रजोनिवृत्ती

“रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरवात होते. आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते; पण सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण सुरवातीपासूनच पुरेशी काळजी घेतली, तर स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही.”

वातादी त्रिदोष, रसरक्‍तादी सप्तधातू आणि मलमूत्रस्वेद त्रिमल हे स्त्री व पुरुष दोघांतही असतात. पण तरीही स्त्री पुरुषापेक्षा शारीरिक दृष्ट्या, तसेच स्रोतसांच्या कार्याचा विचार करता खूप वेगळी असते. हे वेगळेपण स्त्रीच्या रजःप्रवृत्तीमुळे सिद्ध होते, स्त्रीतील गर्भधारणक्षमतेतून सिद्ध होते.

पाळी सुरू होणे म्हणजेच रजःप्रवृत्तीचा आरंभ आणि उतारवयात कायमची पाळी थांबणे म्हणजे रजोनिवृत्ती. हे दोन स्त्रीच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे होत. मुळात “रज’ हा रसधातूचा उपधातू असतो, रसधातू हा संपूर्ण शरीराचे प्रसादन करणारा असतो, सर्व शरीरावयवांना तृप्त करण्याची जबाबदारी रसधातूवर असते आणि अशा रसधातूचा उपधातू असणाऱ्या रजावर गर्भधारणा झाली, तर गर्भाचे पोषण करण्याची जबाबदारी असते. मात्र गर्भधारणा झाली नाही तर हे रज “मल’ म्हणून शरीराबाहेर टाकले जाते. आयुर्वेदात या संबंधात खालीलप्रमाणे सांगितले आहे,

सि मासि रजः स्त्रीणां रसजं स्रवति त्र्यहम्‌ ।वत्सराद्‌ द्वादशात्‌ ऊर्ध्वं याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।
..अष्टांग हृदय शारीरस्थान

रसधातूची संपन्नता
प्रत्येक महिन्याला रसधातूपासून तयार होणारे रज स्त्रीशरीरातून तीन दिवसांपर्यंत स्रवत असते. ही क्रिया साधारण बाराव्या वर्षांपासून सुरू होते व पन्नाशीनंतर थांबते. फक्‍त गर्भधारणा झाली, की या चक्रामध्ये खंड पडतो. “रज’ हा रसधातूचा उपधातू असल्याने स्त्रीचा रसधातू व मासिक पाळी यांचा खूप जवळचा संबंध असतो. रसधातू जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला, की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरवात होते.

तद्‌ वर्षात्‌ द्वादशात्‌ काले वर्तमानमसृक्‌ पुनः । जरा पक्वशरीराणां याति पञ्चाशतः क्षयम्‌ ।।…सुश्रुत शारीरस्थान
रज स्त्रीच्या शरीरात बाराव्या वर्षांनंतर उत्पन्न होते आणि वृद्धपणामुळे शरीरधातू जीर्ण झाले की पन्नास वर्षांनंतर क्षय पावते.
यावरून वयानुसार रजोनिवृत्ती येणे स्वाभाविक असते हे समजते. वयानुरूप रसधातूची संपन्नता कमी होणेही स्वाभाविक असते; पण जर रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला, रसक्षय म्हणता येईल इतक्‍या अवस्थेपर्यंत पोचला, तर रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. आयुर्वेदाने रसक्षयाची म्हणूून सांगितलेली लक्षणे रजोनिवृत्तीच्या काळात उद्भवू शकतात.
रसे रौक्ष्यं श्रमः शोषो ग्लानि शब्दासहिष्णुता ।
…अष्टांगहृदय सूत्रस्थान

रसक्षयाने होणारे त्रास
* शरीरात कोरडेपणा वाढतो म्हणजे त्वचा, केस, डोळे, योनी वगैरे ठिकाणी कोरडेपणा जाणवू लागतो.
* फारसे श्रम झाले नाहीत तरी खूप थकवा जाणवतो.
* मुख, घसा, जिभेला शोष पडतो.
* शरीराला ग्लानी येते, उत्साह वाटत नाही.
* आवाज सहन होईनासा होतो..
* अकारण धडधड होते.
* मन अस्वस्थ होते, शून्यता अनुभूत होते.
याखेरीज एकाएकी वजन वाढणे किंवा कमी होणे हेही रसधातूशी संबंधित असल्याने रजोनिवृत्तीच्या दरम्यान वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तसेच मासिक पाळीमध्ये एकाएकी बदल होणे, उदा. दोन मासिक पाळींतील अंतर कमी होणे वा वाढणे, रक्‍तस्राव अतिप्रमाणात होणे किंवा बरेच दिवस होत राहणे, पाण्यासारखा वा पांढरा स्राव होणे यांसारखी लक्षणेही रजोनिवृत्तीच्या काळात निर्माण होऊ शकतात. एकाएकी गरम होणे (हॉट फ्लशेस), घाम फुटणे असाही त्रास काही स्त्रियांमध्ये होताना दिसतो.

  निवृत्ती म्हटली की कसेसेच व्हायला लागते. निवृत्त होताना जणू काही आता जीवनात काही उरले नाही, अशा तऱ्हेने माणसे वागायला लागतात. खरे पाहताना निवृत्ती कामाच्या बदलाची असते. निवृत्ती ही नवीन क्षेत्र समोर उघडण्यासाठी संधी देत असते. अनेक वर्षे जे काही केले त्या कामाने आलेला कंटाळा झटकून टाकून काहीतरी नवीन कार्य करण्याची निवृत्ती ही सुरवात असू शकते. तसे पाहताना निवृत्तीपूर्वीची काही वर्षे थोडे थोडे काम कमी करून इतर कार्यक्षेत्रात भाग घेतल्यास निवृत्तीची भीती वाटत नाही व निवृत्तीमुळे शरीर-मनावर काही विपरीत परिणाम होत नाहीत.

रजोनिवृत्तीच्या बाबतीतही असाच विचार करायला हरकत नसावी. रजोनिवृत्ती जरी फक्‍त स्त्रियांपुरती मर्यादित असली, तरीसुद्धा स्त्री-पुरुषही एक जोडी असल्यामुळे स्त्रीच्या निवृत्तीचा काही परिणाम पुरुषावर होतोच. “रज’ हा शब्द रसरक्‍तासाठी वापरलेला आहे. ज्या प्रक्रियेद्वारा जन्म घेता येतो, त्याच्याशी संबंधित असलेला हा रसधातूचा उपधातू. स्त्रीच्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला जन्म देण्याची शक्‍यता असलेले एक बीजांड बाहेर पडते, हे बीज फलित न झाल्यास गर्भाशयातून बाहेर पडणारे रज (र+ज) ही साधी समजूत करून घ्यायला हरकत नाही. रजःप्रवृत्ती साधारणपणे मुलगी वयात आली की म्हणजे साधारण बाराव्या- तेराव्या वर्षापासून सुरू होते व ती प्रत्येक महिन्याला होत असल्याने त्याला मासिक धर्म असेही म्हटले जाते. बाराव्या-तेराव्या वर्षी सुरू झालेली व प्रत्येक महिन्याला तीन-चार दिवस चालणारी ही क्रिया अनेक वर्षे नित्यनियमाने सुरू असते. त्यामुळे स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध होते. या सर्व प्रक्रियेचे आरोग्य बरोबर असले तर संततीला जन्म देण्याची शक्‍यता म्हणजेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होण्याची शक्‍यता वा योग्यता दिसून येते आणि मातृत्व प्राप्त झाल्यावर स्त्रीचे स्त्रीत्व सिद्ध झाल्याने ती भाग्यवान ठरते.

  कामधंद्यातून निवृत्त व्हायची वेळ न येता आधीच निवृत्ती घेतल्यानंतर एखादा व्यवसाय चांगला जमल्यास ठीक, अन्यथा निवृत्तीनंतर मिळालेले पैसे संपल्यावर त्रास होतो, तसा वेळेच्या अगोदर रजोनिवृत्ती आणण्याचा

प्रयत्न केल्यासही बऱ्याच प्रकारचा त्रास होऊ शकतो. खरे पाहताना स्त्रीचे रजःप्रवृत्ती चालू असेपर्यंत पुरुष व स्त्री हा भेद दिसतो.
एकदा रजोनिवृत्ती झाली, की स्त्रीच्या शरीरात पुरुष हार्मोन्सचे प्रमाण वाढायला लागते. परिणामतः स्त्रीच्या शरीरात पुरुषासारखे काही बदल दिसायला लागतात. स्त्रीचे सौंदर्य, स्त्रीचा स्वभाव, स्त्रीची विशेषता स्त्रीत्वात असते. या स्त्रीत्वाचीच निवृत्ती केली, तर स्त्रीचा मूळ धर्म टाकून केलेली वागणूक नैसर्गिक राहणार नाही, अशी शक्‍यता तयार होते. रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे बदल त्रासदायक ठरू नयेत म्हणून केलेल्या औषधोपचार योजनेमुळे इतर त्रास होणार नाहीत, याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक असते आणि म्हणून नैसर्गिक व आयुर्वेदिक उपाययोजना श्रेयस्कर ठरतात. बऱ्याच स्त्रियांची नैसर्गिकपणेच रजोनिवृत्ती लवकर होते, पण अशा वेळीही स्त्रियांच्या स्वभावात बदल झालेले दिसतात. काही वेळा स्त्रीला काही विशेष रोग झाला असता रजोनिवृत्ती लवकर येताना दिसते. रजःस्रावामुळे स्त्रीचे शरीर शुद्ध राहते, सौंदर्य टिकून राहते, त्वचा सुंदर राहते, आवाज गोड व मधुर राहतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीला या गोष्टींना मुकावे लागू शकते व बाह्यउपचारांनी हे गुण कसेबसे टिकवावे लागतात. त्यामुळे जेवढी रजोनिवृत्ती लांबेल तेवढे स्त्रीत्व व तारुण्य जास्त काळ टिकून राहू शकते.रजोनिवृत्तीच्या वेळी प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या शरीरात असलेली हाडे व्यवस्थित राहावी, संपूर्ण शरीराचे संतुलन राहावे, शरीरातील कॅल्शियम, लोह नीट टिकावे म्हणून विशेष आयुर्वेदिक उत्पादने घेण्याची आवश्‍यकता असते. तसेच एरवी दूध आवडत नसले तरी रजोनिवृत्तीच्या काळात दूध घेणे अत्यावश्‍यक असते. ज्या स्त्रियांना रजःप्रवृत्ती होते त्या प्रत्येक स्त्रीने रक्‍त वाढण्यासाठी रक्‍तवर्धक योग व अन्न लक्ष ठेवून घेणे श्रेयस्कर ठरते. असे असताना रजोनिवृत्तीच्या वेळी तर या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःचे संतुलन ठेवणे खूप आवश्‍यक असते. तसेच रजोनिवृत्तीच्या वेळी गुप्तांगावर कोरडेपणा येणार नाही याची काळजी घेणेही खूप आवश्‍यक असते. रजोनिवृत्तीच्या वेळी केस गळणे, स्वभाव चिडचिडा होणे या गोष्टी टाळायच्या असतील तर आधीपासून काळजी घेऊन आयुर्वेदाने सांगितलेले उपचार करून घेणे आवश्‍यक असते. अशोकारिष्ट, कुमारी आसव, शतावरी कल्प, प्रवाळपंचामृत, कामदुधा, मौक्‍तिक वगैरे सर्व योग किंवा हे योग वापरून तयार केलेली विशेष औषधे वैद्यांच्या सल्ल्याने घेणे आवश्‍यक असते. मासिक धर्म चालू असताना नैसर्गिक नियम पाळले तर अकाली रजोनिवृत्ती येणार नाही. तसे पाहता पुरुष कामेच्छेपासून कधीच निवृत्त होत नाहीत, परंतु रजोनिवृत्तीनंतर स्त्रीची कामेच्छा कमी होऊ शकते. अशा वेळी कौटुंबिक संबंधात अडचणी आलेली उदाहरणे दिसतात.

शारीरिक बदल
रजोनिवृत्तीच्या काळात शरीरात होणारे बदल आयुर्वेदिक दृष्ट्या याप्रमाणे सांगता येतात.
1. पित्तावस्था संपून वातावस्थेला प्रारंभ होतो.
2. रसधातूची संपन्नता कमी होते.
3. स्त्रीविशिष्ट अवयवांची कार्यक्षमता क्रमाक्रमाने कमी होऊ लागते.
4. पित्त व वात या दोन्ही दोषांमध्ये बदल होत असल्याने त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या अग्नीमध्येही बदल होतात.
5. वात वाढल्याने व अग्नीत बदल झाल्याने हाडांची दृढता कमी होऊ लागते.
अर्थात हे सर्व बदल स्वाभाविक असले व त्यामुळे शरीर-मनावर थोडाफार परिणाम होणे नैसर्गिक असले, तरी त्यामुळे त्रास होतोच असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिक दृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली तरी रजोनिवृत्तीतील त्रासांपासून दूर राहता येणे अवघड नाही.

सहजसाध्य उपाय
रजोनिवृत्तीचा त्रास व्हायला नको असेल तर मुळात रसधातूची सुरवातीपासून काळजी घ्यायला हवी. तरुण वयातच रसधातू अशक्‍त असला तर वयानुरूप संपन्नता कमी होण्याच्या काळात म्हणजेच रजोनिवृत्तीच्या काळात रसक्षय होतो आणि मग रजोनिवृत्ती त्रासदायक ठरू शकते. रसधातूची काळजी घेण्याबरोबरच वय वाढले तरी त्यामुळे वाढणारा वात शक्‍य तेवढा संतुलित राहील याकडे लक्ष ठेवायला हवे. स्त्रीविशिष्ट अवयव सुरवातीपासूनच व्यवस्थित कार्यक्षम राहण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. हे सर्व साध्य होण्यासाठी साधे व सहज करता येण्यासारखे उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतात, सुरवातीपासून पाळी व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. कारण यामुळे रसधातू व्यवस्थित काम करतो आहे हे समजू शकते.

* आहारात रसपोषक पदार्थांचा उदा. साळीच्या लाह्या, दूध, प्रकृतीनुरूप फळांचे रस वगैरेंचा समावेश करणे.
* नियमित अभ्यंग करणे. आहारासह साजूक तूप पुरेशा प्रमाणात सेवन करणे. यामुळे शरीरातील अग्नीही संतुलित राहू शकतो, वातही नियंत्रित राहतो. हाडे मजबूत राहण्यासाठी दूध, डिंकाचे लाडू, खारीक, खसखस यांचे नियमित सेवन करणे.
स्त्रीविशिष्ट अवयवांची काळजी घेण्याच्या दृष्टीने योनिपिचू, योनिधूप, अधूनमधून कुमारी आसव, अशोकारिष्ट वगैरे औषधांचे सेवन करणे.
* रसधातू, शुक्रधातू तसेच एकंदरच स्त्रीप्रजननसंस्था निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी शतावरी कल्प, धात्री रसायन, “सॅन रोझ’सारख्या रसायनांचे सेवन करणे.
* वाताचे, अग्नीचे संतुलन होण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने व प्राणायाम करणे, सर्वसामान्यांना दैनंदिन आचरणासाठी व आरोग्यावर लक्ष ठेवून विकसित केलेल्या संतुलन क्रिया योगपैकी “संतुलन फुलपाखरू’ क्रिया, समर्पण, सूर्यनमस्कार या क्रिया सुचविता येतील.
* रस, अग्नी हे शरीरातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने त्यांच्यावर मानसिकतेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. दुःख झाले की भूक लागत नाही किंवा खूप मानसिक ताण आला तर चेहरा काळवंडतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होतात, याचा प्रत्यक्षात अनेकदा प्रत्यय येत असतो. आयुर्वेदात अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. म्हणूनच मनाची प्रसन्नतासुद्धा रसधातू संपन्न ठेवण्यासाठी, अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी “स्त्री संतुलन’संगीत ऐकणे, योगासने व अनुलोम-विलोमसारखा प्राणायाम यांचाही रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम ठरते.

या सर्वांमुळे स्त्री आरोग्य उत्तम राहायला मदत मिळते. शिवाय रजोनिवृत्तीच्या काळातही फारसा त्रास होऊ नये यासाठी पूर्वतयारी होत असते.
रजोनिवृत्तीला कधी सुरवात होईल, रजोनिवृत्तीची लक्षणे सुरू झाल्यावर संपूर्णपणे रजोनिवृत्ती कधी येईल असे प्रश्‍न पडणे स्वाभाविक असले, तरी यांची उत्तरे प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळी असू शकतात. सुरवातीला पाहिल्याप्रमाणे आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित असते. सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्‍य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते. पण फार लवकर रजोनिवृत्ती होणे स्त्रीच्या आरोग्यास, तारुण्यास, सौंदर्यास बाधक ठरू शकते. वयाच्या पस्तीशी-छत्तीशीलाच रजोनिवृत्तीची लक्षणे दिसायला लागली तर तो विकार समजायला हवा व दूर करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत, हे नक्की.

थोडक्‍यात सांगायचे, तर रजोनिवृत्ती स्त्रीच्या आयुष्यातली स्वाभाविक घटना असली, तरी ती योग्य वेळेलाच यावी व त्या दरम्यान स्त्रीला त्रास होऊ नये याकडे लक्ष ठेवायला हव. सुरवातीपासून काळजी घेतली तर रजोनिवृत्तीस कधी सुरवात झाली व रजोनिवृत्ती कधी आली, हे समजतही नाही, अशी अनेक उदाहरणे बघायला मिळतात. अधिकाधिक स्त्रियांनी याचा अनुभव घेतला तर एकंदरच स्त्री-आरोग्याची पातळी लक्षणीयरीत्या उंचावेल, यात काही शंका नाही.

ऐन रजोनिवृत्तीच्या काळात आवर्जून कराव्यात अशा काही गोष्टी :
* आहारात दूध, खारीक, साजूक तूप यांचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे.
* अंगाला अभ्यंग करणे, योनीत औषधी तेलाचा पिचू ठेवणे.
शतावरी कल्प, “सॅन रोझ’, “मॅरोसॅन’सारखे रसायन सेवन करणे.
* रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागली की तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली 3-4 उत्तरबस्ती करून घेणे.
* पाळीच्या संबंधात काही त्रासदायक बदल होत असल्यास बिघाड संतुलित करू शकणारे उपाय योजणे.
* सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रजोनिवृत्ती शरीरातील एक स्वाभाविक बदल आहे याचा मानसिकदृष्ट्या स्वीकार करणे.

– डॉ. श्री बालाजी तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *