेल्यामुळे शेवटचा शुक्रधातू अतिशय संपन्न असतो. शुक्रधातूचे वैशिष्ट्य म्हणजे तो फक्‍त शरीराची ताकद वाढवतो असे नाही, तर मनालाही शक्‍ती देतो, धैर्य देतो, उत्साह निर्माण करतो. या सर्व गोष्टींमुळे रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित राहण्यास मदत मिळते.

    ओज-  ओज हे सुद्धा प्राणाचे राहण्याचे उत्तम स्थान असते. ओजामुळे सर्व शरीर अवयवांना स्थिरता मिळते, शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित चालू राहतात. व्यक्‍तीची एकंदर तेजस्विता, सतेजता ओजावर अवलंबून असते. सर्व धातूंचे साररूपी ओजतत्त्व काही कारणास्तव कमी झाले, तर अनेक रोग होऊ शकतात, प्रसंगी मृत्यूसुद्धा येऊ शकतो, असे सांगितले जाते. म्हणूनच रोगप्रतिकारशक्‍ती व ओजतत्त्वाचा खूप जवळचा संबंध असतो. तेव्हा रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहण्यासाठी या सर्व शरीरतत्त्वांचे व्यवस्थित पोषण होण्याकडे लक्ष ठेवायला हवे व त्याहून महत्त्वाचे म्हणजे या तत्त्वांचा क्षय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

    रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी…
    आरोग्यरक्षणासाठी आयुर्वेदाने सांगितलेले सर्व उपाय रोगप्रतिकारशक्‍ती टिकून राहावी व वाढावी यासाठी उत्तम असतात.
    दिनचर्येत अंतर्भूत केलेले अभ्यंग, उद्वर्तन, नस्य, अंजन, व्यायाम वगैरे सर्व गोष्टी प्रतिकारशक्‍ती वाढवूनच आरोग्यरक्षण करत असतात.
    प्रकृतिनुरूप व ऋतुनुरूप आहार घेणे, मनाच्या शांती व प्रसन्नतेसाठी योग, ध्यान वगैरे गोष्टींचा रोजच्या दिनक्रमात अंतर्भाव करणे हे देखील अप्रत्यक्षरीत्या रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत करत असते. मनाची प्रसन्नता ओज वाढवण्यास कारणीभूत असते, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. त्यावरूनही ही गोष्ट सहज लक्षात येईल.
    दीर्घश्‍वसन, ॐकार गुंजन, अनुलोम-विलोम, प्राणायाम, व्यायाम यांच्या अभ्यासाने सर्व शरीरात प्राणाचे अभिसरण व्यवस्थित व्हायला लागले, की त्यामुळेही रोगप्रतिकारशक्‍ती चांगली राहते. “प्राणवहस्रोतसामध’चे काम नीट झाले, की त्यामुळे एकूणच आरोग्य नीट राहते हा अनेकांचा अनुभव असतो.
    घरात सकाळ-संध्याकाळ धूप करणे, नैसर्गिक सुगंधाच्या सान्निध्यात राहणे, आपल्या आसपास विशिष्ट वनस्पती, वृक्ष किंवा प्रभावयुक्‍त औषधे औषधी द्रव्ये असू देण्यामुळे सुद्धा रोगराईपासून दूर राहता येते.
    प्यायचे पाणी उकळून घेणे, चांदीच्या वा स्वच्छ तांब्याच्या भांड्यात पाणी साठवणे व पिणे, चांदीच्या ताटात जेवणे यांसारख्या साध्या साध्या गोष्टीही रोगप्रतिकारशक्‍ती नीट राहण्यास पूरक ठरतात.

    डॉ. श्री बालाजी तांबे

    मेदधातू शरीरात वाढल्यामुळे शरीराची एकंदर ताकद कमी होते आणि पर्यायाने अश्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असते.

    अतिकृश व्यक्तींमध्ये धातूचे प्रमाण कमी असल्याने त्यांची सुद्धा प्रतिकारशक्ती कमी असते.

    रक्त, पेशी आणि हाडे शिथिल असणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी असते.

    जन्मतःच दुर्बल असणाऱ्या व्यक्तीमध्ये ताकद कमी असल्याने सुद्धा तिची प्रतिकारशक्ती कमी असते.

    शरीरपोषणाचा कुठलाही विचार न करता आहार करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा प्रतिकारशक्ती कमी असते.

    प्रतिकारशक्ती चांगली असण्यासाठी सकस, पोषक आणि पुरेसे अन्न आवश्यक असते नाहीतर प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

    मनाची शक्ती ही शरीरशक्तीपेक्षाही प्रभावी असते, मनाची शक्ती ही मोठमोठ्या आजारातून व्यक्तीला तारून नेऊ शकते.

  • होलिकोत्सव

    होलिकोत्सव

    हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही.

    उन्हाळा कोणालाच आवडत नाही. उष्णतेमुळे शरीरातील रस कमी होतो, आर्द्रता कमी होते. उष्णतेमुळे केवळ मनुष्याच्या शरीरातीलच नाही तर सर्व वनस्पतींमधील रसही कमी होतो. सूर्य मनुष्याच्या व वनस्पतींमधील रसाचे आकर्षण करून घेतो. जीवनरस कमी झाला की साहजिकच आयुष्यही कमी होते. झाडाची फांदी ओली असली की ती मोडायला त्रास होतो पण तीच फांदी वाळली की काडकन मोडते. उन्हाळ्यात घामाघूम होणे हा त्रास सर्वांनाच जाणवतो. त्यातून समुद्रकिनाऱ्याच्या ठिकाणी, दमट हवेच्या ठिकाणी तर घामाचा त्रास सहन करण्याच्या पलीकडे असतो.

    खाल्लेल्या अन्नाचा, पेयांचे पचन झाल्यावर त्यातील मलभाग शरीराबाहेर टाकावाच लागतो. विष्ठा, मूत्र या रूपाने सर्वाधिक मलभाग बाहेर जातो परंतु कानात, नाकात येणारा मळ किंवा घाम हा सुद्धा बाहेर जावा लागतो. घाम येण्यामुळे शरीर थंड होण्यासाठी मदत मिळते. उष्णतेमुळे शरीरातील चलनवलन वाढले, रक्‍ताभिसरण वाढले व त्वचा प्रसरण पावली की घाम येणे सोपे होते.

    ह्याच तत्त्वाचा उपयोग करून शरीरात साठलेला मलभाग सैल करून घामाच्या माध्यमातून शरीराबाहेर घालवणे हा उपचार करता येतो. शरीरशुद्धीसाठी व कायाकल्पासाठी सांगितलेली पंचकर्म क्रिया म्हणजेच शरीरशुद्धीची प्रक्रिया. ह्यात विरेचनामार्फत, वमनामार्फत किंवा बस्तीमार्फत शरीर शुद्ध करता येते. परंतु मुळात त्यासाठी शरीरात लपलेला दोष, आमद्रव्य किंवा विष सैल करून मुख्य प्रवाहात आणून नंतर ते बाहेर ढकलणे आवश्‍यक असते. म्हणून शरीराला अभ्यंग करून स्वेदनपेटिकेचा उपयोग केला असता शरीराच्या त्वचेवरील रंध्रे उघडून त्यातून घामाद्वारे मलभाग बाहेर टाकता येतो. स्वेदनपेटिका म्हणजे एका बंद पेटिकेत व्यक्‍तीला डोके बाहेर राहील असे बसविल्यानंतर आत वाफ सोडली जाते. ही वाफ सर्व शरीरावर काम करते व स्वेदन होण्यास मदत करते. या वाफेत औषधी तेले टाकली तर अधिक उपयोग होताना दिसतो. सर्दी झालेली असताना सुंठ, गवती चहा, तुळशीची पाने वगैरे पाण्यात टाकून वाफारा घेतल्यास सर्दी वितळवून बाहेर काढता येते असा अनुभव सर्वांना असतोच.

    शिशिर ऋतूत साठलेला कफ पातळ होऊन वसंत ऋतूत बाहेर यायला लागला की होणारा त्रास सर्वांच्याच परिचयाचा असतो. हा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेद व भारतीय संस्कृती यांनी एकत्रित विचार करून उपाययोजना म्हणून आयोजन केलेले आहे होलिका उत्सवाचे. तसेही सोप्या पद्धतीने, सामुदायिक रीत्या, अनेक लोकांना उपयोग होईल अशा प्रकारचे स्वेदन करण्यासाठी आयुर्वेदाने होळीत पेटविलेल्या अग्नीसारखीच व्यवस्था सुचविलेली आहे.

    सध्या आधुनिक सौना पद्धतीत संपूर्ण बंद खोलीत व्यक्‍तीला बसवून उष्णता निर्माण केली जाते वा वाफ सोडली जाते, पण हे आयुर्वेदाला मान्य नाही. कारण मूत्रपिंडांच्या ठिकाणी व डोक्‍याच्या भागाला कुठल्याही प्रकारे अधिक उष्णता लागू नये हा संकेत त्यात मोडला जातो. डोक्‍याला उष्णता लागू नये या हेतूने डोक्‍यावर ओला टॉवेल ठेवला तर एक वेगळाच उपद्रव होण्याची शक्‍यता असते. म्हणून उघड्या जागेत वर छत असेल पण मध्यभागी त्याला एक भोक उघडे ठेवलेले असेल व संपूर्ण गोलाकार सर्व बाजूंनी साधारणतः एक मीटरभर उंचीची भिंत बांधून व्यवस्थित आडोसा केलेला असेल अशा तऱ्हेने, मध्यभागी अग्नी पेटवून सर्वांनी अग्नीभोवती गोलाकार बसावे अशी योजना केलेली असते म्हणजे साधारणतः शरीराला व्यवस्थित उष्णता लागते. डोके रुमाल किंवा टोपीने झाकून ठेवायचे असते, तसेच जाड आवरण येईल असा रुमाल वगैरे मूत्रपिंडांच्या भोवती बांधून बसायचे असते.

    ही व्यवस्था म्हणजे आयुर्वेदाची एक होलिकोत्सवाची ही आवृत्ती आहे असे लक्षात येते. होळीच्या कथेतील होलिका राक्षसीला असा वर मिळालेला असतो की तुला अग्नीपासून भय नाही. म्हणून तिने प्रल्हादाला म्हणजे सात्त्विकतेला स्वतःच्या बरोबर घेऊन अग्नी पेटवून घेतला जेणेकरून प्रल्हादाला मृत्यू येईल ही कल्पना. प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्‍यपूने होलिका राक्षसीबरोबर ठरविलेले हे षड्‌यंत्र होते. पण झाले भलतेच, प्रल्हाद जिवंत राहिला आणि होलिका मात्र जळून गेली. नेहमीच सात्त्विकता शिल्लक राहते व पाप नष्ट होते.

    याच प्रमाणे स्वेदनोपचाराद्वारे शरीरातील आवश्‍यक यंत्रणा शिल्लक राहते व दोष जळून जातात. 15-20 मिनिटे स्वेदन झाल्यावर शरीर कोरडे करून शांतपणे विश्रांती घ्यावी अशी अपेक्षा असते. स्वेदनाच्या वेळी आत किती तापमान असावे हे रुग्ण व उपचार करणाऱ्याने परिस्थिती पाहून ठरवायचे असते. तसेच वाफेबरोबर कुठले औषधी द्रव्य योजावे हे रुग्णाच्या प्रकृतीनुसार ठरविता येते. स्वेदनाचा फायदा प्रत्येक रुग्णाला होतो. स्वेदन हे एक पंचकर्मापूर्वीचे आवश्‍यक असलेले पूर्वकर्म आहे. परंतु विरेचन, वमनसहित पंचकर्म करायचे नसेल तरी अधून मधून बाष्पस्वेदन व अभ्यंग करण्याने तारुण्य राखण्यास किंवा आरोग्य राखण्यास खूप मदत होते.

    हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही. तसेच रंगारंग उत्सवामुळे येणाऱ्या वसंतोत्सवाचे स्वागत करून नवतारुण्याच्या व चैतन्याच्या अनुभवाचा आनंद ही तर सर्वात मोठी चिकित्सा. फक्‍त उधळण्याचे रंग नैसर्गिकच असावेत.