आयुर्वेदाने दात व हाडे यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. हाडे जितकी मजबूत आणि चांगली तितके दात बळकट असतात, तर अस्थिक्षय झाला म्हणजे हाडे झिजायला लागली तर त्याचा परिणाम म्हणून दात खराब होऊ लागतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
दात चांगले असणे, हे आरोग्य तसेच सौंदर्य या दोन्ही दृष्टींनी खूप महत्त्वाचे असते. मोत्यासारखे दात चेहऱ्याला शोभा देतात, तसेच शरीरशक्ती चांगली असल्याचीही ग्वाही देतात.
स्थः कठिनश्चर्वणादिसाधनो।वयवः दन्तः ।
कठीण अन्न चावण्याचे साधन असणारा अवयव म्हणजे दात. आयुर्वेदाने दात व हाडे यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे. हाडे जितकी मजबूत आणि चांगली तितके दात बळकट असतात, तर अस्थिक्षय झाला म्हणजे हाडे झिजायला लागली तर त्याचा परिणाम म्हणून दात खराब होऊ लागतात, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
दात जन्मतः नसतात, किंबहुना जन्मतः दात असणे अप्रशस्त समजले जाते. सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या महिन्यात दात यायला सुरवात होते. आठव्या महिन्यात दात येणे उत्तम समजले जाते. फार लवकर म्हणजे चौथ्या-पाचव्या महिन्यात आलेले दात अशक्त असतात, लवकर झिजतात, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. आदर्श दात कसे असतात, हेही आयुर्वेदात सांगितलेले आहे.
दुधाचे दात येणे, ते पडणे, नवे पक्के दात येणे, ते स्थिर राहणे किंवा क्षीण होणे, बळकट राहणे वा हलू लागणे, अशक्त होणे, रोगाविष्ट होणे… या सर्व गोष्टी पुढील मुद्द्यांवर अवलंबून असतात.
* स्त्रीबीज व पुरुषबीजाची संपन्नता – सर्व शरीरावयवांची मूळ जडणघडण ही गर्भधारणा होत असतानाच होत असते. दोन्ही बीजांमधील दातांसाठी जबाबदार असणारा भाग जितका चांगला असेल तितके दातांचे आरोग्य चांगले राहते.
* पित्याचे आरोग्य – दात आनुवंशिकतेवरही अवलंबून असतात. एखाद्या घरात सगळ्यांचेच दात उपजत चांगले असू शकतात, तर एखाद्या घरात सगळ्यांचेच दात निकृष्ट असू शकतात.
* स्वकर्म – स्वतः घेतलेल्या दातांच्या काळजीवरही दातांचे आरोग्य अवंलबून असते. विशेषतः लहान वयात व तरुण वयात दातांची व्यवस्थित निगा राखली, हाडांना-दातांना आवश्यक ते पोषण मिळण्याकडे लक्ष दिले तर दातांची बळकटी कायम राहू शकते.
बीजसंपन्नता, आनुवंशिकता व स्वतःने घ्यावयाची काळजी… या तीन गोष्टी वेगवेगळ्या सांगण्यामागे काही कारण आहे. आनुवंशिकता महत्त्वाची असली तरी गर्भधारणा होण्यापूर्वी स्वतःच्या तब्येतीकडे नीट लक्ष द्यायला हवे आणि या दोहोंमुळे जन्मतः दात उत्तम असले तरी नंतर त्यांची स्वतः काळजी घेणेही खूप महत्त्वाचे असते. निरोगी दातांसाठी आयुर्वेदिक दृष्टिकोनातून अनेक साध्या सोप्या गोष्टी करता येतील.
* सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हाडांना पोषक आहार व रसायनांचे सेवन करून दातांना आतून ताकद देणे. त्यादृष्टीने आहारात दूध, खारीक, खसखस, डिंकाचे लाडू, नाचणी सत्त्व, गहू, तूप यांचा समावेश करता येतो. प्रवाळ, मोती, अश्वगंधा वगैरे अस्थिपोषक द्रव्यांपासून बनविलेली रसायने सेवन करता येतात.
* दातांची स्वच्छता ठेवणे, काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरणे, सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी कडू, तुरट, तिखट चवीच्या व हिरड्या-दातांना घट्ट करणाऱ्या द्रव्यांपासून बनविलेल्या चूर्णाने दात घासणे किंवा दात-हिरड्यांवर असे चूर्ण थोडा वेळ लावून ठेवणे.
* चूळ भरता येईल एवढ्या (साधारण 5-6 चमचे) कोमट पाण्यात अर्धा ते एक चमचा इरिमेदादी तेलासारखे तेल टाकावे व हे पाणी 7-8 मिनिटे तोंडात धरून ठेवावे व नंतर थुंकून टाकावे. खळखळून चुळा भरून टाकाव्यात.
वास्तविक आई-वडिलांकडून उत्तम दाताचा वारसा लाभला असला व या सर्व गोष्टी सुरवातीपासून नीट केल्या असल्या तर दाताच्या तक्रारी उद्भवू नयेत. पण तरीही आयुर्वेदात दात व हिरड्यांसंबंधी अनेक रोग सांगितले आहेत.
शीतोदालन
वातादुष्णासहादन्ताः शीतस्पर्शाधिकव्यथा ।
इव शूलेन शीताख्योदाल्यन्तश्चसः ।।…अष्टांगसंग्रह
वातदोषामुळे दात गरम वस्तूचा स्पर्श सहन करू शकत नाहीत, तसेच दातांना थंड स्पर्शही सहन होत नाही. थंड स्पर्शाने दातात तीव्र कळा येतात, त्याला “शीतोदालन’ असे म्हणतात.
दन्तहर्ष
दन्तहर्षप्रवाताम्लः शीतभक्षाक्षमाद्विजाः ।
भवन्त्यम्लशनैनेव सरुजश्चलिता इव ।।…अष्टांगसंग्रह
थंड हवा, आंबट चव व थंड खाद्य-पेय सहन न होणे. विशेषतः आंबट चवीमुळे दातात वेदना होणे व दात हलू लागणे, याला “दन्तहर्ष’ असे म्हणतात.
दन्तभेद
दन्तभेदेद्विजास्तोदभेदरुक्स्
दातांमध्ये टोचल्याप्रमाणे, तोडल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असल्यास त्यास “दंतभेद’ असे म्हणतात.
दन्तचाल
चालश्चलद्भिर्दर्शनैः भक्षणात् अधिकव्यथैः ।…अष्टांगसंग्रह
दात हलणे, काहीही खाल्ले असता दातात अधिक वेदना होणे याला “दंतचाल’ असे म्हणतात.
दन्तशर्करा
अधावनान्मलो दन्ते कफो वा वातशोषितः । पूतिगन्धिः स्थिरीभूतः शर्करा ।।
दात नीट स्वच्छ न करण्याने किंवा वातामुळे कफदोष शुष्क झाल्याने दातावर किट्ट जमा होण्याला “दन्तशर्करा’ म्हणतात. यामध्ये मुखाला दुर्गंधी येते.
कपालिका – दन्तशर्कराची पुढची अवस्था म्हणजे कपालिका.
शातयत्युणुशोदन्तकपालानि कपालिका ।।
…अष्टांगसंग्रह
दन्तशर्करेकडे दुर्लक्ष झाल्यास त्यामुळे दाताची कणाकणाने झीज होते, त्याला “कपालिका’ असे म्हणतात.
दन्तश्याव
श्यावः श्यावत्वमायातो रक्तपित्तानिलर्द्विजः ।
रक्त, पित्त व वायूमुळे दात काळे पडण्यास “दन्तश्याव’ म्हणतात.
कृमिदन्तक
समूलं दन्तमाश्रित्य दोषैरुल्बणमारुतैः ।
शोषितेमज्ञिसुषिरे दन्ते।न्नमलपूरिते ।।
पूतित्वात् क्रिमयः सूक्ष्मा जायन्ते जायते ततः ।।
मुख्य वातदोष व बरोबरीने पित्तदोष व कफदोष हे जेव्हा मुळासकट दाताचा आश्रय घेतात तेव्हा दातातील मज्जा धातू सुकतो. मज्जा धातू सुकल्याने दात ठिसूळ होतो, पोकळ होतो. या पोकळीत अन्न अडकून राहिले की ते तेथे सडते आणि मग त्या ठिकाणी सूक्ष्म कृमी तयार होतात.
कृमिदन्तामुळे दातात तीव्र वेदना उत्पन्न होतात, कधी कधी या वेदना आपणहून शांतही होतात. यालाच सामान्य भाषेत दात किडणे असे म्हटले जाते.
शीताद
श्लेष्मरक्तेन पूतीनि वहन्त्यस्रमहेतुकम् ।
शीर्यन्ते दन्तमांसानि मृदुल्लिन्नासितानि च ।।
कफ व रक्तदोष यांच्यातील बिघाडामुळे हिरड्या कोमल, संवेदनशील व काळ्या रंगाच्या होतात. याला “शीताद’ असे म्हणतात. यात हिरड्यांमधून रक्त व पू येतो.
उपकुश
उपकुशः पाकः पित्तासृक् उद्भवः ।
पित्त व रक्तामुळे हिरड्या पिकतात, त्याला “उपकुश’ असे म्हणतात. यामध्ये हिरड्यांची आग होते, हिरड्या लाल होऊन सुजतात, खाजतात, हिरड्यांमधून रक्त येते, दात हलू लागतात, तसेच मुखाला दुर्गंधी येते.
सुषिर
श्वयथुर्दन्तमूलेषु रुजावान् रक्तपित्तजः ।
लालास्रावी च सुषिरो दन्तमांसप्रशातनः ।।
दातांच्या मुळाशी रक्त व पित्तातील दोषामुळे सूज येते, वेदना होतात, लाळ अधिक प्रमाणात सुटते व हळूहळू हिरड्या नष्ट होऊ लागतात, याला “सुषिर’ असे म्हणतात.
दन्तनाडी
दन्तमांसाश्रितान् रोगान् यः साध्यानप्युपेक्षते ।
अन्तस्तस्यास्रवन् दोषः सूक्ष्मांसञ्जनयेत् गतिम् ।।
पूयं मुहुः सास्रवति त्वङ्मांसास्थिप्रभेदिनी ।
जो मनुष्य दात व हिरड्यांच्या साध्या रोगांकडे दुर्लक्ष करतो, त्याचे दोष दातात आतपर्यंत जिरून सूक्ष्म नाडी उत्पन्न करतात. या नाडीतून वारंवार पू वाहतो. यामुळे हिरड्या व दातांची हळू हळू झीज होते.
आदर्श दात व हिरड्या
पूर्णता समता घनता शुक्लता स्निग्धता श्लक्ष्णता निर्मलता निरामयता किंचित उत्तरोन्नता दन्तबन्धनानां च समता रक्तता स्निग्धता बृहत्घनास्थिरमूलता चेति दन्तसंपदुच्यते ।।…काश्यप सूत्रस्थान
*सर्व दात सारख्या उंचीचे असावेत.
*पूर्ण वाढ झालेले, घट्ट व भरीव असावेत.
*रंगाने शुभ्र असावेत.
*स्पर्शाला स्निग्ध व गुळगुळीत असावेत.
*दिसण्यास निर्मल व स्वच्छ असावेत.
*निरोगी असावेत.
*वरचे दात खालच्या दातांपेक्षा किंचित पुढे असावेत.
*हिरड्या समतल, लाल, स्निग्ध, जाड, घट्ट व ज्यांच्यात दात घट्ट बसू शकतील अशा असाव्यात.
आदर्श दात व हिरड्यांचे वर्णन केलेले असले तरी प्रत्येकाचे दात निरनिराळे असतात.




Leave a Reply