उपचार वातविकारांवर

सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो “संधिवात’ असे मानले जात असले, तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. …….
ज्याच्या नावातच वात आहे, असा हा रोग वातविकारांपैकी एक आहे. सर्वसामान्यपणे ज्यात सांधे दुखतात तो संधिवात असे मानले जात असले तरी सांधेदुखीने त्रस्त व्यक्‍तीवर योग्य उपचार होण्यासाठी नेमके निदान होणे आवश्‍यक असते. हे निदान करण्यासंदर्भात आयुर्वेदाने अत्यंत बारकाईने मार्गदर्शन केलेले आहे.

संधिगत वात – जेव्हा सांध्यांमध्ये वातदोष वाढतो तेव्हा संधिवेदना व सूज निर्माण करतो.

एखादाच सांधा दुखणे व सगळे सांधे दुखणे असे याचे दोन प्रकार आहेत. यातील पहिला प्रकार म्हणजे एखादा सांधा दुखण्याचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसते. घोटा दुखणे वा गुडघे दुखणे, मान वा कंबर दुखणे अशा सर्व तक्रारी वाताने त्या त्या ठिकाणी बस्तान बसविल्याच्या निदर्शक असतात. आजकाल दिवसेंदिवस कमी वयातही असा त्रास होण्याचे प्रमाण वाढताना जाणवते आहे.

सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

आमवात – जेव्हा आमदोष व वातदोष हो दोघे एकत्रित रीत्या कुपित होतात तेव्हा ज्या ज्या सांध्यात आमापाठोपाठ वातदोष जातो त्या त्या ठिकाणी हालचाल बंद करवतो, जखडण निर्माण करतो. या विकाराला आमवात असे म्हणतात.

संधिवातात सांध्यांमध्ये वातदोष असतोच पण आमवातामध्ये या दोघांच्या जोडीला आमही असतो. म्हणूनच आमवात बरा होण्यास दुष्कर व चिवट रोग समजला जातो. यात सुरुवातीला ताप येणे, अंग जड होणे, सांधे जखडणे अशी लक्षणे असतात. क्रमाक्रमाने जखडणाऱ्या सांध्यांची संख्या व तीव्रता वाढत जाते, सांध्यांवर सूज असणे, सांधा स्पर्शाला गरम लागणे, तीव्र वेदना होणे, स्पर्शही सहन न होणे ही आमवाताची लक्षणे असतात. आमवाताचे वैशिष्ट्य म्हणजे आम ज्या सांध्यात जाईल तेथे वेदना होतात. म्हणून बऱ्याचदा आमावातात फिरत्या वेदना असतात.

कुपित झालेला व अवरोध झालेला वायू दूषित रक्‍तासह मिळून प्रथम पायाचा आश्रय घेतो व नंतर संपूर्ण शरीरात धावतो. यामध्ये सांध्यांच्या ठिकाणी वेदना, खाज व बधिरता ही लक्षणे जाणवतात.

प्रत्यक्षातही पायाच्या किंवा हाताच्या अंगठ्यापासून याची सुरुवात होताना दिसते. सांध्यांच्या ठिकाणी लालसरपणा, वेदना, सूज ही लक्षणे दिसतात. क्रमाक्रमाने ही लक्षणे घोटा, गुडघा अशी वर वर सरकतात.

सुजेमुळे गुडघा कोल्ह्याच्या डोक्‍याप्रमाणे दिसू लागतो तो रोग म्हणजे क्रोष्टुकशीर्ष.
हा रोग फक्‍त गुडघ्यांपुरताच मर्यादित असतो व ह्यात रक्‍तधातूच्या जोडीने वात कुपित झालेला असतो.

पाऊल चुकीच्या पद्धतीने टाकल्याने किंवा अत्यधिक परिश्रम करण्याने जेव्हा वात गुल्फसंधीचा म्हणजे घोट्याचा आश्रय घेतो तेव्हा त्याला वातकंटक म्हणतात.

खांद्यामध्ये जेव्हा वायू कुपित होतो व तेथील संधिबंधनांना सुकवतो तेव्हा त्याला अंसशोष म्हणतात. तर तिथल्या शिरा आखडल्यामुळे जेव्हा हात उचलता येत नाही तेव्हा त्याला अवबाहुक असे म्हणतात.आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये याप्रकारे सांधा सुकणे व जखडणे हे फक्‍त खांद्यांच्या संदर्भात सांगितले असले तरी ते इतर सांध्यांच्या बाबतीतही घडू शकते. विशेषतः आजकाल मांडी व कंबरेच्या सांध्यांच्या ठिकाणी रक्‍तप्रवाह पोचणे बंद होऊन तीव्र वेदना, चालता न येणे यासारखी लक्षणे असणारा रोग तरुण वयातच होताना दिसतो. हा यातलाच प्रकार समजावा लागतो. सर्व संधिवात विकारांवर दुःख कमी करण्याबरोबर रोग बरा व्हावा व झीज भरून निघावी म्हणून “संतुलन शांती तेल’ वापरता येते, तसेच पाठीच्या मणक्‍यांची झीज, दोन मणक्‍यांमधील कूर्चा व नसा यांच्यासाठी “संतुलन कुंडलिनी तेल’ वापरता येते.

मानदुखी, कंबरदुखी – पाठीचे मणके हे सुद्धा छोटे छोटे सांधेच असतात. हे सांधे जोपर्यंत लवचिक असतात तोपर्यंत ठीक असते. पण, मणक्‍यांमध्ये वातदोष वाढला, लवचिकता कमी झाली तर दुखण्याची, जखडण्याची सुरुवात होते.

या सर्व वर्णनावरून एक लक्षात येईल की सांधा दुखतो या तक्रारीच्या मागे अनेक कारणे असू शकतात.
वातप्रकोप हे त्यातले सामान्य व प्रमुख कारण असले तरी त्याचा प्रकोप कशामुळे झाला, कोणासमवेत झाला याचीही दखल घेणे आवश्‍यक असते. प्रत्यक्ष उपचार करताना तर व्यक्‍तीची प्रकृती, तिचे राहणीमान, खाण्या-पिण्याच्या सवयी, वय, कुटुंबातला इतिहास, ताकद, पचनशक्‍ती अशा अनेक लहानसहान गोष्टींचा विचार करावा लागतो व त्यानुसार नेमके उपचार योजावे लागतात.

————————————————————
वात नियंत्रित ठेवण्यासाठी

स्नेहन – बाहेरून करायचे स्नेहन म्हणजे वातशामक द्रव्यांनी तेल लावणे तर आतून करायचे स्नेहन म्हणजे घृृतपान. अंगाला “संतुलन अभ्यंग तेला’सारख्या तेलाने नियमित अभ्यंग करणे, सांध्यांना “संतुलन शांती तेला’सारखे आतपर्यंत जिरून सांध्यांना पूर्ववत वंगण देण्याची क्षमता असणारे तेल लावणे हे संधिवात होऊ नये म्हणून चांगले असते आणि संधिवात झालेल्यांनाही आवश्‍यक असते.

-स्वेदन – वातदोषाला शमविण्यासाठी स्वेदन म्हणजे शेकणे हाही उत्तम उपाय असतो. निर्गुडी, एरंड, शेवगा वगैरे वातशामक वनस्पतींच्या पानांचा शेक करण्याने वेदना शमतात, सूजही कमी होते. यासाठी तयार “संतुलन अस्थिसंधी पॅक’ही वापरता येतो. आमाचा संबंध असणाऱ्या संधिववेदनेमध्ये रुक्ष स्वेदन म्हणजे विटकरीच्या किंवा वाळूच्या साहाय्याने शेक करणे उपयुक्‍त असते.

-विरेचन – वाताला संतुलित करण्यासाठी हलके विरेचन हा उत्तम उपचार होय. स्नेहपान, बाष्पस्वेदन घेऊन शास्त्रोक्‍त पद्धतीने विरेचन घेणे उत्तम असतेच पण घरच्या घरी पंधरा दिवसातून एकदा एरंडेल तेल घेऊन किंवा गंधर्वहरीतकी, योगसारक चूर्ण घेऊन पोट साफ करणे हेही वातासाठी चांगले असते. शरीराचे स्नेहन व्हावे व कोठासाफ व्हावा यासाठी पोळी किंवा भाकरी करताना त्यात चमचाभर एरंडेल तेलाचे मोहन टाकता येते. दिवसातून एकदा अशी गरम पोळी किंवा भाकरी खाण्याचा सर्व प्रकारच्या सांधेदुखीवर चांगला उपयोग होताना दिसतो.

-बस्ती – वातावरचा हुकुमी उपचार म्हणजे बस्ती. दशमूलासारख्या वातशामक द्रव्यांनी सिद्ध तेलाची बस्ती घेणे सर्व सांधेदुखीवर उत्तम असते. अशी आयुर्वेदिक बस्ती पोट साफ होण्यासाठी नाही तर वातशमन करणारी असते. वैद्यांच्या मार्गदर्शनाने अशी बस्ती घेता येते. तसेच घरच्या घरीही तयार तेलाच्या पाऊचची बस्ती घेता येते. उदा. संतुलन आयुर्वेद सॅनबस्ती

वातशामक औषध म्हणूून योगराजगुग्गुळ, वातबल गोळ्या, गोक्षुरादी चूर्ण. दशमूलारिष्ट, महारास्नादि काढा पंचतिक्‍तघृत वगैरे योग घेता येतात. मात्र, त्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घेणे अधिक सयुक्‍तिक.

————————————————————
वातव्याधीसाठी पथ्यापथ्य
-पथ्य – तांदूळ, गहू, कुळीथ, पचतील एवढ्या प्रमाणात उडीद, परवर, शेवगा, लसूण, बोर, डाळिंब, मनुका, खडीसाखर, तूप, दूध, मनुका, सैंधव मीठ

-अपथ्य – रुक्ष धान्ये म्हणजे जव, नाचणी वगैरे; जड कडधान्ये (पावटा, चवळी, हरबरा, वाटाणा वगैरे); कडू व तिखट चवीचे पदार्थ, प्रवास, जागरण, नैसर्गिक वेगांचा अवरोध, अधिक परिश्रम, उपवास, अति मैथुन, चिंता.
————————————————————
सगळे सांधे दुखणे हा विकार खूपच त्रासदायक असतो. वेळेवर योग्य उपचारांच्या अभावी हा रोग व्यक्‍तीला अंथरुणावर खिळवून ठेवू शकतो. अशा व्यक्‍तीत फक्‍त सांध्यातच नाही तर एकंदर सर्व शरीरात वातदोष मोठ्या प्रमाणात वाढल्याची लक्षणे दिसत राहतात.

– डॉ. श्री. बालाजी तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *