डोकेदुखी

डोके दुखणे माहीत नाही, अशी व्यक्‍ती सापडणे अवघडच असावे. वेदना वा दुखणे नकोसे वाटणे अगदी साहजिक असते; पण डोकेदुखी खरोखर खूप त्रासदायक असते.
आयुर्वेदात डोक्‍याला उत्तमांग म्हटले आहे; कारण डोके हा शरीरातील सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा मेंदू डोक्‍यात असतो, सर्व संप्रेरकांना चालना देणारी पिच्युटरी ग्रंथी डोक्‍यात असते, कान-नाक-डोळे वगैरे इंद्रियांचे अधिष्ठानही डोक्‍यात असते. मेंदूची जास्तीत जास्ती काळजी घ्यायला हवी, यात कोणत्याही शास्त्राचे दुमत नसावे. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. डोकेदुखीची तीव्रता, कालावधीसुद्धा व्यक्‍तीनुरूप व कालानुरूप बदलू शकते. म्हणूनच डोकेदुखीवर उपचार करताना अनेक मुद्‌द्‌यांवर विचार करावा लागतो. मुख्य म्हणजे अचूक निदान करणे खूपच गरजेचे असते.डोकेदुखीची कारणे आयुर्वेदात याप्रमाणे दिलेली आहेत-
* मल, मूत्र, शिंक वगैरे नैसर्गिक प्रवृत्तींना अडवून ठेवणे.
* दिवसा झोपणे.
* रात्री जागरण करणे.
* अति मद्यपान किंवा अंमल चढणाऱ्या वस्तूंच्या आहारी जाणे.
* डोक्‍यावर जोराचा वारा लागणे.
* अति मैथुन करणे.
* न आवडणारा वास घेणे.
* धूळ, धूर, अतिशय थंडी किंवा उन्हाच्या संपर्कात येणे.
* पचण्यास जड, आंबट, गोष्टींचे तसेच पुदिना, मिरची वगैरे हरितवर्गातील गोष्टींचे अतिसेवन.
* अतिशय थंड पाणी पिणे.
* डोक्‍याला मार लागणे.
* अश्रूंना अडवून ठेवणे किंवा खूप रडणे.
* शरीरात आमदोष वाढणे.
* आकाशात मेघ दाटून येणे.
* अतिशय मानसिक कष्ट होणे.
* जनपदोध्वंसातील देश आणि काळ बिघडणे.
यातील एक किंवा अनेक कारणांनी वातादी दोष असंतुलित होतात आणि डोक्‍यात जाऊन तेथील रक्तधातूला दूषित करतात. यातून अनेक प्रकारचे शिरोरोग उत्पन्न होतात. या शिरोरोगांचे मुख्य लक्षण असते शिरःशूळ अर्थात डोकेदुखी.
शिरःशूळाचे एकूण 11 प्रकार सांगितलेले आहेत.
1. वातदोषा : यामुळे होणाऱ्या डोकेदुखीमध्ये एकाएकी, क्षुल्लक कारणानेसुद्धा डोके खूप दुखू लागते. डोकेदुखी रात्री अधिक वाढते. डोक्‍यावर गरम वस्त्र आवळून बांधल्याने, तसेच डोक्‍याला शेक करण्याने या प्रकारचे दुखणे कमी होते.

2. पित्तदोष: यामुळे डोके दुखते तेव्हा डोके व डोळ्यांची आग होते, श्‍वास गरम भासतो, दिवसा वेदना वाढतात तसेच गरम गोष्टी नकोशा वाटतात. डोक्‍याला थंड स्पर्शाने बरे वाटते. रात्री वेदना कमी होतात.

3. कफदोष : यामुळे डोके दुखते तेव्हा बरोबरीने डोके जड, जखडल्यासारखे वाटते; चेहऱ्यावर, डोळ्यांखाली सूज दुपारनंतर सूर्य खाली जातो तसतशा वेदना कमी होत जातात आणि सूर्यास्तानंतर थांबतात.

4. अनन्तवात : वातादी तिन्ही दोष प्रकोपित होऊन मानेत तीव्र वेदना करतात. ही वेदना भुवया, डोळे व शंखप्रदेशापर्यंत पोचते, मान जखडू शकते, हनुवटी जखडू शकते. अनंतवातामुळे विविध प्रकारचे नेत्ररोगसुद्धा होऊ शकतात.

5. अर्धावभेदक : याला सामान्य भाषेत अर्धशिशी असे म्हणतात. यात डोक्‍याच्या डाव्या वा उजव्या बाजूला अतिशय तीव्र वेदना होतात. या वेदना इतक्‍या तीव्र असतात, की जणू डोक्‍यात शस्त्राने प्रहार होत आहेत असे वाटते किंवा ऐरणीतून आग निघत असल्यासारखे वाटते. अर्धावभेदक खूप तीव्र झाला, तर त्याचा कान किंवा डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो.

6. शंखक : रक्‍त, पित्त व वात हे तिन्ही प्रकोपित झाल्याने ही डोकेदुखी होते. ती इतकी भयंकर असते, की तीन दिवसांच्या आत योग्य उपचार न मिळाल्यास व्यक्‍ती मृत्युमुखी पडू शकते. डोकेदुखीवर उपचार करण्यापूर्वी नेमके कारण शोधून काढणे सर्वांत महत्त्वाचे असते. बहुतांशी वेळेला डोके दुखायला लागले, की केवळ वेदनाशामक उपचार करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे तात्पुरते बरे वाटले, तरी पुन्हा पुन्हा डोके दुखू शकते.

7. वात : वातामुळे डोके दुखत असल्यास कानात तेल टाकता येते, नाकात तूप घालता येते, डोक्‍याला वातशामक तेल लावण्याचाही उपयोग होतो.

8. पित्त : पित्तामुळे डोके दुखत असल्यास दुधात भिजविलेली आवळकाठी बारीक करून त्याचा डोक्‍यावर लेप लावल्यास बरे वाटते. दुधात तूप-साखर व थोडे केशर घालून पिण्याचाही फायदा होतो. ऊन लागून पित्त वाढत असल्यास कोकमाचे तेल व नारळाचे तेल गरम करून एकत्र करून थंड झाले, की डोक्‍याला लावण्याने बरे वाटते. गुलाबपाण्यात चंदन उगाळून त्याचा डोक्‍यावर लेप लावण्यानेही बरे वाटते.

9. कफ : कफामुळे डोके दुखत असल्यास आल्याच्या रसात थोडीशी पिंपळी उगाळून त्यात थोडे सैंधव व गूळ मिसळून सेवन करण्याने बरे वाटते. सर्दीमुळे डोके दुखत असल्यास दुधात किंवा पाण्यात दालचिनी उगाळून लेप लावल्यास बरे वाटते. निर्गुडी, कडुनिंब, आघाडा यांचा पाला पाण्यात घालून त्याचा वाफारा घेतल्यानेही कफदोषाशी संबंधित डोकेदुखी दूर व्हायला मदत मिळते.

10. रक्त : रक्तातील दोषामुळे डोके दुखते, त्यावर पित्तशामक उपचार करण्याचा उपयोग होतो. शतधौत तूप (म्हणजे 100 वेळा थंड पाण्याने धुतलेले तूप) डोक्‍यावर चोळण्याचा फायदा होतो. शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन आणि रक्तमोक्षण करून घेण्याचाही फायदा होतो.

वारंवार डोके दुखण्याची सवय असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा काही गोष्टी: 

1. आठवड्यातून किमान दोन वेळा पादाभ्यंग करणे.
2. रात्री झोपताना नाकात साजूक तूप किवा अधिक गुण यावा म्हणून नस्यसॅन घृतासारखे औषधी तूप घालणे.
3. संगणकावर काम करणाऱ्यांनी डोळ्यांत सॅन अंजनासारखे उष्णता कमी करण्यास मदत करणारे अंजन घालणे.
4. स्त्रियांनी स्त्री संतुलनाकडे, विशेषतः पाळी नियमित आणि व्यवस्थित येण्याकडे लक्ष ठेवणे.
5. उन्हात किंवा वाऱ्यात जावे लागल्यास डोक्‍याला पुरेसे संरक्षण द्यावे.
6. डोक्‍याला नियमित, कमीत कमी दोन वेळा तरी वातशामक व केसांना हितकर औषधी द्रव्यांनी संस्कारित तेल लावणे.
7. रोज पोट साफ होण्याकडे लक्ष ठेवणे.

– डॉ. श्री बालाजी तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *