लठ्ठपणा

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

कितीही प्रयत्न केले तरी वाढलेले वजन कमी होत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. काही जणांचा असाही अनुभव असतो, की आटोकाट प्रयत्न करून थोडे वजन कमी झाले तरी तसेच राहत नाही; पुन्हा वाढते आणि उलट पूर्वीपेक्षा अजूनच वाढते. लठ्ठपणा हा वरवर पाहता खूप त्रासदायक, वेदनादायक विकार नसला तरी त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन चरकसंहितेमध्ये अतिलठ्ठपणा ही निंद्य अवस्था असते असे सांगितले आहे.

एका बाजूने मेद कमी करायचा ठरविले तरी दुसऱ्या बाजूने वातदोष वाढणार नाही, वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीराची ताकद, उत्साह, सतेजता लोप पावणार नाही, याचे भान ठेवावे लागते आणि त्यासाठी आहार, आचरण, औषध व उपचार ही चतुःसूत्री पाळणे आवश्‍यक असते. यापैकी आहाराबाबतची सविस्तर माहिती आपण मागच्या वेळेला घेतली आहे. लठ्ठपणा असल्यास आचरणामध्ये आयुर्वेदाने सुचविलेले मुख्य मुद्दे याप्रमाणे होत,

  • अस्वप्न – कमी झोप
  • चिंतन – मानसिक व्यग्रता
  • आतपसेवन – उन्हाचा संपर्क
  • शारीरिक व्यायाम
  • अध्व – पायी चालणे

कमी झोप सुचवण्यामागे रात्रीची झोप कमीत कमी, जितकी आवश्‍यक आहे तेवढीच घेणे आणि दुपारी अजिबात न झोपणे, या दोन्ही गोष्टी अभिप्रेत आहेत. कधीतरी जागरण झाले तरी चालू शकेल, पण झोप झाली तरी लोळत राहणे, सूर्योदयानंतरही झोपून राहणे, जेवणानंतर विश्रांती म्हणून झोपून जाणे, या गोष्टी टाळायला हव्यात.

मानसिक पातळीवर आळस येऊ नये, आरामाची प्रवृत्ती बळावू नये, हेसुद्धा लठ्ठपणावरील उपचारांत सांभाळावे लागते. मन कामात व्यस्त राहिले, चिंतन करण्याजोग्या गोष्टीत गुंतून राहिले तर त्याचाही वजन कमी होण्यासाठी उपयोग होतो.

थोडा वेळ उन्हात बसणे हा लंघनानाच एक प्रकार असतो. सकाळी आठच्या आधी किंवा संध्याकाळी पाचनंतर कोवळे ऊन अंगावर घेण्यानेसुद्धा वजन कमी होण्यास मदत मिळते. अगोदर अंगाला तेल लावून, सकाळच्या उन्हात सूर्यनमस्कार घालणे, हा त्यातला सर्वोत्कृष्ट उपचार म्हणता येईल.

व्यायाम व पायी चालणे या दोन्ही गोष्टी जितक्‍या नियमितपणे कराव्यात, तितके वजन कमी होणे सोपे जाते. व्यायामाच्या बाबतीतला एक अनुभव असा, की प्रकृतीला अनुरूप असणारे, सहज करता येण्याजोगे, न थकवणारे व्यायाम करणेच हितावह असते. एकाएकी व्यायामशाळेत जायला सुरवात केली व घामाच्या धारा वाहेपर्यंत व्यायाम करून वजन कमी झाले तरी वजन नंतर पुन्हा वाढते. त्याऐवजी सूर्यनमस्कार, चालणे, पोहणे, योगासने करणे यामुळे ताकद कमी न होता वजन क्रमाक्रमाने कमी कमी होत जाते.

योग्य औषधयोजना हीसुद्धा वजन कमी होण्यास सहायक असते. सहसा ही औषधे मेदाचे लेखन (अवाजवी मेद खरवडून काढणे) करण्याबरोबरीने वाताचे शमन करणारी, पचन सुधारणारी असतात. उदा.- गुग्गुळ, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा, चित्रक, सुंठ वगैरे. फक्‍त मेदनलेखन इतकाच उद्देश ठेवला व कडू, तुरट चवीच्या द्रव्यांचा भडिमार केला तर त्यामुळे वात वाढतो व अजूनच समस्या निर्माण होऊ शकतात. अमुक एक पेय प्या व वजन कमी करा, महिन्यामध्ये 15 किलो वजन कमी करा, या प्रकारे दावे करणाऱ्या बहुतेक औषधांमध्ये कडू, तिखट, तुरट द्रव्यांचा समावेश असतो, याचे भान ठेवायला हवे. वैद्यांच्या सल्ल्याने प्रकृतीपरीक्षण करून घेऊन योग्य औषध सुरू करणे सर्वोत्तम असते. मात्र तत्पूर्वी लगेच सुरू करता येतील अशी काही घरगुती औषधे पुढीलप्रमाणे आहेत-

  • “काथ’ हा वजन कमी करण्यासाठी उत्तम असतो. चांगल्या प्रतीच्या काथाचे दीड ते दोन ग्रॅम चूर्ण रोज पाण्याबरोबर व विड्याच्या पानाबरोबर घेण्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • जेवणानंतर दोन चमचे लिंबाचा रस एक कपभर पाण्यात घेण्यानेसुद्धा मेद कमी होण्यास मदत मिळते.
  • सकाळी उठल्यावर कपभर कोमट किंवा सामान्य तापमानाच्या पाण्यात चमचाभर मध टाकून घेण्यानेही वजन कमी होण्यास मदत मिळते.
  • माक्‍याचा रस मेद साठलेल्या ठिकाणी हलक्‍या हाताने जिरवला तर त्यामुळे वजन कमी होण्यास, विशेषतः मेदाच्या गाठी तयार झालेल्या असल्यास त्या वितळण्यास मदत मिळते.

उद्वर्तन – उद्वर्तनं कफहरं मेदसः प्रविलायनम्‌ ।
…अष्टांगहृदय सूत्रस्थान कफदोष कमी करून साठलेल्या मेदाला वितळविण्यासाठी उद्वर्तन उपचार उत्तम होय. उद्वर्तन म्हणजे विशिष्ट द्रव्यांचे बारीक चूर्ण संपूर्ण अंगाला ठराविक पद्धतीने चोळणे. अभ्यंगासारखा हासुद्धा एक मसाजच असतो, फक्‍त यात तेलाऐवजी बारीक चूर्ण वापरले जाते. घरच्या घरी स्नानाच्या आधी उटणे अंगाला लावतात, त्याप्रमाणे उद्वर्तनाचे कोरडे चूर्ण चोळता येते. मात्र तज्ज्ञ परिचारकाकाडून व्यवस्थित उद्वर्तन करून घेण्याचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे होताना दिसतो.

शरीरशुद्धी – वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार म्हणजे पंचकर्माद्वारा शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे शरीरातील अनावश्‍यक गोष्टी अति प्रमाणात साठल्याने दोषरूप झालेले भाव शरीराबाहेर काढून टाकणे. लठ्ठपणामध्ये साठून राहिलेला “मेद’ हा मुळात धातू असला तरी अतिप्रमाणात वाढला की दोषच म्हणावा लागतो. शास्त्रोक्‍त पद्धतीने शरीरशुद्धी केली असता असा दोषस्वरूप मेद कमी होऊ शकते. याबाबतचा अनुभव असा, की जेवढे वजन कमी होणे अपेक्षित आहे, ते सर्वच्या सर्व पंचकर्माच्या कालावधीत कमी होईलच असे नसते. उदा.- एखाद्या व्यक्‍तीचे वजन 20 किलो अधिक असले तर शास्त्रोक्‍त विरेचन, विशेष मेदनाशक तेलाचा बस्ती, अभ्यंग, उद्वर्तन, स्वेदन वगैरे उपचारांच्या साह्याने पंचकर्माच्या दरम्यान 6-8 किलो वजन कमी झाले तरी शरीरशुद्धीद्वारा एकदा आतील मेदसंचयाची प्रवृत्ती बदलली, आहार-आचरणामध्ये अनुकूल बदल केले, की पंचकर्मानंतरही क्रमाक्रमाने वजन कमी होताना दिसते. एकाएकी वजन कमी होण्याने शरीरावर होऊ शकणारे दुष्परिणाम यात होत नाहीत, शिवाय अशा प्रकारे हळू हळू उतरलेले वजन सहसा पुन्हा वाढतही नाही.

– डॉ. श्री. बालाजी तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *