थंडीतील उपचार - मसाज

निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून “बाह्यस्नेहन’ रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधूनमधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.
थंडी पडली, की वातावरणात कोरडेपणा वाढतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही. शरीराला आतून-बाहेरून स्निग्धतेची आवश्‍यकता भासू लागते. याला आयुर्वेदात “स्नेहन’ असे नाव दिलेले आहे. ज्याप्रमाणे कोणत्याही यंत्राला वंगणाची आवश्‍यकता असते, साध्या वाहनातही नुसते इंधन घालणे पुरत नाही, त्याप्रमाणे निरोगी शरीराला उचित स्निग्धता अत्यावश्‍यक असते. म्हणूनच आयुर्वेदाने अभ्यंगाच्या माध्यमातून “बाह्यस्नेहन’ रोजच्या दिनक्रमात अंतर्भूत केले आहे. अभ्यंग हिवाळ्यात तर करायचा असतोच, पण संपूर्ण वर्षभर अधून मधून अभ्यंग करणे प्रकृती व्यवस्थित राहण्यासाठी उत्तम असते.

अभ्यंग शब्दातील “अंग’ हे क्रियापद गती या अर्थाने आलेले आहे. जेथे जेथे गती असते तेथे उष्णता व ऊब तयार होतेच उदा. थंडीच्या दिवसांत एका ठिकाणी बसले किंवा उभे पाहिले की वाजणारी थंडी चालले, पळले की अजिबात वाजेनाशी होते. त्याचप्रमाणे संपूर्ण शरीरात ज्या क्रियेमुळे गतीमानता येते, अशा अभ्यंगाने शरीराला ऊब मिळणे सहज शक्‍य असते.

अभ्यंगातून ऊब
ऊब ही रक्‍ताभिसरणावरही अवलंबून असते. फार वेळ एका ठिकाणी बसल्यावर पायाला मुंग्या येतात. अशा वेळी पाय थंड पडतो, याचा सगळ्यांना अनुभव असेल. पाय हलवला आणि रक्‍ताभिसरण पूर्ववत सुरू झाले की पायाचे तापमान पुन्हा पूर्वीसारखे होते. अभ्यंगामुळे रक्‍ताभिसरणाला मदत मिळत असल्याने अभ्यंग शरीराला ऊब देण्यास उत्तम असतो. शरीरातील ऊब कमी झाली की हालचालींवरही मर्यादा येतात. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जीभ गारठली की बोलता येत नाही, हात गारठले की बोटे जखडल्यासारखी वाटतात, याचाही सर्वांना अनुभव असेल. म्हणूनच सर्व हालचाली व्यवस्थित व्हाव्यात, हालचालींमधला सहजपण, चपळपणा कायम राहावा, यासाठीही अभ्यंग, अभ्यंगातून मिळणारी ऊब आवश्‍यक असते.

अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणे. हे तेल वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असावे, असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे.

यथा जातान्न पानेभ्यो मारुतघ्नैः सुगन्धिभिः ।
अथर्तु सस्पर्श सुखैस्तैलैः अभ्यंगमाचरेत्‌ ।। …अष्टांगसंग्रह सूत्रस्थान
वातशामक, सुगंधी द्रव्यांनी संस्कारित असे ऋतूला व प्रकृतीला अनुकूल तेल, जे स्पर्श केले असता सुखकर असते, अभ्यंगासाठी वापरावे. क्वचित काही ठिकाणी औषधांनी संस्कारित तूप किंवा वसा (मांसातील स्निग्ध पदार्थ) वापरण्यासही सांगितले आहे. मात्र सहसा तिळाचे तेल अभ्यंगासाठी उत्तम समजले जाते.

रोज करायचा अभ्यंग स्वतः स्वतःला करायचा असतो. मात्र प्रशिक्षित परिचारकाकडून (ट्रेंड थेरपिस्ट) अभ्यंग करून घेण्याचे फायदे वेगळे असतात. विशेषतः पंचकर्म करताना बाह्यस्नेहन म्हणून करायचा अभ्यंग किंवा वातविकारात उपचार म्हणून घ्यायचा अभ्यंग किंवा अति प्रवास, अति दगदग, अति मानसिक ताण यांचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून घ्यायचा अभ्यंग हा मसाजिस्ट – थेरपिस्टकडून करून घेणे अधिक गुणकारी असते.

पेशीच्या ठेवणीनुसार मसाज
मसाज करणाऱ्याला मानवी शरीराचे रचनात्मक व क्रियात्मक ज्ञान असणे आवश्‍यक असते. विविध मांसपेशी, त्यांचा उगम, विस्तार, दिशा यांची सविस्तर माहिती असावी लागते. सांध्यांच्या ठिकाणी असणारी दोन किंवा अधिक हाडांची रचना, सांध्यांना पकडून ठेवणाऱ्या स्नायूंची रचना, रक्‍तवाहिन्या, मज्जातंतूंचे स्थान, विविध मर्मे वगैरे अनेक गोष्टी मसाज करण्यापूर्वी माहीत असाव्या लागतात.

मसाजचे परिणाम सर्व शरीरात होत असले तरी मसाज केला जातो तो वरच्यावरच. त्वचेच्या आश्रयाने राहणारे भ्राजक पित्त तेलाचा स्वीकार करून त्याचे पचन करून ते सर्व शरीरपोषणासाठी शोषून घेते. अर्थात यासाठी वापरले जाणारे तेलही उत्तम प्रतीचे, औषधांनी सिद्ध केलेले व अग्नीचा यथायोग्य संस्कार झाल्याने “सूक्ष्म’ अर्थात लहानात लहान पोकळीतही पोचण्याचे सामर्थ्य असणारे असावे लागते. नुसतेच अर्क किंवा सुगंध घातलेले तेल किंवा कमी दर्जाचे तेल, कच्चे तीळ तेल वा खोबरेल तेल वापरून कितीही चांगला मसाज केला तरी त्याने तेलाचे आतपर्यंत जिरण्याचे व त्यायोगे धातुपोषणाचे कार्य होऊ शकत नाही.

मसाज करताना प्रत्येक पेशीचा आकार ध्यानात घ्यावा लागतो. नाजूक पेशीच्या ठिकाणी मसाजही नाजूकपणेच करावा लागतो, तर बळकट पेशीला मसाज करताना बळ पणाला लावावे लागते. तसेच पेशीचा आकार, तिची दिशा, लांबी यावरून त्या ठिकाणी कसा मसाज करायचा ते ठरवले जाते. पेशीच्या नैसर्गिक ठेवणीनुसार मसाज केल्यास तो सुखावहही ठरतो व उपयोगीही असतो; अन्यथा त्याने पीडा कमी होण्याऐवजी वाढूही शकते.

‘मर्मा’वर बोट
मसाजचा विचार करताना “मर्म’ हाही विचारात घेण्याजोगा महत्त्वाचा मुद्दा होय. प्राणशक्‍तीचे अस्तित्व सर्व शरीरात असले तरी काही विशिष्ट ठिकाणी ती अधिक प्रमाणात एकवटलेली असते. आयुर्वेदात या विशिष्ट ठिकाणांना “मर्म’ ही संज्ञा दिली आहे. मर्माच्या ठिकाणी शरीरातील शिरा, स्नायू, संधी, अस्थी, मांस यांपैकी एकाहून अधिक घटक एकत्र आलेले असतात व त्यामुळे मसाज करताना त्याच्या ठिकाणी किती प्रमाणात दाब द्यावा, किती वेळ दाब द्यावा, या गोष्टीचा विचार करावा लागतो.

मसाजचे सार्वदैहिक मसाज आणि स्थानिक मसाज असे दोन प्रकार संभवतात. वातशमनासाठी आणि शरीरशक्‍ती वाढून स्वास्थ्य टिकवण्यासाठी केला जाणारा मसाज सर्व शरीरभर केला जातो; मात्र पाठ दुखत असल्यास नुसत्या पाठीला किंवा पायाला सुन्नपणा आला असल्यास फक्‍त पायांना असा स्थानिक मसाजही केला जातो.

संपूर्ण शरीराचा मसाज होण्यासाठी साधारणतः एक तास लागू शकतो. मसाज झाल्यानंतर अर्धा ते पाऊण तास विश्रांती घ्यावी, वाऱ्याचा झोत अंगावर येणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनातून जायचे झाल्यास कानाला स्कार्फ बांधावा. थंडीच्या दिवसांत पायात मोजे घालावेत. अशा प्रकारे अभ्यंग, मसाजसाठी रोजच्या व्यापातून थोडा वेळ काढला, तर त्यामुळे जीवन उबदार व्हायला आणि जीवनाचा आनंद द्विगुणित व्हायला निश्‍चित हातभार लागेल.

मसाज करण्याचा सर्वसाधारण क्रम
– मसाज करताना सर्वप्रथम तेलाचे दोन थेंब टाळूवर हलक्‍या हाताने चोळावेत, तसेच कानांमध्ये व नाभीवर दोन-तीन थेंब टाकावेत. मसाज करताना नेहमी पायापासून सुरवात करावी. प्रथम पायाच्या तळव्यांवर तेल जिरवावे. मसाज करताना पायाच्या तळव्यापासून सुरवात करावी. घोटा, गुडघा या ठिकाणी गोलाकार मसाज करावा. पोटरी, मांडीला सोसवेल त्याप्रमाणे दाब देऊन मोकळे करण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर दुसरा पाय करावा.

– यानंतर हाताच्या तळव्यापासून सुरवात करावी, मनगट व कोपरावर वर्तुळाकार तर बाकी दंडाला वगैरे अंगठा व चार बोटे यांच्या साहाय्याने दाब सोसवेल अशा पद्धतीने मसाज करावा.
– पोटावर मसाज करताना मोठ्या आतड्याची रचना व गती ध्यानात घ्यावी लागते. फार दाब न देता वर्तुळाकार गतीने मसाज केल्यास आतड्यातील वायूला स्वाभाविक गती मिळते व सरून जायला मदत होते.
– कूस व छातीवरती हलक्‍या हाताने मसाज करावा. छातीवर दोन्ही हातांनी छातीच्या हाडापासून ते खांद्यापर्यंत मसाज करावा.
– नितंब, अंसफलक (scapula) यांठिकाणी मांसपेशी व हाडाच्या आकारानुरूप गोलाकार मसाज करावा. कंबर व संपूर्ण पाठीलाही खालून वरपर्यंत सरळ रेषेत मागे पाहिल्याप्रमाणे वाहक, कंपन वगैरे पद्धतीने मसाज करावा. मानेवर मात्र दाब न देता हलक्‍या हाताने तरंग पद्धतीने वर जावे. पाठ व मानेला जोडणाऱ्या मांसपेशी त्रिकोणाकार असल्याने त्यांच्यावर मसाज करताना त्यांचा विशिष्ट आकार ध्यानात घ्यावा लागतो. चेहऱ्यावरही मसाज अत्यंत हलक्‍या हाताने करावा व त्याची दिशा जबड्यापासून ते कानशिलापर्यंत ठेवावी.
– मसाज करताना वापरावयाचे तेल किंचित गरम करून वापरावे. याने वात शमन व्हायला अधिक मदत मिळते, तसेच तेलाचे शोषणही अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.
– मसाज घेताना पोट रिकामे असू नये, तसेच जेवल्याजेवल्याही मसाज घेऊ नये.
– मसाज करायची जागा हवेशीर असावी; मात्र प्रत्यक्ष हवेचा झोत अथवा वारा येणार नाही याची काळजी घ्यावी. खोलीत पुरेसा उजेड असावा.
– मसाज घेताना शयनस्थिती सर्वांत उत्तम होय. पालथे झोपलेल्या स्थितीत पाठीचा कणा, मान, नितंब, यावर मसाज केला जातो, तर पाठीवर झोपलेल्या स्थितीत हात, पाय, पोट, छाती व चेहऱ्यावर मसाज केला जातो. एखाद्या व्यक्‍तीला झोपणे, विशेषतः पालथे झोपणे शक्‍य नसेल, तर मात्र मसाज बसूनही करता येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *