भात

मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, असं सांगितलं जातं, परंतु भात खाणे वाईट नाही. नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. म्हणून पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

मधुमेही व्यक्‍तींनी भात खाऊ नये, भात खाण्याने शरीर फुगते, वजन वाढते अशा प्रकारचा बराच प्रचार आतापर्यंत झालेला आहे. परंतु नुकत्याच झालेल्या संशोधनात असे आढळले आहे, की भात खाणे वाईट नाही. ग्लायसेमिक इंडेक्‍स (glycaemia index – GI) म्हणजे एखादा अन्नपदार्थ सेवन केल्यावर दोन तासांमध्ये रक्‍तामध्ये साखर किती प्रमाणात वाढते, याची मोजणी असते. वेगवेगळ्या 233 प्रकारच्या तांदळाची पाहणी केल्यानंतर असे आढळले, की भारतीय जनता सर्वसाधारणपणे जो तांदूळ वापरते त्या भातापासून रक्‍तात साखर वाढत नाही. अनेक प्रकारचे तांदूळ अस्तित्वात असतात. भातामुळे रक्‍तात वाढणारी साखर 48 ते 92 या गुणांमध्ये मोजली जाते. भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाच्या सेवनामुळे 68 ते 74 संख्येपर्यंत साखर वाढते (भारतात खाल्ल्या जाणाऱ्या तांदळात बासमती तांदळाचा जी.आय. 68 ते 74 आहे), तर सुवर्णा किंवा मसुरी या तांदळांच्या सेवनामुळे साखर वाढण्याचे प्रमाण 55 पेक्षा कमी आहे. हातसडीचा तांदूळ पचायला जरा जड असतो, पण त्यातून जीवनसत्त्वे अधिक प्रमाणात मिळू शकतात. अन्यथा तो पॉलिश केलेल्या तांदळाप्रमाणेच काम करतो. तांदळात कार्बोहायड्रेट अधिक प्रमाणात असल्यामुळे भात खाल्ल्यावर मनुष्याने हालचाल करणे म्हणजेच काम करणे आवश्‍यक असते. भात खाऊन नुसते बसून राहिले तर चांगले नसते, असेही निष्पन्न झालेले आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र (International Rice Research Institute – IRRI)  आणि युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलॅंड या दोन्ही संस्थांनी मिळून केलेले आहे. या संशोधनात असे आढळले आहे, की दहा प्रजातींपासून केलेला भात सेवन केल्यास रक्‍तात साखर वाढण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. चीनमध्ये तयार होणार तांदळाचा जी. आय. 45 इतका कमी आहे, तर लाओसमध्ये तयार होणाऱ्या तांदळाचा जी.आय. 92 आहे.

ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नाचे पचन सावकाश होते व तो शरीरात सावकाश सावकाश जिरतो, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्‍स कमी असलेल्या अन्नापासून थोडी साखर शरीरात सोडली जाते. म्हणून अशा प्रकारचा तांदूळ खाल्ल्यास मधुमेहींसाठी कुठल्याही प्रकारचा धोका संभवत नसल्याने खायला हरकत नाही, असा एकूण या संशोधनाचा निष्कर्ष निघाला. तसेही योग्य प्रमाणात तांदूळ-भात खाल्ला तर रक्‍तात साखरेचे प्रमाण वाढत नाही, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे. पोळी-भाकरी असे इतर पदार्थ जेवणात असले तरी भात अवश्‍य असावा.

आयुर्वेदाकडून भातप्रशंसा
“फॅमिली डॉक्‍टर’ व “सकाळ’च्या वाचकांना, तसेच फॅमिली डॉक्‍टरच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्यांना आठवत असेल, की आयुर्वेदाने भात खाण्याची प्रशंसा वेळोवेळी केलेली आहे. ज्या ठिकाणी भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो तेथे, तसेच भात हे मुख्य अन्न असलेल्या चीनमध्ये लोकांचे आरोग्य उत्तम असल्याचे दिसते. (चीनमधील तांदळाचा जी.आय. 45 इतका कमी आहे.) ज्या देशातील लोकांचे किंवा भारतातील ज्या प्रदेशातील लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे त्यांचे आरोग्य गहू वा इतर अन्न खाणाऱ्या लोकांपेक्षा चांगले असलेले दिसते. भात खाणाऱ्यांचा सडसडीतपणा डोळ्यांत भरण्यासारखा असतो. अनेक मंडळींना प्रत्यक्ष विचारल्यानंतर असे दिसून आले, की भात मुख्य अन्न असणाऱ्यांच्या आई-वडील, आजी-आजोबा वगैरेंचे वजन कधीच मर्यादेच्या बाहेर नव्हते, त्यांना कधीही स्थूलत्वाचा त्रास झालेला नव्हता. मधुमेह वगैरे तर सोडाच, पण त्यांनी निरामय आरोग्य सांभाळत शंभरी पार केलेली होती.

तीन महिने, सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे नाश्‍त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत केवळ तांदळाचे पदार्थ सेवन केल्यास आरोग्याचा लाभ होतो हे दाखवून दिले. दही-भात, ताक-भात, वरण-भात, डाळ-भात, मेतकूट-भात, गोड भात, तांदळाची भाकरी वगैरे तांदळाचे वेगवेगळे पदार्थ खाता येतात. त्याबरोबर काही अंशी तांदळापासून बनविलेले पोहेसुद्धा खाता येतात. दही-पोहे खाणारी अनेक मंडळी असतात व त्यांचे आरोग्य चांगले राहते. तांदळाच्या कण्यांचा उपमा खाता येतो. तांदळापासून पक्वान्ने बनवूनही खाता येतात. तेव्हा नुसता तांदूळ खायचा म्हटल्यावर आता माझे कसे होणार, याची चिंता करायचे कारण नसावे.

तांदूळ पचायला सोपा
संतुलन पंचकर्म व शरीरातील पेशी शुद्ध करण्याच्या चिकित्सेच्या दरम्यान सर्व रोग्यांना (यात हृद्रोगी, मधुमेहाचे रोगीही अंतर्भूत आहेत) सकाळी नाश्‍त्यासाठी साळीच्या लाह्या, दुपारच्या व रात्रीच्या जेवणात भात देण्यात आला. एवढे करून कुणालाही कसलाही त्रास झाला नाही, कुणाचेही कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसेराइड्‌स वाढले नाही, साखरही वाढली नाही, उलट कमी झाली. अर्थात रोग्यांच्या दिनक्रमात अंतर्स्नेहन, बाह्यस्नेहन, स्वेदन, विरेचन, बस्ती वगैरे उपचार, योग, संगीत वगैरेंचाही समावेश होता. त्यांची कुठल्याही प्रकारे उपासमार केली गेली नाही. त्यांच्या आहारात तांदळाचा समावेश होता.

तांदूळ हे अधिक पाण्यावर उगवणारे पीक आहे. त्यातल्या त्यात साठ दिवसांत तयार होणारा तांदूळ पचायला अधिक सोपा असतो. तांदूळ भाजून घेऊन त्यापासून केलेला भात पचायला सोपा असतो व कुठलाही त्रास न होता त्यापासून सहज शक्‍ती मिळते. भात शिजवण्यासाठी वा डाळ-तांदळाची खिचडी बनवताना फारसे कौशल्य असण्याची गरज नसते.

या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर भात खाण्याचा प्रयोग करून पाहावा व प्रकृतीत सुधारणा अनुभवावी, आनंद मिळवावा.

तांदूळ आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून

तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा. बहुतेक सर्व रोगांमध्ये तांदूळ हा पथ्यकारक म्हणून सांगितला आहे. आयुर्वेदाने भाताचा नेहमीच आग्रह धरला आहे.

जगात सर्वत्र मिळणारे आणि अन्न म्हणून सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे धान्य म्हणजे तांदूळ. जगभरात सुमारे 40हजार जातींचे तांदूळ होतात. भारतामध्येही तांदळाच्या पारंपरिक अनेक जाती आहेत. बासमती, आंबेमोहोर, सोना मसुरी, कोलम वगैरे भाताची नावे बहुतेकांच्या परिचयाची असतात; मात्र याखेरीज साठेसाळ, रक्‍तसाळ, चंपा, चंपाकळी, जिरगा, काळी गजरी वगैरे अनेक जाती असतात. बासमती, आंबेमोहोर भात सुगंधामुळे अधिक प्रचलित असला तरी साठेसाळ, रक्‍तसाळ वगैरे पारंपरिक तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतो. उदा. रक्‍तसाळ भातात लोह अधिक प्रमाणात असते, साठेसाळ भात पचण्यासाठी अतिशय सोपा असतो. जिरगा, काळी गजरी वगैरे भात रुग्णांसाठी विशेष हितकर असतो.

आयुर्वेदात तांदळाची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तांदूळ तयार झाल्यावर वर्षभर साठवून मग खाण्यासाठी वापरावा असेही सांगितलेले आहे. बहुतेक सर्व रोगांमध्ये अशा प्रकारच्या जुन्या तांदळाचा पथ्य म्हणून उल्लेख केलेला सापडतो. वेदांमध्येही तांदळाचा उल्लेख सापडतो. भारतीय संस्कृतीनुसार यज्ञ, पूजा, लग्नकार्यात तांदळाचा उपयोग केला जातोच, पण जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते.

“भावप्रकाश’ या आयुर्वेदाच्या ग्रंथात तांदळाच्या काही मुख्य जातींचा उल्लेख याप्रमाणे केलेला आहे, रक्‍तशाली, सकलम, पांडुक, शकुनाहृत्‌, सुगंधक, कर्दमक, महाशाली, दूषक, पुष्पांडक, पुंडरीक, महिष, मस्तक, दीर्घशूक, कांचनक, हायन, लोध्रपुष्पक. मात्र, विस्तारभयामुळे सर्व जातींचा निर्देश करणे शक्‍य नाही असे याच्यापुढे म्हटलेले असल्याने प्रत्यक्षात त्या वेळीही यापेक्षा अनेक जाती अस्तित्वात होत्या, हे समजते.

तांदळाचे गुणधर्म
तांदळाचे गुणधर्म व उपयोग पुढीलप्रमाणे सांगितले आहेत,
शालयोः मधुराः स्निग्धा बल्या बद्धाल्पवर्चसः ।
कषाया लघवो रुच्या स्वर्या वृष्याश्‍च बृंहणाः ।।
अल्पानिलकफाः शीताः पित्तघ्ना मूत्रलास्तथा । …भावप्रकाश

तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविणारे व मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, थोड्या प्रमाणात वात-कफाला वाढवतात, पचण्यास सोपे असतात, तसेच लघवी साफ होण्यासही मदत करतात.

हे झाले सामान्य तांदळाचे गुण. मात्र, सर्व तांदळांत साठेसाळी तांदूळ श्रेष्ठ आहेत, असे सांगितले आहे. हे तांदूळ साठ दिवसांत तयार होतात व त्यांचे गुण या प्रकारे असतात.

षष्टिकाः मधुराः शीता लघवो बद्धवर्चसः ।
वातपित्तप्रशमनाः शालिभिः सदृशा गुणैः ।। …भावप्रकाश

चवीला मधुर, वीर्याने शीतल व पचायला हलके असतात, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करतात. वात तसेच पित्तदोषाचे शमन करतात; ताकद देतात, तसेच तापात हितकर असतात.

रक्‍तशाली म्हणजे लाल रंगाचे तांदूळ. यांची विशेषता अशी, की ते डोळ्यांसाठी चांगले असतात.

रक्‍तशालिर्वरस्तेषु बल्यो वर्ण्यस्त्रिदेषजित्‌ ।
चक्ष्युष्यो मूत्रलः स्वर्यः शुक्रलस्तृङज्वरापहा ।।
विषव्रणश्‍वासकासदाहनुत्‌ वपिष्टिदः । …भावप्रकाश

सर्व तांदळांपैकी रक्‍तसाळ तांदूळ डोळ्यांना हितकर असतात, ताकद वाढवितात, कांती सुधरवतात व तिन्ही दोषांना संतुलित ठेवतात; आवाजासाठी हितकर असतात, लघवी साफ होण्यास मदत करतात, शुक्रवर्धन करतात. तहान, ताप, विष, व्रण, दमा, खोकला, दाह यांचा नाश करतात व अग्नीची पुष्टी करतात.

विविध जातींच्या तांदळाचे अंगभूत गुण याप्रमाणे सांगितले आहेत; मात्र, तांदूळ कशा प्रकारे उगवले आहेत यावरही त्यांचे गुणधर्म बदलतात.
अगोदर जाळून घेतलेल्या जमिनीमध्ये लावलेले तांदूळ किंचित तुरटसर चवीचे व पचायला सोपे असतात. हे तांदूळ मल-मूत्र विसर्जनास मदत करतात, कफनाशक असतात.
नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ विशेषतः शुक्रवर्धक असतात आणि तुलनेने कमी हलके असतात, धारणाशक्‍ती वाढवितात, ताकद देतात, या तांदळापासून मलभाग फारसा तयार होत नाही.
अजिबात न नांगरलेल्या जमिनीतील तांदूळ वात वाढवितात.
आपोआप उगवलेले म्हणजे मुद्दाम पेरणी न करता आलेले तांदूळ गुणाने कमी प्रतीचे असतात.
एकदा आलेल्या तांदळाच्या लोंब्या कापून घेऊन त्याच फुटीवर पुन्हा आलेले तांदूळ गुणांनी रुक्ष असतात, पित्त वाढवितात व मलावबंध करतात.

मधुमेहीनो, भात खा!
अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने, नीट पेरणी, मशागत करून उगवलेले तांदूळ वर्षभरानंतर वापरणे अतिशय आरोग्यदायी आहे, हे सहज लक्षात येते.
मधुमेही व्यक्‍तींनी, वजन जास्त असणाऱ्यांनी भात खाऊ नये असा प्रचार बऱ्याचदा केला जातो; मात्र, आयुर्वेदातील पुढील संदर्भावरून यामध्ये अजिबात तथ्य नाही, हे स्पष्ट होते.
मधुमेहावरचे औषध खाल्ल्यानंतर तूप व भात खावा असे सांगितले आहे,

सुभावितं सारजलैला हि पिष्ट्‌वा शिलोद्‌भवाः ।
शालिं घृतैश्‍च भुञ्जानः ।। …रसरत्नाकर

चंदनाच्या पाण्यात वेलची व शुद्ध शिलाजित टाकून घ्यावे व वर तूप-भात खावा.
मधुमेही व्यक्‍तीसाठी पथ्यकर पदार्थ सांगताना म्हटले आहे,
यवान्नविकृर्तिमुद्‌गाः शस्यन्ते शालिषष्टिकाः । …रसरत्नाकर

जवापासून बनविलेले पदार्थ, मूग, तांदूळ, विशेषतः साठेसाळीचे तांदूळ मधुमेही व्यक्‍तींसाठी हितकर आहेत.
स्थूलता कमी करण्यासाठीसुद्धा तांदळाचा आधार घेतलेला आहे.

उष्णमत्रस्य मण्डं वा पिबन्‌ कृशतनुर्भवेत्‌ ।
भैषज्य रत्नावली

रोज सकाळी तांदळाची मंड (14 पट पाणी घालून केलेली भाताची पेज) घेण्याने स्थूल व्यक्‍ती कृश होते.
स्थूल व्यक्‍तीसाठी हितकर काय आहे सांगताना तांदळाचा उल्लेख केलेला आहे.

पुराणशालयो मुद्गकुलत्थयवकोद्रवाः ।
लेखना बस्तयश्‍चैव सेव्या मेदस्विना सदा ।। …भैषज्य रत्नावली

एक वर्ष जुने तांदूळ, मूग, कुळीथ, यव, कोद्रव (एक प्रकारचे धान्य), लेखन (मेद कमी करणाऱ्या औषधांनी संस्कारित तेलाची वा काढ्याची बस्ती, हे मेदस्वी व्यक्‍तीने नित्य सेवन करण्यास योग्य आहे.

तांदूळपाण्याचे अनुपान
तंडुलोदक म्हणजे तांदळाचे पाणी हे अनुपान म्हणूनही वापरले जाते. बारीक कांडलेले तांदूळ आठपट पाण्यात भिजत घालावेत, 15-20 मिनिटांनी हातांनी कुस्करून गाळून घ्यावेत. हे तंडुलोदक अतिशय तहान लागणे, उलटी, मूत्रप्रवृत्ती व्यवस्थित न होणे, आव, जुलाब वगैरे रोगांमध्ये उपयोगी असते. स्त्रियांच्या बाबतीत अंगावरून पांढरे जाणे, पाळीच्या दिवसात अति रक्‍तस्राव होणे, वारंवार पाळी येणे वगैरे तक्रारींवर द्यायचे औषध तंडुलोदकाबरोबर दिल्यास अधिक लवकर व चांगला गुण येतो.

तांदळापासून बनविलेल्या साळीच्या लाह्या आम्लपित्त, उलटी, जुलाब वगैरे तक्रारींवर औषधाप्रमाणे उपयोगी असतात.

पिंडस्वेदन या विशेष उपचारासाठी औषधी काढ्यात तांदूळ शिजवला जातो व असा भात पुरचुंडीत बांधून मसाज करण्यासाठी वापरला जातो. काही वातशामक लेपसुद्धा तांदळाच्या पेजेमध्ये मिसळून लावायचे असतात.

अशा प्रकारे तांदूळ हा सर्व दृष्टीने आरोग्यदायी आहे. तेव्हा रोजच्या आहारात योग्य प्रमाणात भाताचा समावेश करायलाच हवा.