काळजी हृदयाची

आयुर्वेदात “स्रोतस’ नावाची एक विशेष संकल्पना आहे. शरीरात महत्त्वाची अशी तेरा स्रोतसे असतात. प्रत्येक स्रोतसाची काही विशिष्ट कामे असतात. उदा. अन्नवहस्रोतसाचे काम अन्न स्वीकारणे, ते पचवणे, नंतर उरलेला मलभाग शरीरातून टाकून देणे असते. प्राणवहस्रोतसाचे काम श्‍वासामार्फत आलेला प्राण स्वीकारून उच्छ्वास बाहेर टाकण्याचे असते. स्रोतसाचे असे विशिष्ट अवयव असतातच, पण प्रत्येक स्रोतसाची दोन मुळे असतात. ही मुळे प्रत्यक्ष स्रोतसापासून शरीरात शारीरिकदृष्ट्या दूरही असू शकतात. पण स्रोतसाच्या कार्यकारित्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची असतात. हदय हे रसवहस्रोतसाचे व प्राणवहस्रोतसाचे मूळ असते. म्हणूनच या दोन स्रोतसांमधला बिघाड हृदयाला बाधक ठरू शकतो आणि हृदयातील दोषामुळे या दोन स्रोतसांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही.

प्राणवहस्रोतसाचे एक मूळ हृदय असते, तर दुसरे मूळ असते महास्रोत म्हणजे मुखापासून ते गुदापर्यंतचा भाग. स्रोतसाचे एक मूळ बिघडले तर त्याचा परिणाम दुसऱ्या मुळावर होणेही स्वाभाविक असते. थोडक्‍यात, रसवहस्रोतस, प्राणवहस्रोतस किंवा महास्रोतसात बिघाड झाला तर त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

स्रोतस व हृदय
अतिमात्रस्य चाकाले चाहितस्य च भोजनम्‌ । अन्नवाहिनी दुष्यन्ति वैगुण्यात्‌ पावकस्य च ।। …चरक विमानस्थान
अवेळी अति प्रमाणात भोजन करण्याने, प्रकृतीला अहितकर भोजन करण्याने व अग्नीतील बिघाडामुळे पचनसंस्थेत बिघाड होतो व त्याचा परिणाम म्हणून हृदयात विकार उत्पन्न होऊ शकतात.

रसवहस्रोतस व हृदय
गुरुशीतमतिस्निग्धं अतिमात्रं समश्‍नताम्‌। रसवाहिनी दुष्यन्ति चिन्त्यानां चाति चिन्तनात्‌ ।। …चरक विमानस्थान
पचण्यास जड, अति थंड, अति स्निग्ध पदार्थ खाण्याने, अति मात्रेत भोजन करण्याने व अति चिंता करण्याने रसवहस्रोतस बिघडते. रसवहस्रोतसाचे मूळ हृदय व हृदयातून निघणाऱ्या धमन्या असल्याने रसवहस्रोतस बिघडले की त्याचा परिणाम सरळ हृदयावर होताना दिसतो.

कारणानुरूप ज्या कोणत्या दोषात बिघाड होतो तो दोष रसधातूला बिघडवतो. बिघडलेला रसधातू हृदयात पोचला की त्या ठिकाणी बाधा उत्पन्न करतो आणि हृद्रोग होतो. यावरून एक गोष्ट लक्षात येते, की कारणानुरूप जो दोष बिघडेल त्यानुसार हृद्रोगाची लक्षणे बदलतात. नेमका कोणता दोष कारणीभूत आहे हे पाहून उपचारांची दिशा ठरवावी लागते. हृद्रोगातील लक्षणांचा निश्‍चित अभ्यास करून व नाडीपरीक्षा करून हृद्रोगाबाबतचा निर्णय वैद्याने घ्यायचा असतो. एखाद्या लक्षणावरून हृदयविकार झाला असे समजून घाबरू नये.

वातामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे * हृद्‌शून्यभाव – हृदयात पोकळी असल्यासारखे वाटणे.
* हृद्‌द्रव – छातीत धडधडणे. व्यायाम वा काही उत्सुकता असली की सुद्धा छातीत धडधडते पण त्या धडधडण्यापेक्षा हे धडधडणे वेगळे असते. मुख्य म्हणजे हृद्रोगात काहीही कारण नसताना अचानक धडधड सुरू होते.
* हृत्शोष – छातीत, हृदयात शोष पडण्यासारखे वाटणे, कोरडेपणा वाटणे.
* हृन्भेद – हृदयाच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे तीव्र वेदना होणे.
* हृत्स्तंभ – हृदयाचे कार्य एकाएकी थांबले आहे असे वाटणे.
* हृदयोद्वेष्टन – छातीत पिळवटल्याप्रमाणे वेदना होणे.
* हृत्तोद – छातीत टोचल्याप्रमाणे दुखत राहणे.
* दीनता-भय-शोकप्रतीती – एकाएकी, विशेष असे कारण नसतानाही दीन, खिन्न होणे, भीती वाटणे, शोकग्रस्त होणे.
* शब्दासहिष्णुता – मोठा आवाज, गोंगाट, गडबड सहन न होणे.
* वेपथुः – सर्वांगाला कापरे भरणे.
* श्‍वासरोध – श्‍वास घेण्यास व सोडण्यास त्रास होणे.
* अल्पनिद्रता – झोप कमी येणे.
वातकाळात म्हणजे जेवण पचल्यावर, अगदी पहाटे वा सूर्यास्तानंतर छातीत वेदना होणे.

पित्तामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
* हृद्‌दाह – छातीत जळजळणे.
* तिक्‍तास्यता – तोंडात कायम कडवट चव जाणवणे.
* अम्लोद्‌गार – आंबट ढेकर येणे.
* क्‍लम – अकारण थकवा वाटणे.
* शोष – पाणी प्यायले तरी तहान न शमणे.
* मूर्च्छा – घेरी / चक्कर येऊन खाली पडणे.
* भ्रम – गरगरणे.
* स्वेद – अकारण, एकाएकी घाम फुटणे.
* अम्लच्छर्दि – आंबट चवीची उलटी होणे.
* धूमक – हृदयातून धूर येत असल्यासारखे वाटणे.
* तमःप्रवेश- डोळ्यासमोर अंधारी येणे.
* ज्वर – शरीरतापमान वाढणे.
जेवणानंतर थोड्या वेळाने, भूक लागली असता वा मध्यरात्री त्रास होणे.

कफदोष वाढल्यामुळे होणाऱ्या हृद्रोगाची लक्षणे
* हृद्‌भार – छातीत जडपणा जाणवणे.
* हृत्स्तंभ – हृदयात जखडल्यासारखे वाटणे.
* तंद्रा – आळस, तंद्रीत असल्यासारखे वाटणे.
* अरुची – तोंडाला चव नसणे.
* अग्निसाद – भूक न लागणे, अग्नीचे काम मंदावणे.
* अतिनिद्रा – अति प्रमाणात झोप येणे.
* आस्यमाधुर्य – तोंडात गोडसर चव राहणे.
जेवणानंतर लगेच वा सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *